सावंतवाडीत चौरंगी लढत; बंडखोरीमुळे दीपक केसरकरांच्या आव्हानांत वाढ

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पहायला मिळणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांविरोधात महायुती आणि मविआमधूनच इच्छुक उमेदवाराने बंडखोरी केली आहे. त्यामुळे यंदा मतांचं विभाजन होण्याची शक्यता टाळता येणार नाही.

सावंतवाडीत चौरंगी लढत; बंडखोरीमुळे दीपक केसरकरांच्या आव्हानांत वाढ
डावीकडून अर्चना घारे परब, दीपिक केसरकर, राजन तेली आणि विशाल परबImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 08, 2024 | 1:57 PM

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत अत्यंत रंगतदार लढत रंगण्याची चिन्हे आहेत. एकीकडे शिवसेना शिंदे गटातील नेते आणि मंत्री दीपक केसरकर हे चौथ्यांदा विजयी षटकार ठोकण्याच्या उद्देशाने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र यावेळी त्यांच्यासमोर काही आव्हानं आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांविरोधात महायुती आणि मविआमधून एकेका इच्छुक उमेदवाराने बंडखोरी केल्याने इथली समीकरणं आता बदलली आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत सावंतवाडीमध्ये महायुतीकडून शिंदे गटाचे दीपिक केसरकर यांच्याविरुद्ध ठाकरे गटाचे राजन तेली अशी मुख्य लढत होती. पण इच्छुक उमेदवारांच्या बंडखोरीमुळे या मतदारसंघात चौरंगी लढत पहायला मिळणार आहे. महायुतीमधील भाजपाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले नेते विशाल परब आणि मविआमधील शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या अर्चना घारे परब या दोघांच्या बंडखोरीमुळे सावंतवाडीतील निवडणूक आता चौरंगी झाली आहे.

मतदारसंघाचा इतिहास

सावंतवाडी या मतदारसंघाचा राजकीय इतिहास फार रंजक आहे. 1962 ते 2009 पर्यंत इथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं वर्चस्व राहिलं आहे. शिवराम सावंत खेम सावंत भोसले यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने सलग अनेक निवडणुका जिंकल्या होत्या. 1962, 1967, 1972 आणि 1985 च्या निवडणुकीत ते इथून आमदार म्हणून निवडून आले होते. तर प्रवीण भोसले यांनी 1990 आणि 1995 मध्ये काँग्रेसचं प्रतिनिधित्व केलं होतं. मात्र 1999 मध्ये शिवसेनेच्या शिवराम दळवी यांनी काँग्रेसच्या प्रभावाला आव्हान देत ही जागा जिंकली होती. दळवी यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा विजय मिळवला. या विजयाने शिवसेनेनं या प्रदेशात आपलं अस्तित्त्व वाढवलं असल्याचं दर्शवलं. 2009 मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे दीपक केसरकर यांनी निवडणूक जिंकली. त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये ते शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडून आले. केसरकर यांच्या सलग विजयामुळे शिवसेनेनं सावंतवाडीत आपलं स्थान भक्कम केल्याचं दिसून आलं. दीपक केसरकर यांना 2014 मध्ये चांगल्या मतांनी विजय मिळाला होता. 2019 मध्येही त्यांनी आपली लोकप्रियता कायम ठेवली होती.

सावंतवाडी मतदारसंघाचा 2019 मधील विधानसभा निवडणुकीचा निकाल

उमेदवाराचं नाव पक्ष एकूण मतं
1- दीपक वसंतराव केसकर शिवसेना 69,784
2- राजन कृष्ण तेली अपक्ष 56,556
3- बाबन सलगावकर इतर 5,396
4- नोटा इतर 3,524
5- प्रकाश गोपाल रेडकर इतर 3,409

दीपक केसरकर

सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर हे सलग तीन वेळा निवडून आले आहेत. 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणि त्यानंतर 2014, 2019 मध्ये शिवसेनेकडून ते विधानसभेवर निवडून गेले. शिवसेनेनं 1999 पासून इथं आपली पकड मजबूत केली. अडीच वर्षांपूर्वी जेव्हा शिवसेनेत फूट पडली, तेव्हा केसरकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी ते चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. मतदारसंघातील जनतेवर असलेला प्रभाव, तगडा जनसंपर्क आणि विकासकामांमधून जोडलेला समर्थक वर्ग या सर्व केसरकरांच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र सलग 15 वर्षे मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आणि साडेसात वर्षे मंत्रिपद भूषवल्यानंतरही इथल्या काही समस्या सोडवण्यात त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे काही प्रमाणात त्यांच्याविरोधात नाराजीसुद्धा आहे.

हे सुद्धा वाचा

इथल्या स्थानिक राजकारणात तसं पाहायला गेल्यास, केसरकर आणि नारायण राणे यांचं फारसं कधी पटलं नाही. पण लोकसभा निवडणुकीदरम्यान दीपक केसरकर यांनी नारायण राणेंची मदत केली होती. राणे यांचे एकेकाळचे निकटवर्तीय राजन तेली यांनी केसरकरांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पण तेली यांनी निवडून येणं राणेंसाठी फारसं सोयीचं नाही. म्हणूनच ते केसरकरांच्या पाठीशी उभे आहेत. नारायण राणे मदतीला आल्याने केसरकर यांचं बळ वाढलेलं आहे.

सावंतवाडी मतदारसंघाचा 2014 मधील विधानसभा निवडणुकीचा निकाल

उमेदवाराचं नाव पक्ष एकूण मतं
1- दीपक वसंत केसरकर शिवसेना 70,902
2- राजन कृष्ण तेली भाजपा 29,710
3- चंद्रकांत दत्ताराम गवडे काँग्रेस 25,376
4- दळवी सुरेश यशवंत राष्ट्रवादी कॉंग्रेस 9,029
5- उपकर (जिजी) परशुराम मनसे 6,129

राजन तेली

सावंतवाडी मतदारसंघात दीपक केसरकर यांच्याविरोधात ठाकरे गटाने राजन तेली यांना उमेदवारीचं तिकिट दिलं आहे. राजन तेली हे भाजपामध्ये होते. मात्र सावंतवाडीची जागा महायुतीमध्ये शिंदे गटाला सुटणार हे निश्चित होताच ते ठाकरे गटात दाखल झाले. त्यानंतर त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाली. गेल्या दोन निवडणुकांमध्येही तेली यांनीच केसरकर यांना आव्हान दिलं होतं. मात्र केसरकर यांचा पराभव करण्यात त्यांना यश मिळालं नाही. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी केसरकर यांना घेरण्याची चांगलीच तयारी केली आहे. केसरकरांवर नाराज असलेला मतदार या निवडणुकीत राजन तेलींच्या बाजूने वळण्याची दाट शक्यता आहे. त्यातही राजन तेली हे मूलचे कणकवलीचे असल्याने त्यांच्यासाठी बाहेरचा उमेदवार हा शिक्का अडचणीत आणणारा ठरू शकतो.

सावंतवाडी मतदारसंघाचा 2009 मधील विधानसभा निवडणुकीचा निकाल

उमेदवाराचं नाव पक्ष एकूण मतं
1- दीपक वसंत केसरकर राष्ट्रवादी कॉंग्रेस 63,430
2- दळवी शिवराम गोपाळ शिवसेना 45,012
3- प्रवीण प्रतापराव भोसले अपक्ष 19,364
4- बाबुराव दत्तारम धुरी इतर 1,792
5- यशवंत वसंत पेडणेकर इतर 1,781

बंडखोर उमेदवार

दीपक केसरकर आणि राजन तेली यांच्याशिवाय दोन अपक्ष उमेदवार निवडणुकीत उभे राहिल्याने आणखी रंगत आली आहे. यातील पहिले अपक्ष उमेदवार हे भाजपाचे बंडखोर नेते विशाल परब आहेत. यंदाच्या निवडणुकीसाठी ते गेल्या काही महिन्यांपासून जोरदार तयारी करत आहेत. स्वत:ला मतदारांशी जोडून घेण्यासाठी ते विविध प्रयत्न करत आहेत. मात्र भाजपाने ही जागा शिंदे गटाला सोडल्याने त्यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं होतं. युवा नेता असल्याने सावंतवाडीतील तरुण मतदार त्यांच्याकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय विशाल परब यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली असली तरी भाजपामधील एका वर्गाचा त्यांना पाठिंबा आहे. त्यामुळे दीपक केसरकर यांच्यासाठी परब हे डोकेदुखी ठरू शकतात. इथेही नारायण राणे यांची भूमिका महत्त्वाची ठरते. राणे आणि त्यांचे समर्थक विशाल परब यांच्याविरोधात असल्याने त्यांच्यासाठी ही बाब अडचणीची ठरू शकते.

या मतदारसंघात महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीमध्येही बंडखोरी झाल्याचं पहायला मिळालं. गेल्या अनेक वर्षांपासून सावंतवाडी मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक असलेल्या शरद पवार गटाच्या अर्चना घारे परब यांनीही इथे बंडखोरी केली आहे. मविआमध्ये मतदारसंघाची जागा ठाकरे गटाला गेल्यानंतर त्यांनी ही बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. विविध सामाजिक कार्यातून त्यांनी सावंतवाडीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण या मतदारसंघात शरद पवार गटाची ताकद मर्यादित असल्याने त्यांचा दावा कमकुवत ठरला. आता बंडखोरी केल्यानंतर त्यांना सावंतवाडी मतदारसंघातील पांढरपेशा मतदारांचा पाठिंबा मिळू शकतो. असं असलं तरी सर्व राजकीय समीकरणं पाहता अर्चना यांची निवडून येण्याची शक्यता मर्यादित आहे.

चौरंगी लढतीत मतविभाजन

दीपक केसरकर आणि राजन तेली हे दोन प्रमुख उमेदवार आणि विशाल परब, अर्चना घारे परब हे दोन तुल्यबळ अपक्ष उमेदवार अशा चौरंगी लढतीत मतांचं विभाजन टाळता येणार नाही. महायुती आणि मविआमध्ये बंडखोरी झाल्याने मतांची गणितं बदलण्याची दाट शक्यता आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.