सावरकरांनी गोडसेला बंदूक पुरवण्यासाठी मदत केली होती; तुषार गांधी यांच्या दाव्याने खळबळ
1930मध्येही महात्मा गांधी यांना मारण्याचे प्रयत्न झाले होते. त्यावेळी प्रबोधनकार ठाकरेंनी गांधींच्या सहकाऱ्यांना सावध केले होते. त्यानंतर प्रबोधनकारांनी राज्यातील सनातनी हिंदूच्या नेत्यांना खडसावलं होतं.
मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले आहेत. भाजपने राहुल गांधी यांच्या विधानावरून निदर्शने सुरू केलेली असतानाच महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी आणखी एक विधान केलं आहे. महात्मा गांधी यांच्या हत्येच्या दोन दिवस आधीपर्यंत नथुराम गोडसेकडे बंदूक नव्हती. बंदूक मिळवून देण्यासाठी त्याला सावरकरांनी मदत केली होती, असा दावा तुषार गांधी यांनी केला आहे. तुषार गांधी यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे. आपला हा दावा आजचा नसून कपूर आयोग आणि तेव्हाच्या पोलिसांच्या अहवालातही ही गोष्ट नमूद असल्याचं तुषार गांधी यांनी सांगितलं.
तुषार गांधी यांनी ट्विट करून हा दावा केला. त्यानंतर टीव्ही9 मराठीशी संवाद साधतानाही त्यांनी हा दावा केला आहे. सावरकरांनी गोडसेंना बंदूक पुरवण्यासाठी मदत केली होती. हत्येच्या दोन दिवस आधी गोडसेकडे बंदूक नव्हती.
हे मी म्हणत नाही कपूर आयोगाने नमूद केलं आहे. 26 आणि 27 जानेवारी 1948 रोजी नथूराम गोडसे आणि आपटे सावरकरांना भेटायला गेले होते. अशी बातमी पोलिसांकडे होती. त्यात तथ्य आहे, असं तुषार गांधी यांनी सांगितलं.
सावरकरांना भेटण्याच्या दिवसांपर्यंत गोडसेकडे बंदूक नव्हती. बंदूक कुठून मिळवायची याचे गोडसेचे सर्व प्रयत्न निष्फळ गेले होते. त्यानंतर सावरकरांसोबतच्या बैठकीनंतर गोडसे तात्काळ दिल्लीला जाऊन ग्वाल्हेरला गेला होता. ग्वाल्हेरला परचुरे म्हणून सावरकरांचे अनुयायी होते. त्यांच्याकडे गोडसे गेला. त्यांच्याकडून गोडसेला बंदूक मिळाली, असा दावा त्यांनी केला.
या घटनाक्रमावरून गोडसे आणि आपटेला बंदूक मिळवण्याचा सल्ला कुठून मिळाला असेल हे स्पष्ट होतं. गोडसे मुंबईत बंदूक शोधत फिरत होता, हा पोलिसांचा अहवाल आहे. मी नवीन सांगत नाही. 2007ला माझं पुस्तक आलं. त्यात हे नमूद केलं आहे. त्यापूर्वीही कपूर आयोगाच्या अहवालात ही गोष्ट नमूद आहे, असंही त्यांनी सांगितलं.
Savarkar not only helped the British, he also helped Nathuram Godse find an efficient gun to murder Bapu. Till two days before Bapu’s Murder, Godse did not have a reliable weapon to carry out the murder of M. K. Gandhi.
— Tushar (@TusharG) November 19, 2022
1930मध्येही महात्मा गांधी यांना मारण्याचे प्रयत्न झाले होते. त्यावेळी प्रबोधनकार ठाकरेंनी गांधींच्या सहकाऱ्यांना सावध केले होते. त्यानंतर प्रबोधनकारांनी राज्यातील सनातनी हिंदूच्या नेत्यांना खडसावलं होतं.
गांधींना मारण्याची मोहीम बस्स करा, ते संत आहेत, असं प्रबोधनकारांनी सांगितलं होतं. हा इतिहास अनेक पुस्तकात आहे. माझ्या पुस्तकातही आहे. उद्धव ठाकरेंनी हा इतिहास लक्षात घेतला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरेंना भेटून मी त्यांना हा इतिहास सांगितला होता. मी माझ्या मनाने काढलेली ही गोष्ट नाही. त्यावेळी महाराष्ट्रात सनातनी हिंदूंचे नेते कोण होते ही नावे घेण्याची गरज नाही, असंही त्यांनी सांगितलं.