Sanjay Raut: तर त्यांचा नंबर राजकारणात ‘ढ’ पेक्षा खाली मानावा लागेल, संदीप देशपांडेंना राऊतांचं उत्तर
कोण कुणाची टीम आहे हा त्यांचा प्रश्न आहे. तोंडाच्या कोणत्या वाफा दवडायच्या हा त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या (maharashtra) राजकारणात शिवसेना (shivsena) मेरिटमध्ये आली आहे.
नवी दिल्ली: कोण कुणाची टीम आहे हा त्यांचा प्रश्न आहे. तोंडाच्या कोणत्या वाफा दवडायच्या हा त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या (maharashtra) राजकारणात शिवसेना (shivsena) मेरिटमध्ये आली आहे. म्हणूनच शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. राज्याचं नेतृत्व शिवसेना करते याचा अर्थ शिवसेनेला राजकारण उत्तम कळतं, शिवसेनेत निर्णय घेण्याची क्षमता आहे आणि शिवसेनेला राज्यातील जनतेचा पाठिंबा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सतत तीन वेळा देशातील पाच मुख्यमंत्र्यांच्या टॉप लिस्टमध्ये आले आहेत. हे जर कुणाला कळत नसेल तर त्यांचा नंबर राजकारणात ढ पेक्षा खाली मानावा लागेल, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी मनसेवर पलटवार केला. महाराष्ट्राच्या, देशाच्या दृष्टीने शिवसेना आणि मुख्यमंत्री मेरिट लिस्टमध्ये आले आहेत. आता कुणाला काय बोलायचं हा त्यांचा प्रश्न आहे, असंही राऊत म्हणाले.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मनसेवर पलटवार केला. तसेच भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घेतलेल्या भेटीवरही भाष्य केलं. अशा भेटीगाठी होत असतात. आम्ही अनेकांना भेटत असतो. प्रत्येक भेटीमागे राजकारण असतं असं नाही. प्रत्येक भेटीवर आम्ही बोलावं असं काही नाही, असं संजय राऊत म्हणाले.
रात गयी बात गयी
भाजप आणि मनसेच्या युतीबाबत मला माहीत नाही. त्याविषयी फार बोलावं अशी देशात, राज्यात स्थिती नाही. रात गयी बात गयी. मुंबई, ठाणे, नाशिक, केडीएमसी, औरंगाबाद आणि इतर पालिका सेना ताकदीने लढेल आणि जिंकेल. कितीही असंतुष्ट आत्मे एकत्रं आले, महाराष्ट्रा विरुद्ध मराठी माणसांविरुद्ध कितीही कट कारस्थान केली, मुंबई विरुद्ध कट कारस्थानं केली तरी त्यांच्या छाताडावर पाय देऊन आम्ही उभे राहू. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तुम्ही कितीही षडयंत्र रचा. काही फरक पडत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
पाच राज्यातून ईडी चौकशीला सुरुवात करा
कोल्हापूर उत्तरमध्ये जर पैसे घेऊन मतदान केलं तर मतदारांच्या मागे ईडी लागेल असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. कोल्हापूर उत्तरच कशाला? गोव्यात पणजी आणि साखळी मतदारसंघात आधी तिथल्या मतदारांच्या मागे ईडी लावा. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालच्या काही मतदारसंघात ईडी लावणं गरजेचं आहे. उत्पल पर्रिकरांचा पराभव झाला. साखळी मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघात ईडी चौकशी लावली तर त्याचं स्वागत करू. महाराष्ट्राचं नंतर बघू. पण सुरुवात या पाच राज्यात करा. मतदारांवर अनेक माध्यमातून झालेला प्रभाव याची चौकशी होणं गरजेचं आहे, असा पलटवार त्यांनी केला.
पवारच विरोधकांना एकत्रं आणू शकतात
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यूपीएच्या अध्यक्षपदात रस नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यावरही राऊत यांनी भाष्य केलं. देशातील विरोधी पक्ष एकत्रं यावा यासाठी हालचाली घडत आहेत. पवारांच्या पुढाकाराशिवाय या देशामध्ये मोदींना पर्याय होऊ शकत नाही. विरोधी पक्षाची एकजूट पवारच बांधू शकतात, असं त्यांनी सांगितलं.
देशपांडे काय म्हणाले होते?
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या पूर्वी शिवसेनेवर टीका केली होती. राज ठकारे स्वत:चे विचार मांडत असतात. आम्हाला कुणाची ए किंवा बी टीम व्हायचे नाही. शिवसेना राष्ट्रवादीची ढ टीम आहे. आम्ही तसे नाही. आमचे विचार हे आमचे विचार आहेत. राज ठाकरे हे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहेत, असं संदीप देशपांडे म्हणाले होते.
संबंधित बातम्या:
Sanjay Raut : कट कारस्थानाच्या छाताडावर पाय ठेवून मुंबई पालिका जिंकू, राऊतांची सकाळी सकाळी फटकेबाजी
मोठी घोषणा, एचडीएफसी आणि HDFC बँकेच्या विलीनीकरणास मान्यता, काय होणार परिणाम?
Maharashtra News Live Update : महाविकास आघाडीच्या आमदार खासदारांची शरद पवारांच्या घरी डिनर डिप्लोमसी