पिस्तुल्या… चिडीमार… फासे फेकणारा…. गिरीश महाजन यांच्यावर कुणाची टीका?
महाराष्ट्राला संकटातून बाहेर काढणारा कुणी नेता असेल तर तो म्हणजे शरद पवार. दिलीप खोडपे यांच्याकडे पैसे नाही. मात्र त्यांचा पैसे घ्या आणि मतदान खोडपे सरांना करा. या ठिकाणच्या मंत्राला प्रायश्चित्त करण्याची वेळ आली आहे. आता नाथाभाऊला वरतून काही आले तरी ते जाणार नाही, असं माजी मंत्री सतीश पाटील म्हणाले. यावेळी गिरीश महाजन यांना पाडण्यासाठी हात उंचावून निर्धार करण्यात आला.
शरद पवार गटाचे नेते, राज्याचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांना मतदारसंघातून हटवायचं आहे ना? मग घाबरता कशाला जोरात बोला. कुणाला घाबरत आहात? असं आवाहन देतानाच पिस्तुल्या.. चिडीमार… फासा फेकणारा.. असं म्हणत नाव न घेता डॉ. सतीश पाटील यांनी गिरीश महाजन यांच्यावर खोचक टीका केली. शरद पवार गटाच्या शिवराज्य यात्रेला संबोधित करताना त्यांनी ही टीका केली.
आता आपले झालेले आणि आपलेच असलेले माजी मंत्री नाथाभाऊ खडसे साहेब आले आहेत. तुम्हाला वाटलं होत की, आण्णा नाव घेईल. पण आता ते आपलेच आहेत आणि आम्ही सर्व एकत्र आहेत. राज्यातला जो संकटमोचक आहे त्याच्यावर संकट आणण्यासाठी आम्ही आता सर्व एकत्र आलो आहोत. दिलीप खोडपे यांच्या रूपाने आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. आतापर्यंत तुम्ही आमची माणसं फोडली, आता आम्ही तुमच्याच गावात येऊन तुमचा दिलीप खोडपे फोडला आहे, असा हल्लाच सतीश पाटील यांनी चढवला.
तांड्यावरून पळवून लावलं
चार दिवसापूर्वी एका तांड्यावर मंत्री गिरीश महाजन यांना पळवून लावलं. त्या तांड्यावरचे कोणी असतील तर त्यांनी व्यासपीठावर या त्यांचा सत्कार केला पाहिजे. घाबरू नका. आता तुम्हाला कोणी काही करणार नाही, असं सांगतानाच काय करायचं? आमदार झाला. मंत्री पद मिळाले तरी एक तांड्यावरचा रस्ता मंत्री गिरीश महाजन करू शकला नाही. याला काय करायचं? याला माफ करायचं का..? असा सवाल सतीश पाटील यांनी केला.
एवढा पैसा आला कुठून?
कुणी तरी सांगायचा की मी भाड्याच्या घरात राहतो. टपरीवाल्याची मालमत्ता कुठे आहे ते सांगता येणार नाही. मात्र कुठून आलाय एवढा पैसा? कुंभमेळ्याचा बराच पैसा खाऊन गेला. याने आणि चाळीसगाववाल्याने आपआपसात वाटून खाल्लं, अशी टीका त्यांनी भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर नाव न घेता केली.