ठाणे: राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणाऱ्या रिदा रशिदा यांच्यासह तीन जणांवर ॲट्रोसिटीचे कलम दाखल करण्यात आले आहे. मुंब्रा पोलीस ठाण्यात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या या महिलेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
शिवा भिष्माचार्य जगताप यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. छटपूजेच्या दिवशी मुंब्र्यातील मुंब्रेश्वर मंदिर परिसरात तलावाच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेलो होतो. माझ्यासोबत माझे मित्रंही होते. त्यावेळी रिदा रशिदा, सिंदर मुमताज अहमद आणि इतर दोन तीन महिला त्या ठिकाणी उभ्या होत्या.
मी दलित असल्याचं रिदा यांना माहीत आहे. मी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी मला जातीवाचक शिवीगाळ करून मला धक्काबुक्की केली, असं शिवा जगताप यांनी एफआयआरमध्ये म्हटलं आहे.
तसेच सिकंदर याने तुझे हातपाय तोडून फेकून देईल अशी धमकी दिली. त्या ठिकाणी पोलीसही हजर होते. तेव्हा अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना मंदिरात येऊ देऊ नका. त्यांना हाकलून द्या, त्यांचे मंदिरात काय काम आहे? असा सवाल करत आम्हाला हाकलून देण्यास पोलीस आणि मंदिराच्या व्यवस्थापकाला सांगितल्याचं एफआयआरच्या कॉपीत नमूद केलं आहे.
रिदा रशिद यांनी आम्हाला मंदिरातून हाकलण्यास सांगितलं आणि शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिथे काही लोकं उपस्थित होते. त्यातील एका व्यक्तीने या प्रकाराचा व्हिडीओ काढला असून तो व्हायरल केला आहे. रिदा यांनी केलेल्या मानहानीमुळे माझे आणि माझ्या कुटुंबीयांचं मानसिक खच्चीकरण झाल्याचंही या तक्रारीत जगताप यांनी नमूद केलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल नव्या पुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम पाहण्यासाठी मी गेलो होतो. त्यावेळी रिदा रशिद, सिंकदर मुमताज, अहमद खान यांनी मला कार्यक्रमात पाहिले आणि जाणूनबुजून माझ्या बाजूने येऊन उभे राहिले.
यावेळी हे लोक माझ्याकडे रागाने बघत होते. तसेच मला छटपूजेच्या दिवशीच्या प्रकरणावरून जातीवाचक शिवीगाळ देण्यास सुरुवात केली, असा आरोपही या तक्रारीत म्हटलं आहे.
ये कार्यक्रम हमारा है. तू इधर कैसे आया? असा सवाल सिकंदर यांनी केला, असंही या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून रशिदा यांच्यासह ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.