Madha loksabha : माढ्यात तुतारीच, शेतकरी 11 बुलेटची पैज लावायला तयार, भाजपाकडून चॅलेंज कोण स्वीकारणार?
Madha loksabha : शेतीतून असही काही मिळत नाही, त्यामुळे शेती विकून बुलेटची पैज लावायला हे दोन्ही बंधु तयार आहेत. भाजपाला विजयाची गॅरेंटी असेल, तर त्यांनी हे आव्हान स्वीकराव असं योगेश पाटील आणि निलेश पाटील बंधुंनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण झाले आहेत. सर्व 48 लोकसभा मतदारसंघात मतदान झालय. आता निकालाची 4 जूनची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. मात्र, त्याआधी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात उमेदवार कोण जिंकणार? यावरुन पैजा लागण्यास सुरुवात झाली आहे. सोलापूरमध्ये मविआच्या प्रणिती शिंदे की, महायुतीचे राम सातपुते जिंकणार? यावरुन लाखाची पैज लागली आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातील आणखी एक चर्चेत आलेले मतदारसंघ म्हणजे माढा. माढ्यामध्ये भाजपाचे रणजीतसिंह निंबाळकर विरुद्ध शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील असा सामना आहे. माढ्यामध्ये यावेळी अत्यंत काँटे की टक्कर पहायला मिळतेय. अगदी अटीतटीचा सामना आहे. पवार गटाच्या तुतारी चिन्हावर उभे असलेले धैर्यशील मोहिते पाटील बाजी मारणार असा काहींना विश्वास आहे.
धैर्यशील मोहिते पाटील जिंकणार यावर ठाम असलेल्या दोन शेतकरी बंधुंनी 11 बुलेटची पैज लावण्याची ऑफर दिली आहे. योगेश पाटील आणि निलेश पाटील अशी या दोन युवा शेतकऱ्यांची नाव आहेत. “दहावर्षात भाजपा सरकारने शेतकऱ्यांची पिळवणूक केली. कांदा, वाढती महागाई, औषध, खतं, जीएसटी याचा शेतकऱ्याला फटका बसला” असं निलेश पाटील म्हणाले. “शरद पवार देशाचे कृषीमंत्री असताना शेतकऱ्याला असा त्रास झाला नव्हता. म्हणून पवारांच्या तुतारीला निवडून आणायच धेय्य आहे. 70 टक्के मतदान तुतारीला झालय. माढा तालुक्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना 30 ते 40 हजाराचा लीड मिळेल” असा विश्वास निलेश पाटीलने व्यक्त केला. शेती विकून बुलेटची पैज
11 बुलेटची पैज का? यावर बुलेट ही शेतकऱ्याची हौशेची गोष्ट असल्याच उत्तर दिलं. शेतीतून असही काही मिळत नाही, त्यामुळे शेती विकून बुलेटची पैज लावायला हे दोन्ही बंधु तयार आहेत. भाजपाला विजयाची गॅरेंटी असेल, तर त्यांनी हे आव्हान स्वीकराव असं त्यांनी म्हटलं आहे. माढ्यातून रणजीतसिंह निंबाळकर विद्यमान खासदार आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांना तिकीट मिळालं नाही. म्हणून निवडणुकीच्या काही दिवस आधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी हाती घेतली.