पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीनंतर आता शरद पवारांची दिल्लीवारी, संपूर्ण राज्याचं लक्ष
मोदी-ठाकरे भेटीच्या पार्श्वभूमीवर पवारांचा हा दिल्ली दौरा महत्वाचा मानला जात आहे. आपल्या दिल्ली दौऱ्यात पवार कोणत्या नेत्यांना भेटणार याकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीतील भेटीनंतर राज्यात मोठ्या राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. त्यावेळी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये अर्धा तास वैयक्तिक भेटही झाली होती. या भेटीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा राजधानी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. केरळमधील प्रमुख नेत्यांशी पवार यांची भेट होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, मोदी-ठाकरे भेटीच्या पार्श्वभूमीवर पवारांचा हा दिल्ली दौरा महत्वाचा मानला जात आहे. आपल्या दिल्ली दौऱ्यात पवार कोणत्या नेत्यांना भेटणार याकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. (Sharad Pawar’s visit to Delhi, attention of political circles)
राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं सातत्याने बोललं जात आहे. त्यातच आज शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेनेला कमकुवत करत असल्याचा खळबळजनक दावा केलाय. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडीची चर्चा आता जोर धरु लागली आहे. अशावेळी पवारांचा दिल्ली दौऱ्याकडे महाविकास आघाडीतील घटकपक्षांसह भाजपचंही लक्ष लागलं आहे. पवार आपल्या दिल्लीवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. इतकंच नाही तर सध्यस्थितीत पवारांची दिल्लीवारी म्हणजे राजकारणात नक्कीच काहीतरी शिजत असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांचा आहे.
पवारांकडून शिवसेनेचं तोंडभरुन कौतुक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी शरद पवार यांनी शिवसेनेचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची पार्श्वभूमीवर होती. “शिवसेनेसोबत आपण कधी काम केलं नाही. पण हा महाराष्ट्र शिवसेनेला काम करताना गेली अनेक वर्षांपासून पाहतोय. माझं स्वत:चा यापूर्वीचा अनुभव एक विश्वास असावा असाच आहे. एक साधं उदाहरण सांगतो, ज्यावेळेला देशात जनता पक्षाची सत्ता आली. त्यावेळी सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला असतानाही अशा स्थितीत काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला. तो राजकीय पक्ष म्हणजे शिवसेना. शिवसेना फक्त पुढे आली नाही, तर त्यांनी धोरणात्मक निर्णय घेतला की, या निवडणुकीत इंदिरा गांधी यांना विजयी करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार देणार नाही”.
“तुम्ही विचार करा की, विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि पक्षाचा नेता असा निर्णय घेतो की, आम्ही निवडणुकाच लढणार नाही. त्या नेत्याची स्थिती काय होईल. पण त्याची चिंता कधी बाळासाहेब ठाकरेंनी बाळगली नाही. त्यांनी शब्द दिला होता आणि तो त्यांनी पाळला, हा इतिहास विसरता येत नाही. त्यामुळे कुणी काहीही शंका घेतली तरी शिवसेनेनं ज्या पद्धतीने, ज्या कालखंडात ही ठाम भूमिका घेतली, ती भूमिका ते बदलतील असे आडाखे कुणी बांधत असेल तर ते वेगळ्या नंदनवनात राहतात, एवढंच मी सांगेल. हे सरकार ५ वर्षे टिकेल, काम करेल. फक्त ५ वर्षे नाही तर आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अधिक जोमाने एकत्र काम करुन सामान्य जनतेचं प्रभावीपणे देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही”, असं भाकीतही पवारांनी त्यावेळी केलं होतं.
शरद पवार, प्रशांत किशोर भेट
राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानंतर शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांची सिल्व्हर ओकवर बैठक झाली होती. या बैठकीत देशात भाजपविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याबाबत चर्चा झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. तर शिवसेनेकडून या भेटीचं स्वागत करण्यात आलं होतं. देशात एककल्ली कारभार सुरु आहे. देशहितासाठी चांगला विरोधी पक्ष आणि पर्याय आवश्यक आहे. काँग्रेसच्या वाताहातीमुळं भाजपचं फावलं. राजकारणात सर्वाधिक अनुभवी आणि अभ्यासू शरद पवार आहेत. बाळासाहेबांनाही राष्ट्रीय पातळीवर मराठी माणूस हवा होता. महाविकास आघाडी ही शरद पवारांच्या नेतृत्वात निर्माण झालीय. त्यामुळं शरद पवार पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच होईल, असं अरविंद सावंत म्हणाले होते.
संबंधित बातम्या :
प्रताप सरनाईकांनी लेटर लिहून ‘लहान तोंडी मोठा घास’ घेतला आहे का?; वाचा 5 मोठे मुद्दे
Sharad Pawar’s visit to Delhi, attention of political circles