Sanjay Raut : विधानसभा बरखास्तीच्या ट्विटवर राऊतांना स्पष्टीकरण देण्याची वेळ, जो निर्णय होईल तो आघाडी म्हणूनच
राऊतांच्या एका ट्विटमुळे सरकार पडण्याच्या शक्यता अधिक स्पष्ट झाल्या. यावरून आघाडीतील मंत्र्यांनी तीव्र संताप व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे अखेर संजय राऊतांनाही माध्यमांसमोर याविषयी स्पष्टीकरण द्यावं लागलं. जो काही निर्णय घेतला जाईल, तो आघाडी सरकार घेईल, असं त्यांना स्पष्ट सांगावं लागलं...
मुंबईः महाराष्ट्राच्या राजकारणात होऊ घातलेल्या घडामोडी विधानसभा (Maharashtra Assembly)बरखास्तीच्या दिशेने आहेत… असं सूचक ट्वीट संजय राऊतांनी (Sanjay Raut) केलंय. यावरून महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) प्रचंड संताप व्यक्त झाला. संजय राऊत हे खासदार आहे. महाविकास आघाडीचा भाग नसतानाही हे असं ट्विट कसं काय करू शकतात, अशा प्रतिक्रिया आघाडीमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी व्यक्त केल्या. महाविकास आघाडी सरकार धोक्यात आल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही अत्यंत खबरदारीनं पावलं उचलली जात असताना राऊतांच्या एका ट्विटमुळे सरकार पडण्याच्या शक्यता अधिक स्पष्ट झाल्या. यावरून आघाडीतील मंत्र्यांनी तीव्र संताप व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे अखेर संजय राऊतांनाही माध्यमांसमोर याविषयी स्पष्टीकरण द्यावं लागलं. जो काही निर्णय घेतला जाईल, तो आघाडी सरकार घेईल, असं त्यांना स्पष्ट सांगावं लागलं…
संजय राऊतांचं ट्विट काय?
एकनाथ शिंदे गटाची नाराजी दूर करण्याचे काल पासून सुरु असलेले सगळे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर महाविकास आघाडी सरकार बरखास्त होण्याची दाट शक्यता दिसतेय. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज सकाळी एक सूचक ट्विट केलं. त्यात महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी विधानसभा बरखास्तीच्या दिशेने… असं ते म्हणालेत. राऊतांच्या याच ट्विटमुळे महाविकास आघाडीतील नेत्यांनी तीव्र नाराजी दर्शवली.
आघाडीतील नेत्यांचा संताप का?
संजय राऊत यांच्या या ट्वीटनंतर आघाडीच्या नेत्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संजय राऊत हा सरकारचा भाग नसताना ते कसं काय ट्विट करू शकतात. तसंच सरकार बरखास्तीचा निर्णय पक्षाचा असतो. हे विशेषाधिकार मुख्यमंत्र्यांचे असतात. यावर राऊतांना बोलण्याचा अधिकार नाही, अशा प्रतिक्रिया आल्या.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने..
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 22, 2022
राऊतांनी दिलं स्पष्टीकरण
या ट्वीटवर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं की, ‘ मी फक्त मत व्यक्त केलं आहे. ज्या पद्धतीनं आमदारांची पळवापळवी.. दबावतंत्र, धमक्यांचं सत्र सुरू आहे. त्यामुळे सरकार अस्वस्थ आहेत. प्रमुख नेते अस्वस्थ आहेत. भविष्यात काय वळण घेईल हे आता कुणी सांगू शकत नाही. अशा स्थितीत तिथली विधानसभा बरखास्त करून पुढील निवडणुकांना सामोरं जाण्याचा पर्याय असतो. हा निर्णय आघाडी घेईल, मी फक्त माझं मत व्यक्त केलं.
नितेश राणेंचं राऊतांना प्रत्युत्तर
संजय राऊतांनी केलेल्या विधानसभा बरखास्तीच्या दिशेने… या ट्विटवरून भाजप नेते नितेश राणेंनीही ट्विट केलं. अशा रितीन सरकार बरखास्तीची भाषा करून संजय राऊत आमदारांना धमकी देऊ पाहतायत का, असा सवाल नितेश राणेंनी केलाय.