प्रफुल्लभाई, तुम्ही एक चूक केली… भुजबळांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात शरद पवार असं का म्हणाले?
या देशात काश्मीर राहिलं त्यात फारुख अब्दुल्ला यांच्या वडिलांचं योगदान मोठं आहे. नंतर अब्दुल्ला काश्मीरचे मुख्यमंत्री होते. केंद्रात होते. त्यांची संपूर्ण निष्ठा भारतावर आहे. भारताच्या ऐक्यावर आहे.
मुंबई: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सत्कार सोहळ्याची सर्व सूत्रे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्यावर सोपवण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांचं मुक्तकंठाने कौतुक केलं. प्रफुल पटेलांवर सत्काराची जबाबदारी होती. प्रफुल्लभाई, तुम्ही सत्काराची तयारी केली. पण एक चूक केली. त्यांच्या डोक्यावर फुले पगडी घातली असती तर चांगलं झालं असतं, असं शरद पवार यांनी म्हणताच सभागृहात एकच खसखस पिकली. यावेळी शरद पवार यांनी भुजबळांच्या जीवनातील चढउतारही सांगितले.
याच सभागृहात भुजबळांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या स्थापनेचा निर्णय झाला. संध्याकाळी शिवाजी पार्कवर सभा झाली. त्याचे अध्यक्षही भुजबळ होते. या सभेला एक लाख लोक उपस्थित होते, असं शरद पवार म्हणाले.
गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात विकासाच्या कामाला प्रोत्साहन देणारा नेता म्हणून भुजबळांना आपण ओळखतो. शून्यातून माणूस कसा उभा राहतो, याचं आदर्श उदाहरण भुजबळ आहे. नाशिक सारख्या जिल्ह्यात जन्म झाला. व्यवसाय भाजी विक्रीचा. जन्मानंतर आई वडिलांचं सौख्य लाभलं नाही. मावशीचं प्रेम लाभलं. तिच्या आशीर्वादाने ते मोठे झाले.
पण त्यांना आयुष्यात खूप खस्ता खाव्या लागल्या. भायखळ्यात त्यांना कुणाकडून तरी तात्पुरतं दुकान विकत घेतलं होतं. ज्यांच्याकडून दुकान घेतलं होतं. त्यांना दुकान परत घ्यायचं होतं. दुकान घेतलं असतं तर भुजबळांसमोर दोन वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली होती. त्यावेळी थुके आणि पाटील यांनी मध्यस्थी करून त्यांना दुकान मिळवून दिलं, असा किस्साही त्यांनी यावेळी सांगितला.
दिल्लीत सर्व राज्य सरकारांची निवासस्थाने आहेत. पण सर्वात चांगलं निवासस्थान हे महाराष्ट्राचं आहे. ते काम भुजबळांनी केलं. महाराष्ट्र सदनने दिल्लीच्या सौंदर्यात भर घातली आहे. एखादं काम हातात घेतलं तर उत्तमच करायचं आणि नेटकंच करायचं हे त्यांनी नेहमी केलं, असंही ते म्हणाले.
या देशात काश्मीर राहिलं त्यात फारुख अब्दुल्ला यांच्या वडिलांचं योगदान मोठं आहे. नंतर अब्दुल्ला काश्मीरचे मुख्यमंत्री होते. केंद्रात होते. त्यांची संपूर्ण निष्ठा भारतावर आहे. भारताच्या ऐक्यावर आहे. हा राष्ट्रप्रेमी नेता आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिला याचा आनंद आहे, असं ते म्हणाले. पुणे विद्यापीठाचं नाव सावित्रीबाई फुले विद्यापीठ करण्यामागे भुजबळांचं मोठं योगदान आहे, असंही त्यांनी सांगितलं.