छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूकडून खंडणी घेतली होती, असं विधान शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं होतं. त्यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. शिवाजी महाराजांनी खंडणी घेतली नव्हती. असे शब्द वापरताना जयंत पाटील यांना लाज कशी वाटली नाही? असा संतप्त सवाल भाजपने केला आहे. त्यावर जयंत पाटील यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपचा इतिहास कच्चा आहे. त्यांनी शिवाजी महाराजांचं पत्र नीट वाचावं, असा टोलाच जयंत पाटील यांनी पुराव्यासह लगावला आहे. राज्यात खंडणी या शब्दावरून महाभारत सुरू असतानाच इतिहासकारांनीही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
इतिहासाचे अभ्यासक संजय सोनवणी यांनी या शब्दावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सुरत, सुरतेची लूट, खंडणी हे शब्द सध्या राजकीय धुलवडीचे शब्द बनले आहेत. समाजामध्ये संभ्रम निर्माण करून एखाद्या विषयावरचे लक्ष भरकटवण्याचा हा प्रकार आहे. मालवणच्या राजकोटमधला पुतळा पडल्याच्या घटनेवरचं लक्ष भरकटवण्यासाठी आरोप केले जात आहेत, असं संजय सोनवणी यांनी म्हटलं आहे.
खुद्द शिवाजी महाराजांचं पत्र प्रसिद्ध झालेल आहे. त्यात सुद्धा सुरतेची लूट, खंडणी हे शब्द आलेले आहेत. कवी भूषण यांनी त्यांच्या काव्यात याचा उल्लेख केलेला आहे. त्या काळात खंडणीचा अर्थ युद्ध खर्च असा होता. हा युद्ध खर्च वसूल करण्यासाठी विरोधी पक्षाकडून खंडणी घेतली जात होती. तो मध्ययुगातला एक प्रघात होता. आताचा खंडणी शब्द बदनाम झालेला आहे. त्या काळात तेव्हाचे संदर्भ वेगळे होते, हे लक्षात घेतलं पाहिजे, असं सोनवणी म्हणाले.
कोणता शब्द कोणत्या काळात कशासाठी वापरला गेलेला आहे, हे माहिती नसेल तर ते आपलं इतिहासाबद्दल अज्ञानच दाखवणार. वेडेपणा दाखवणार आणि आपण नेते होण्यास लायक कसे नाही हे समोर येत राहणार. शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. या पापावर पांघरून घालण्यासाठी हे खोडसाळ दावे करणे हे शोभणारं नाही. शिवाजी महाराजांचा वापर राजकारणासाठी होणं हे दुर्दैव आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनीही आपल्या विधानावर अधिक स्पष्टीकरण दिलं आहे. भाजपला इतिहास माहिती नाही. यापूर्वी अनेकांनी वर्णन करताना हा शब्द वापरला आहे. स्वत: छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्र लिहिले होते, त्यात त्यांनीही हा शब्द वापरला आहे. अजून भाजपचा इतिहास कच्चा आहे. त्यांनी थोडे वाचन करावे, असा चिमटा जयंत पाटील यांनी काढला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांच्या सरकारची खंडणी सरकार म्हणून ओळख होती, त्यांना खंडणीच आठवेल. माझा राजा लुटारू म्हणणं योग्य नाही. इतिहासात काही चुकीच्या गोष्टी आल्या असतील तर त्या सुधारल्या पाहिजे. इंग्रजांच्या दृष्टीकोणातून आलेला इतिहास सुधारला पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मविआच्या लोकांना खंडणी मागायची आणि वसूली करण्याची सवय लागली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांनी खंडणी मागितल्याची मुक्ताफळे जयंत पाटील यांनी उधळली आहेत. हे शब्द वापरताना जयंत पाटलांना लाज कशी वाटली नाही? त्यांनी तातडीने माफी मागावी, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली होती.