मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी भेट घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे बंडखोर मदार शरद पवार यांच्या भेटीला आले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी आमदार शरद पवार यांच्या भेटीला आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आजची भेटही पूर्व नियोजित नव्हती. तरी सुद्धा हे आमदार पवार यांच्या भेटीला आले. आमदार येणार असल्याची माहिती मिळताच शरद पवारही सिल्व्हर ओकवरून थेट यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आले आहेत. त्यामुळे या बैठकीत नक्की काय होणार? अशी चर्चा आता सुरू आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आमदारांना घेऊन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आले आहेत. अजित पवार यांच्यासोबत एकूण 30 आमदार आहेत. तसेच काही मंत्रीही आहेत. अजित पवार यांच्यासह 9 जणांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शरद पवार गटाने या आमदारांना अपात्र करण्याची विनंती करणारं पत्र विधानसभा अध्यक्षांना दिलं आहे. त्यामुळे अजित पवार गटाचा पेच वाढला आहे. या मंत्र्यांना अपात्र करू नये. काही तरी तोडगा काढावा ही मागणी करण्यासाठी हे सर्व आमदार शरद पवार यांच्याकडे आले असल्याचं सांगितलं जात आहे. मंत्री अपात्र होऊ नये अशी भीती अजित पवार यांच्या मनात अस्लयानेच त्यांनी शरद पवार यांची सलग दुसऱ्या दिवशी भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, आज आमदार भेटायला येणार असल्याची माहिती शरद पवार यांना नव्हती, असंही सांगितलं जात आहे.
काल मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली. तसेच पक्ष अभेद्य राहावा, त्यासाठी तुम्हीच तोडगा काढा, अशी मनधरणी या मंत्र्यांनी शरद पवार यांच्याकडे केली होती. त्यावेळी शरद पवार यांनी काहीच भाष्य केलं नाही. आज 30 आमदारांना घेऊन अजित पवार आले आहेत. या सर्वच्या सर्व 30 आमदारांची भूमिका समजून घ्या, अशी विनंती अजित पवार यांनी या आमदारांना केली आहे. तसेच सर्व आमदार हे शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले आहेत, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
दरम्यान, शरद पवार, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या गेल्या अर्धा तासापासून बंददाराआड चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. अजित पवार आणि पटेल हे दोन्ही नेते शरद पवार यांच्याशी कोणत्या मुद्द्यावर चर्चा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार चव्हाण सेंटरवर आल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे सुद्धा बैठकीच्या ठिकाणी आले आहेत. या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील मीडियाशी संवाद साधणार आहे.