भर पावसातली शरद पवारांची सभा, लोकांनी खुर्च्या डोक्यावर घेतल्या; श्रेय कुणाला? दिलखुलास मुलाखतीत उत्तर दिलं…
2050 चा भारत कसा असेल यावर बोलताना शरद पवार म्हणाले, इथल्या युवापिढीला कर्तृत्व दाखवण्याची संधी द्या.. तर भारत जागतिक पातळीवर एक मोठा देश असेल..
बारामती, पुणे : 2019 च्या विधानसभा निवडणुकांवेळी साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतलेली सभा. भाषण ऐन रंगात असताना धो धो कोसळलेला पाऊस, स्टेजवरून ना शरद पवार हलले ना समोर उभे असलेले हजारो प्रेक्षक. ऐकताना पावसाचा अडथळा येऊ नये म्हणून लोकांनी खुर्च्या डोक्यावर घेतल्या, पण भाषण संपेपर्यंत कुणीही तिथून हललं नाही. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात लक्षात ठळक नोंद असलेली ही सभा आज एका मुलाखतीच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आली. निमित्त होतं बारामतीत झालेल्या मुलाखतीचं. विद्या प्रतिष्ठानच्या तारांगण युवा महोत्सवात विद्यार्थ्यांनी शरद पवार यांना अनेक सामाजिक आणि राजकीय प्रसंगांवर आधारीत प्रश्न विचारले आणि शरद पवार यांनीही दिलखुलास उत्तरं दिली.
पावसातल्या सभेचं श्रेय कुणाला?
पावसात्या सभेची आठवण सांगताना शरद पवार म्हणाले, त्या सभेचं श्रेय माझ्याकडे नाही.मी बोलायला उभं राहिलो पाऊस आला.. मला वाटलं आता सभा संपली.पण लोकांनी खुर्च्या डोक्यावर घेतल्या. तेव्हा माझ्या लक्षात आलं की लोकांना ऐकायचंय. मग मी बोललो. लोकांनी ऐकलं आणि आमचा उमेदवारही निवडून दिला.
हिंजवडीत साखरकारखाना?
हिंजवडी आयटीपार्क प्रमाणे बारामतीतदेखील आयटी पार्क उभे राहू शकेल का, यावर शरद पवार यांनी हिंजवडी आयटी पार्क उभे राहण्यापूर्वीची एक आठवण शरद पवार यांनी सांगितली. ते म्हणाले, ‘ बारामतीत तशा १०-२० कंपन्या आल्या तर सुरु होवू शकेल. मला हिंजवडीत एका साखर कारखान्याच्या भूमीपूजनाला बोलवलं तेव्हा शेतकरी जमले.. मी भाषणाला उभं राहिलो.. मी सांगितलं इथं साखर कारखाना होणार नाही.. इथे मला आयटी पार्क सुरु करायचं असं जाहिर केलं. जवळपास २ लाख मुलांना रोजगार मिळेल. इथे तसं काही करता येईल का हे पाहतोय. राज्य आणि केंद्र सरकारच्या काही परवानग्या आवश्यक आहेत.
कमी मार्कांची चिंता करू नका…
शरद पवार यांनी विद्यार्थ्यांना यावेळी मोलाचा सल्ला दिला. शैक्षणिक क्षेत्रात कष्ट करताना कमी मार्क मिळाले म्हणून चिंता करू नका. फार चांगले गुण मिळाले तो विद्यार्थी यशस्वी होतो असे नाही. ३५ % गुण मिळवणारा विद्यार्थीही यश मिळवतो ही मी अनुभवले आहे. कोणत्याही क्षेत्रात गेलात तर वाहून घ्या.त्यात कितीही संकटं आली तरी मागे हटू नका. यश नक्की मिळेल. सोशल मीडियावरही शरद पवार म्हणाले, याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.. इथे काय चांगलं काय वाईट याचं तारतम्य ठेवणं आवश्यक आहे. 2050 चा भारत कसा असेल यावर बोलताना शरद पवार म्हणाले, इथल्या युवापिढीला कर्तृत्व दाखवण्याची संधी द्या.. तर भारत जागतिक पातळीवर एक मोठा देश असेल..