मुंबई : राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे. तर त्यांच्या 9 सहकाऱ्यांनाही मंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे. अजितदादांसोबत 43 आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. तर काही आमदार आणि खासदार परत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना येऊन मिळाले आहेत. मात्र, शरद पवार आणि अजित पवार यांच्या बाजूने किती आमदार आणि खासदार आहे याचा निश्चित आकडा अजूनही समोर आलेला नाही. आज शरद पवार यांनी आमदारांची बैठक बोलावली आहे. अजित पवार यांनीही मेळावा आयोजित केला असून त्यातूनच हे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शरद पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीच्या आमदार आणि खासदारांची बैठक पार पडणार आहे. शरद पवार यांची बैठक वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये दुपारी 1 वाजता होणार आहे. या बैठकीला पदाधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आलं आहे. त्यामुळे या बैठकीला कोणकोण आमदार आणि खासदार उपस्थित राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर बंड केल्यानंतर अजित पवार यांच्या गटाचा आजच मेळावा होणार आहे. अजित पवार गटाचा मेळावा भुजबळ सीटीला होणार आहे. त्यामुळे अजितदादांच्या या बैठकीला किती आमदार आणि खासदार उपस्थित राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आमच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे. 40 आमदार आमच्यासोबत आहेत. त्याचबरोबर तीन अपक्ष आमदारही आमच्यासोबत आहेत. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहील, असं आमदार अमोल मिटकरी म्हणाले.
दरम्यान, उद्याच्या बैठक आणि मेळाव्यासाठी दोन्ही गटाकडून व्हीप काढण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांची अडचण झाली आहे. अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी आमदारांसाठी व्हीप काढला आहे. सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे. विधीमंडळातील गटनेता या नात्याने नोटीस पाठवण्यात आली आहे. दोन्ही गटाकडून नोटीस आल्याने आता आमदार कोणत्या बैठकीला जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.