‘महाविकास आघाडीत तुमची लायकी ही खलिता वाहणाऱ्या काशिदासारखी’, संजय राऊतांच्या इशाऱ्याला अमित साटम यांचं जोरदार प्रत्युत्तर
तुमच्याच भाषेत बोलायचं तर एकदा प्रशासनाला बाजूला ठेवा, वेळ आणि जागा सांगा आणि मग भाजप कार्यकर्त्यांच्या मनगटातील ताकद काय आहे ते पाहायला या. हे या मराठ्याचं खुलं आव्हान आहे, जय जिजाऊ, जय शिवराय, अशा शब्दात अमित साटम यांनी संजय राऊत यांच्यावर तिखट शब्दात घणाघात केलाय.
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपराष्ट्रपतींना पत्र लिहित लेटर बॉम्ब टाकला. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेत राऊतांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केलाय. ‘केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून आमच्यावर खोटेनाटे आरोप केले जात आहेत. बदनाम करण्याचं काम सुरू आहे. ते भ्रमात आहेत. पण आम्ही या दडपशाहीला घाबरणार नाही. तुमची दादागिरी खपवून घेणार नाही. याद राखा, मुंबईत शिवसेनाच दादा आहे. आम्हीच मुंबईत दादागिरी करणार आहोत’, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. इतकंच नाही तर ‘हे सरकार पडणार नाही. उद्धव ठाकरेच (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री राहतील. त्यांच्या कुटुंबालाही भयंकर त्रास देत आहेत. खोटे पुरावे निर्माण करतात. रोज सकाळी एक माणूस उठतो आणि बेवड्यासारखा बडबडतो. मी मागेही म्हणालो, आम्ही तुमच्या घरात घुसलो, तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही,’ असंही राऊत म्हणाले. संजय राऊतांच्या या इशाऱ्याला आता भाजप आमदार अमित साटम (Amit Satam) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
“नमस्कार मी आमदार अमित साटम. जनाब संजय राऊत मुंबई काही तुमची जागीर नाही. घरात घुसायची भाषा करता, पण तुमच्या घरात तुमची काय किंमत आहे हे आम्हाला चांगलं माहिती आहे. महाविकास आघाडीत तुमची लायकी ही खलिता वाहणाऱ्या काशिदासारखीच आहे. भ्रष्टाचार करायचा, मग तो बाहेर काढणाऱ्या किरीट भाईंवरती भेकड हल्ले करायचे. प्रविण राऊत यांना अटक झाल्यानंतर तुमचं मानसिक संतुलन बिघडलं आहे हे आम्हाला ठाऊक आहे. हुल्लडबाजी ही भाजपची संस्कृती नाही. पण तुमच्याच भाषेत बोलायचं तर एकदा प्रशासनाला बाजूला ठेवा, वेळ आणि जागा सांगा आणि मग भाजप कार्यकर्त्यांच्या मनगटातील ताकद काय आहे ते पाहायला या. हे या मराठ्याचं खुलं आव्हान आहे, जय जिजाऊ, जय शिवराय,” अशा शब्दात अमित साटम यांनी संजय राऊत यांच्यावर तिखट शब्दात घणाघात केलाय.
राऊतांचं फडणवीसांना थेट आव्हान
दरम्यान, संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिलंय. ‘ईडीच्या ऑफिसमध्ये कोण लोकं बेकायदेशीरपणे जाऊन बसतात? जी दोन-तीन लोकं जातात, ईडीला ब्रीफ करतात, ईडीला आदेश देतात, कोणाला टॉर्चर करतात, मी फडणवीसांना आव्हान करतोय… आणि त्यांना कळलं असणार मला काय सांगायचंय ते’, असा सूचक इशाराच राऊत यांनी दिलाय.
फडणवीसांचा राऊतांवर जोरदार पलटवार
संजय राऊत यांच्या इशाऱ्याला देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘राऊत रोज सकाळी 9 वाजता येऊन मनोरंजन करत असतात. त्यांच्या म्हणण्याला अधिक गांभीर्याने घ्यायची गरज नाही. मोदी सरकारने कुणाला व्हिक्टिमाईज केलं नाही. मोदी सरकारमध्ये असं कधी होत नाही. त्यांनी व्हिक्टिम कार्ड खेळू नये, राऊत हे संपादक आहेत. हेडलाईन कशी द्यावी हे त्यांना माहीत आहे. दिवसभर आपल्यावर फोकस कसा राहील, आपलं नाव चर्चेत कसे राहील याप्रकारचे काम ते करत असतात’, असा टोला फडणवीसांना लगावला आहे.
इतर बातम्या :