Sharad Pawar Live : त्यांच्याकडे बोलायला काही नाही, शरद पवारांनी पुन्हा राष्ट्रवादीतल्या ओबीसी, आदिवासी नेत्यांची यादी वाचली, फडणवीस बोलणार?
राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या आरोपांवर आज शरद पवार यांना विचारणा केली असता पवारांनी राष्ट्रवादीचं नेतृत्वत केलेल्या ओबीसी आणि आदिवासी नेत्यांची यादी वाचली. तसंच पक्षाची निती एका जातीभोवती सीमित नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार हल्ला चढवलाय. शरद पवार यांनी जातीपातीचं राजकारण केलं. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राज्यात जातीयवाद फोफावला, असा घणाघात राज ठाकरे यांनी केलाय. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी देवेंद्र फडणवीस यांनी धडाधड 14 ट्वीट करत शरद पवारांच्या वक्तव्याचा संदर्भ देत मुस्लिमांचं लांगुलचालन आणि जातीवादाचा आरोप केला. राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या आरोपांवर आज शरद पवार यांना विचारणा केली असता पवारांनी राष्ट्रवादीचं नेतृत्वत केलेल्या ओबीसी आणि आदिवासी नेत्यांची यादी वाचली. तसंच पक्षाची निती एका जातीभोवती सीमित नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. शरद पवार आज जळगाव दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांबाबत पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार म्हणाले की, ‘मला काही समजत नाही. जातीवाद त्यांनी माझ्या नावावर टाकलाय. कशामुळे टाकलाय समजत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला त्यावेळी पहिल्यांदा राज्यात पक्षाचं नेतृत्वत छगन भुजबळांकडे होतं. त्यानंतर मधुकर पिचड, अरुण गुजराती, सुनील तटकरे, ही सगळी नावं समाजातील सगळ्या घटकांना घेऊन जाणारी आहेत. पक्षाची निती एका जातीच्या भोवती सीमित आहे असं काही दर्शवत नाही. त्यांच्याकडे दुसरं काही नसल्यामुळे ते असे आरोप करत आहेत’.
‘सामाजिक ऐक्य संकटात येईल का याची चिंता वाटते’
एखाद दोन व्यक्ती सोडले तर असं राजकारण करावं असा म्हणणारा राजकीय पक्ष मला दिसत नाही. एकच आहे ज्यांच्या हातात देशाची सूत्रे आहेत. असा राजकारणी एखादी व्यक्ती टोकाची भूमिका घेऊन जात असेल त्याला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष समर्थन देण्याची भूमिका घेतली हे काळजी करण्यासारखं आहे. या सर्व कार्यक्रमात सामाजिक ऐक्य संकटात येईल का याची चिंता वाटते. काही झालं तरी महाराष्ट्र एकसंघ झाला पाहिजे. सर्वात सामंजस्य असलं पाहिजे. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यापासून आपण बाजूला जातोय ही काळजी करण्याची गोष्ट आहे, अशी चिंताही पवारांनी व्यक्त केलीय.
‘सत्ता गेल्यानं केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर’
देशात दोन राज्यात केंद्राच्या एजन्सीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र. ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे. त्यांना काही करून सत्ता हातात हवी होती. त्यांना लोकांनी सत्ता दिली नाही, त्यामुळे त्यांचा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे हस्तक्षेप कसा करता येईल, या कामाला लागले आहेत. त्यामुळे छापेमारी होत आहे, असा गंभीर आरोपही पवारांनी केंद्र सरकारवर केलाय.
इतर बातम्या :