मुंबई : राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंड केलं असून त्यांनी भाजपला साथ दिली आहे. त्यामुळे राज्यात नवीन समीकरणे आकाराला आली आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शऱद पवार यांना त्यांच्या पुतण्यानेच म्हणजे अजित पवार यांनी दगा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील यांनीही शरद पवार यांची साथ सोडली आहे. जवळपास 40 आमदारांनी साथ सोडल्याने पवार एकाकी पडल्याचं चित्र दिसत आहे. मात्र, असं असलं तरी लेकीने म्हणजे सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांची साथ सोडलेली नाहीये. 80 वर्षाच्या योद्ध्याला साथ देण्याचं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची आज बैठक होणार आहे. या बैठकीला आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आलं आहे. आज दुपारी 1 वाजता वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या बैठकीला येण्याचं आवाहन केलं आहे.
महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेने शरद पवार साहेबांवर नेहमीच जीवापाड प्रेम केलं आहे. साहेबांचा देखील इथल्या जनतेवर जीव आहे. हे नातं अतूट आणि पहाडासारखं भक्कम आहे. प्राप्त परिस्थितीत आपल्या सर्वांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढील दिशा देण्यासाठी 83 वर्षांचा तरुण योद्धा म्हणजेच आपले सर्वांचे आदरणीय पवार साहेब उद्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करणार आहेत. पुढची रणनीती ठरवून पक्षाला दिशा देणार आहेत. त्यामुळे या बैठकीला आपण सर्वांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती. अवश्य या. लवकर या आणि सुरक्षितपणे या, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेने आदरणीय पवार साहेबांवर (@PawarSpeaks) नेहमीच जीवापाड प्रेम केलं आहे. आणि साहेबांचा देखील इथल्या जनतेवर जीव आहे. हे नातं अतूट आणि पहाडासारखं भक्कम आहे. प्राप्त परिस्थितीत आपल्या सर्वांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (@NCPspeaks) पुढील दिशा… pic.twitter.com/cqOawLAaZi
— Supriya Sule (@supriya_sule) July 4, 2023
दरम्यान, अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमदार आणि खासदारांना संपर्क करण्यास सुरुवात केली आहे. त्यांना परत शरद पवार नेतृत्वातील राष्ट्रवादीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत. सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि स्वत: शरद पवार हे या आमदार आणि खासदारांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत किती आमदार आणि खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वातील बैठकीला उपस्थित राहणार हे दिसून येणार आहे.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या आज बैठका होत आहेत. त्यामुळे राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालया समोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अजितदादांच्या बंडानंतर आज मुंबईत शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन ठिकाणी मेळावे आहेत. या मेळाव्या साठी राज्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आमदारांना बोलावण्यात आले आहे.त्यामुळे दुपार नंतर राष्ट्रवादी कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी वाढणार आहे.