Shahaji Bapu Patil : शिंदेंनी बंड कसं केलं? पुढचा प्लॅन काय? ठाकरे कुठे चुकले?; शहाजी बापू पाटलांचं ऑडिओ क्लिपमधील संभाषण जसंच्या तसं!
Shahaji Bapu Patil : तुम्हाला सांगू का शिवसेनेचे 41 झालीत्या. अजून दोगं तिघं वाटेवर आहेत. 45 होतील. आणि अपक्षांची सात आठ होत आलीय. अन् अडीच वर्ष तुम्हाला सांगतो. तुमची जबाबदारी आहे. काय तालुक्याचा विकास होईल.
मुंबई: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी आपल्याच पक्षाच्या विरोधात बंडाचं निशाण फडकवलं आहे. त्यामुळे आघाडीत (maha vikas aghadi) एकच खळबळ उडाली आहे. हे बंड मोडून काढण्यासाठी सर्वच स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. पण शिंदे हे बंडावर ठाम आहेत. विशेष म्हणजे शिंदे यांच्यासोबतचे आमदार आणि मंत्रीही बंडावर ठाम आहेत. त्यामुळे पुढे काय होणार अशी स्थिती निर्माण झालेली असतानाच शिंदे यांचे मनसुबे समोर आले आहेत. शिंदे यांचे सांगोल्यातील समर्थक आमदार शहाजी बापू पाटील (shahaji bapu patil) यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात शहाजी बापू पाटील यांनी आपल्या बंडाची सर्व माहिती दिली आहे. तसेच शिंदे यांचा पुढचा प्लॅन काय आहे? शिंदे कुणासोबत जाणार? कुणाचं सरकार येणार? आणि कुणाला मोठी खाते मिळणार याचा लेखाजोखाच शहाजी बापू पाटील यांनी या ऑडिओ क्लिपमधून मांडला आहे. कार्यकर्त्याशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती उघड केली आहे.
शहाजी बापू पाटील यांचं संभाषण जसंच्या तसं
कार्यकर्ता: नेते नमस्कार!
शहाजी बापू पाटील: नमस्कार, नमस्कार!
कार्यकर्ता: कुठे आहेत नेते? तीन दिवस झालेय फोन लावतोय.
शहाजी बापू पाटील: आम्ही सध्या गुवाहाटीमध्ये आहे.
कार्यकर्ता: बरं.
शहाजी बापू पाटील: काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, ओक्केमध्ये आहे.
कार्यकर्ता: इथं टिव्हीवर आम्ही बघतोय, तुमचा कोणताही कॉन्टॅक्ट नाही. एवढा सारा घटनाक्रम, तुम्ही बोलायचं तर. थोडं तरी सांगायचं तर.
शहाजी बापू पाटील: नाय नाय नाय… हॅलो.. नेत्यांचा आदेश होता. कुणाला फोन करू नका. पण आता इतकं काही झाल्यावर मलाही करमना. मी म्हणलो. तालुक्यात कुणाला तरी बोलू. काय चाललंय काय नाय. बरं तालुका कसा आहे?
कार्यकर्ता: इथं सर्व ओके आहे. सर्वानी तुम्ही घेतलेल्या भूमिकेचं स्वागत केलं. मी काल पुण्याहून आलो. कार्यालयावर गर्दी होती. सर्वांना वाटतंय बांपूंना संधी मिळतेय.
शहाजी बापू पाटील: होय ना…
कार्यकर्ता: पण सर्वांना तुमचा निर्णय आवडलाय, सगळे म्हणत आहे बापूंना मंत्रिपदाची सत्ता मिळतेय.
शहाजी बापू पाटील: अरे व्वा. रफिक भाय, तुम्हाला मी आता बोललो नाय. अडीच वर्षात या सरकारमध्ये काय काम झालं ते सांगा? शंकरराव चव्हाणांच्या हाताखाली काम केलं. त्यांच्याशी माझे कौटुंबीक संबंध होते. त्यांनी मला कधी खाली झोपू दिलं नाही. इतकं चांगलं नातं असताना त्या अशोक चव्हाणांनी एक तरी आपलं काम केलं का? त्या अजित पवारांचं वागणं कसं होतं हे तुम्हाला माहीतच आहे. तो सुडानेच पेटला आहे हो आपण राष्ट्रवादी सोडली म्हणून. रागानेच बघतोय आपल्याकडे. पाया पडतोय. बुटांना हात लावतोय. लगा मी तुझ्यापेक्षा वयाने मोठा हाय. तरी मी पाय धरून पाया पडतोय. कशासाठी? मह्या मतदारसंघासाठी. मह्या लोकांसाठी. मी बघितलं रफिक भाय. काय नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांचं.
कार्यकर्ता: हो, त्यांनी 30 कोटी रुपये दिले होते मतदारसंघासाठी.
शहाजी बापू पाटील: अहो त्यांचा संयमीपणा, राजकीय बुद्धिमता, त्या माणसाचं नेतृत्वच जबरदस्त हाय. तुमच्या दिल्लीचं कसं बजेट असतं, कसं राज्याचं बजेट असतं. कसा विकास व्हावा. कसं गतिमान झालं पाहिजे. भयानक. यशवंतराव चव्हाण साहेब, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यानंतर चौथं नेतृत्व एकनाथ शिंदे वाटलं. शरद पवार असो, कुणाला पुरत नाय. पवारांचा आवाज मुटघळ. होय माणूस बोलत नाय. पण रिझल्ट इतकं करेक्ट आहे या माणसाचं. मला वर्षभर या माणसाचं नेतृत्व लय आवडलं होतं.
कार्यकर्ता: बरोबर आपल्याला दिसत होतं. ते भरपूर देत होते.
शहाजी बापू पाटील: अरे आपली ओळख नाय पाळख नाय. पण त्या माणसाने आल्या आल्या तुम्ही गणपतरावांच्या मतदारसंघातून निवडून आलाय. काय बी अडचण सांगा… कोण म्हणतंय असं. एवढी विचित्रं माणसं आहेत की आघाडीत, तुम्हीच टाईप केलीय पत्रं, गणपतराव देशमुख साहेब महाराष्ट्राचे लोकनेते आहेत. चळवळीतील लोक नेते आहेत. माझ्या मतदारसंघातील आहेत. त्यांच्या श्रद्धांजलीच्या भाषणातील संधी मला द्यावी. आपण पत्रं पाठवलं होतं. तुम्हाला मी भाषणही करून दाखवलं होतं. साहेबांवर काय बोलणार सांगितलं होतं. पण यांनी मला संधी सुद्धा दिली नाही. अजित पवार यांनी पहिल्यांदा त्यांना श्रद्धांजली वाहिली. एकदा त्यानं नाव घेतलं आणि दिलं सोडून. कोल्हापूरचा कोण वारला होता. त्याच्यावर बोलत बसलं. अन् त्याच्यानंतर फडणवीस साहेब उठलं बोलायला. त्यांनी गणपतराव देशमुखांचं स्मारक करण्याची मागणी केली. तो बोलल्यानंतर बाळासाहेब थोरात बोलले. त्यांनी मागणी केली. मग हे त्यांनी तिसऱ्यांदा उठले. अन् बोलायला लागले. आमचे गणपतरावांशी असे संबंध आहेत, तसे संबंध आहेत. साहेबांचे संबध आहेत… असं सांगू लागले. त्यांच्याविरोधात आम्ही कुणाला उभाच करत नव्हतो, असं बी म्हणलं. आरं त्यांच्या विरोधात उभं करत नव्हतो. तर 1990ला तुम्हीच मला तिकीट दिलं. 1995 ला तिकीट दिलं. मला कशाला तिथे खिंडीत उभं केलंत? आँ.. आबासाहेबांच्या श्रद्धांजलीच्या भाषणात नेमाने माझं भाषण व्हायला हवं होतं. या तिघांच्या भाषणाची काय गरज व्हती?
कार्यकर्ता: व्हायलाच पाहिजे होतं भाषण.
शहाजी बापू पाटील: हां… या तिघांना काय माहीत हाय गणपतराव देशमुख कोण माणूस हाय. आहो माझं पहिलं वाक्य काय होतं माहीत आहे का? जे पक्वं फळाप्रमाणे सहजपणे गळले हो, जीवन त्यांना कळले हो, असे आमचे महान नेते गणपतराव देशमुख साहेब. आज आमच्यातून निघून गेले… अहो काय भाषण होतं. सभागृहाला अख्ख्या रडवलं असतं. सगळ्यांच्या डोळ्याला धारा लागल्या नसत्या तर च्याआयला राजाराम पाटलांची औलाद नाय. काय नाय, लढाई जिंकली आहे. पहिलं पाऊल सुरतेला लागलं. शंभुराजे राजे देसाई आणि शहाजी पाटील या दोघांची पहिली इंट्री झाली. (हसत) मी सहज म्हटलं शंभुराजेंना, लढाई शंभर टक्के जिंकणार. बरं कसं आहे, घडतंय कशासाठी? उद्धव साहेबांना कुणाचाही विरोध नाही हां…त्यांना प्रत्येक आमदार आता सुद्धा देव माणूस मानतो. सर्वांच्या मनात आदर आहे उद्धव साहेबांविषयी. पण सर्वांची अडचण अशी आहे की आम्ही जगत नाही.
कार्यकर्ता: बरोबर
शहाजी बापू पाटील: अडीच वर्षापास्नं राष्ट्रवादी आणि काँग्रेस आमच्या आमदारक्या खातंया अन् उद्या भांडायचं झालं तर राष्ट्रवादी आमचे मतदारसंघ हाणतुया. आम्ही मोकळं राहतुया.
कार्यकर्ता: बरोबर, बरोबर
शहाजी बापू पाटील: हीच भावना प्रत्येकाची झाली आहे.
कार्यकर्ता: गोळा तरी किती झाले. टीव्ही तर 46 चा आकडा दाखवतंय, आता 47 सांगतंय.
शहाजी बापू पाटील: तुम्हाला सांगू का शिवसेनेचे 41 झालीत्या. अजून दोगं तिघं वाटेवर आहेत. 45 होतील. आणि अपक्षांची सात आठ होत आलीय. अन् अडीच वर्ष तुम्हाला सांगतो. तुमची जबाबदारी आहे. काय तालुक्याचा विकास होईल. आयला बघत राहावा, बघत राहावा तुमी. ऐतिहासिक विकास आपल्या तालुक्याचं होणार आहे. इतिहासाला आपल्या नावाची नोंद घ्यावी लागणार आहे.
कार्यकर्ता: आता सुद्धा आपण भरपूर केलंय. अजून भरपूर कामी बाकी आहेत. बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्यायचं बाकी आहे.
शहाजी बापू पाटील: अहो, अडीच वर्ष झालं ना फक्त. काय हाय लगा… पैसे आहेत का? फंड आहेत का? काय आहे वो…नुसतं सांगोला उपसा सिंचना योजनेला फक्त हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना हे नाव द्या, अशी मागणी केली. त्यासाठी 13-14 पत्रं मुख्यमंत्री कार्यालयाला झाली. त्या जयंतराव पाटील साहेब यांच्या कार्यालयाला झाली. त्याचा कोणी विचार करत नाही.
कार्यकर्ता: तुम्ही माग मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतही बोलला ना…
शहाजी बापू पाटील: स्पष्ट बोललो ना साहेबांना. काय खर्च होतूय. बरं दोन महिने झाले बैठक होऊन. आता तरी निर्णय कुठे आहे. त्या बैठकीत आपण बोललो. सर्व मुद्दे मांडले. साहेबांनी ऐकून घेतलं. पण रिझल्ट कुठे आहे.
कार्यकर्ता: परवा सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रं मागितले, ते पैसे मिळाले. मुख्यमंत्री साहेबांना नगरपालिकेच्या इमारतीचे 12 कोटी मागितले, त्याचं काय नाय.
शहाजी बापू पाटील: कायच व्हयना हो. फक्त तपासून अहवाल सादर करावा. तपासून अहवाल सादर करावा. ते गारगिल येतंय अन् साहेब खाली सही मारतंय. तातडीने अंमलबजावणी करावी. खाली उद्धव ठाकरे, साहेबांची अशी ऑर्डर कुठाय? धुरळा काढला असता आपण आतापर्यंत मतदारसंघात.
कार्यकर्ता: खरंय खरंय बरोबर
शहाजी बापू पाटील: आवं एवढी लढाई… गणपतराव देशमुख साहेबांचा तो मतदारसंघ हाय. देशाचं रेकॉर्ड केलेला माणूस आहे. 11 वेळा निवडून आलेल्या माणसाच्या मतदारसंघात 40 वर्ष झटतोय राव मी. मेलो मी. माझं घरदार बरबाद झालं. पाटलाची सून असून मह्या बायकोला लुगडं मिळना राव घालायला नीट. सोसायचं किती? कटाळा आलाय सोसायचाही. सोडायच्या मूडमध्ये मी होतो. मी मध्ये बोललो होतो. आयला राजीनामा देऊन भिकाम होतो राव. मला कटाळा आला याचा. काही तरी उद्योग धंदा करून जगलेलं बरं. दमू किती. एनएसआय चालवली. युवक काँग्रेस चालवली. राज्यभर फिरलो. राज्यातील कोणता तालुका आहे की जिथं माझं भाषण नाय. सर्व तालुका पिंजून काढले. घरदार सोडलं. ना गाड्या, ना काही. विठ्ठल पाटील होता साथीदार. काय सगळं उद्ध्वस्त झाल्यासारखं झालंय. चालतंय. बाकीचं काय?
कार्यकर्ता: बाकी इथं काय नाय. कधी घडणार, कधी पर्यंत?
शहाजी बापू पाटील: आता साहेब निर्णय घेणार. साहेबांच्या मनावं. पण एक सांगतो सरकार शंभर टक्के झालं. फडणवीस साहेब मुख्यमंत्री. एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री. मंत्रीपदाची चांगली संख्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळणार.
कार्यकर्ता: आपल्याला काय?
शहाजी बापू पाटील: आपल्याला काय दिलं… दिलं… नाय दिलं. फडणवीस साहेब मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री म्हणजे आपणच उपमुख्यमंत्री आहेत वो…. आता फडणवीस साहेब आणि माझं नातं तुम्हाला माहीत हाय. भावाभावासारखं नातं आहे. शिंदे साहेब मला मुलासारखं बघतोय. मुलाच्या नजरेनं बघतंय. लय प्रेमळ नजर त्या माणसाची माझ्यावर हाय हो.
कार्यकर्ता: जाऊ दे, यातनं एक घडंल आपल्या तालुक्याचा मात्र कायापालयट होईल.
शहाजी बापू पाटील: हां…मला मंत्रिपदात रस नाही. मला रस आहे, आपली कामं. कामच एवढी करू पुन्हा 40 हजार मतांनी निवडून येऊ. पुन्हा भांडू आम्हाला मंत्री करा. ही काय आता पाच पंचवीस वर्ष पुन्हा हालत न्हाईत.
कार्यकर्ता: बरोबर बरोबर.
शहाजी बापू पाटील: दिल्लीत सत्ता आहे. मोदी साहेबांनी मनात आणलं तर लाखो करोड महाराष्ट्राला द्यायची ताकद आहे त्या माणसात. आता निधीसाठी हे रडत बसले आहे. दिल्लीत जीएसटी दि नाय. दिल्ली असं करनाय… आरं तुमचं गणित चुकलंय इथं अन् दिल्ली काय द्यायची आता? चालतंय.
कार्यकर्ता: बाकी तब्येत व्यवस्थित आहे ना.
शहाजी बापू पाटील: आहे व्यवस्थित. वैभव काळजी घेतोय. बाबर साहेब आहेत. शंभुराजे आहेत. सर्व माझी काळजी घेतात. माझ्या तब्येतीची काळजी घेत आहेत.
कार्यकर्ता: चालतंय. सांगा मग कधी मुंबईत यायाचं. मी येतो.
शहाजी बापू पाटील: सांगतो मी आपल्या लोकांना. शरद पवारची पार्टी हा राजाच आहे हो. दिपक आबाचं प्रेम आहे. आबाविषयी ती माणसं चांगली आहे. अडचण नाय. पण पवार साहेब, अजित पवार कुठे आवडतोय हो आपल्या लोकांना… नाय आवडत. आपली लोकं नाराज आहेत त्यांच्यावर. त्यांना वाटतंय सांगोला आमचं. गणपतरावांच्या आधारावर बोलताहेत. (बरोबर) गणपतराव बापू तर राज्याचा… च्याआयला 55 वर्ष आमदार झालेला आमचा माणूस. मी कधी नेता बोललो नाय साहेबांना (खरंय खरंय) बापूच बोललो. गणपतरावांना नेता म्हणायचं… म्हाताऱ्याने मारलं असतं मला (हसत) मला नेता म्हणतूय का?
कार्यकर्ता: राजकारणात विरोध होता, पण आमदार साहेबांचा तुमच्यावर जीव होता.
शहाजी बापू पाटील: मला मुलगा मानलं त्यांनी. शेवटची भेट आठवतीय तुम्हाला? ऐतिहासिक भेट. माझ्या गालावरून हात फिरवून सांगितलं होतं.