राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काका-पुतण्या पहिल्यांदाच एका मंचावर दिसणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे घडणार योग
या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी आणि शरद पवार संबोधित करणार आहेत. याशिवाय राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून भाजप आणि शिंदे गटाशी हातमिळवणी केली. त्यानंतर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादीच नव्हे तर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. पुतण्याने काकाला दगा दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच पुतण्या अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर आणि चिन्हावर दावाच सांगितल्याने आता हे प्रकरण निवडणूक आयोगापर्यंत गेलं आहे. अजित पवार यांनी थेट शरद पवार यांच्या राजकीय वर्चस्वालाच आव्हान दिल्याने काका आणि पुतण्यामध्ये वितुष्ट आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, हे बंड ताजं असतानाच अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर दिसणार असल्याची बातमी आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
पुण्यातील लोकमान्य टिळक स्मारक मंदिर ट्रस्टने येत्या 1 ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केलं आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या मेळाव्याला अजित पवार आणि शरद पवार यांनाही पाचारण करण्यात आलं आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच हे दोन्ही नेते खरोखरच एका मंचावर येणार की कार्यक्रमाला जाणं टाळणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नॅशनल अॅवार्ड मिळणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या ट्रस्टकडून लोकमान्य टिळक नॅशनल अॅवार्ड दिलं जाणार आहे. उत्कृष्ट नेतृत्व आणि जनतेत देशभक्तीची भावना निर्माण केल्याबद्दल मोदींना हा पुरस्कार दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण केली आहे. त्यामुळे भारताला वैश्विक स्तरावर मान सन्मान मिळत आहे. मोदींचं काम पाहूनच त्यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतल्याचं ट्रस्टने म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही येणार
येत्या 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची 103 वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने या सत्कार सोहळ्याचं आयोजन करणअयात आलं आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी आणि शरद पवार संबोधित करणार आहेत. याशिवाय राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने काका पुतणे पहिल्यांदाच एका मंचावर दिसणार असल्याने या सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.