मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बंड करण्यापूर्वी मातोश्रीवर आले होते. ईडीच्या भीतीने ते मातोश्रीत रडले होते, असा दावा माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच उत्तर दिलं होतं. पोराटोरांचे प्रश्न मला विचारू नका, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्यानंतर आज शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरे यांच्या विधानाचा समाचार घेतला. हा समाचार घेताना शिरसाट यांची जीभ घसरली. त्यांनी थेट बापच काढला.
आदित्य तर रोज रडतो हो. आता ते काय लोकांना सांगायचं? सकाळी उठल्यावर, दुपारी उठल्यावर रडत असतो. संध्याकाळीही रडत असतो. अहो एकनाथ शिंदे कुठे? तुम्ही कुठे? एकनाथ शिंदे तुझ्या बापाच्या वयाचे आहेत. त्यांच्याबद्दल असं बोलणं गैर आहे, अशा एकेरी शब्दात संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली.
आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्र्यांना घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात. पण मुख्यमंत्र्यांना सत्तेत राहून सव्वा दोन वर्ष झाले. एकीकडे घटनाबाह्य म्हणतात, दुसरीकडे त्यांच्याकडेच मागणी करतात. घटनाबाह्य आहे तर मागण्या कसल्या करता? घटनाबाह्य मुख्यमंत्र्याच्या जाहिराती सामनामध्ये छापता कशाला? घटनाबाह्य मुख्यमंत्र्याचे पैसे चालतात तुम्हाला. तुम्ही कशासाठी करत आहात हे? जर घटनाबाह्य मुख्यमंत्री असेल तर त्याची जाहिरात छापू नका ना? यांना फक्त पैसा पाहिजे. त्यांना लोकांशी काही घेणंदेणं नाही. माल आहे तर ताल आहे अशी यांची गत आहे, अशी टीकाही संजय शिरसाट यांनी केली.
यावेळी त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावरही टीका केली. तुम्हाला कोण म्हटलं पुरोहितांना बोलवा म्हणून? तुम्हाला काय करायचंय याचा निर्णय तुम्हीच घ्या. पूजा कोणी? कशी करायची? हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, म्हणून त्या पुरोहितांना बोलवावं किंवा नाही बोलवावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हा जातीवाद पसरवून तुम्हाला ब्राह्मणांना सोबत घ्यायचं नाही, असा संदेश द्यायचा आहे का? मग तसा संदेश डायरेक्ट द्या, लोकांच्या भावना दुखवू नका. एकत्रित असलेल्या हिंदूंमध्ये तुम्ही फूट पाडत आहात, याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला.
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जागा वाटपावर विधान केलं होतं. त्यावरही शिरसाट यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संजय गायकवाड यांनी स्वतःचं वैयक्तिक मत मांडलेलं आहे. तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसतील, जागा वाटपाचा निर्णय घेतील. आपल्या पक्षाला जास्त जागा मिळाव्यात असं प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आणि आमदाराला वाटत असतं. तसा त्यांचा आग्रह असतो. आग्रह काही गैर नाही. शेवटी याबाबतचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतात. त्यामुळे आम्हाला कुणालाही जागा वाटपावर बोलण्याचा अधिकार नाहीये, असंही त्यांनी स्पष्ट केलं.