Sharad Pawar : शिवसेनेच्या मतदारसंघात जाण्याचा विचारही केला नाही, एकनाथ शिंदे गटाचा राष्ट्रवादीवरील आरोप पवारांनी फेटाळला, राज्यपालांवरही निशाणा
महाविकास आघाडीने एकत्र लढावे अशी माझी इच्छा आहे. पण मी हे अजून माझ्या पक्षात बोललो नाही आणि काँग्रेससोबतही बोललो नाही, असंही शरद पवार यांनी सांगितलं. ते आज औरंगाबादेत बोलत होते.
औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून शिवसेना संपवण्याचा घाट घातला जात होता. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात जाऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांना बळ देण्याचं काम करत होते, राष्ट्रवादीचे आमदार आणि नेत्यांनाच अधिक निधी दिला जात होता, असा गंभीर आरोप एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या गटातील आमदारांकडून केला जातोय. या आरोपाला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उत्तर दिलंय. शिवसेनेच्या मतदारसंघात जाण्याचा आम्ही विचारही केला नाही, असं पवार म्हणाले. त्याचबरोबर महाविकास आघाडीने एकत्र लढावे अशी माझी इच्छा आहे. पण मी हे अजून माझ्या पक्षात बोललो नाही आणि काँग्रेससोबतही बोललो नाही, असंही शरद पवार यांनी सांगितलं. ते आज औरंगाबादेत बोलत होते.
‘बंडखोरीच्या निर्णयाला काहीही आधार नाही’
पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, आज मी तुमच्याशी गप्पा मारायला आलोय. प्रश्न तर नेहमीच विचारता पण आज चर्चा करायची आहे. पवार पुढे म्हणाले की, मध्यावधी निवडणुका होतील असं मी म्हणालोच नव्हतो. फक्त कामाला लागा असं सांगितलं होतं. बंडखोरीच्या निर्णयाला काहीही आधार नाही. लोकांना काहीतरी सांगायचं म्हणून सांगत आहेत, अशी टीकाही पवार यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांवर केलीय.
शरद पवारांचा राज्यपालांवरही निशाणा
शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. राज्यपालांना अधिक कष्टदायी काम असल्यामुळे त्यांनी वर्षभर अध्यक्ष निवडीचा निर्णय घेतला नव्हता. पण हे सरकार आल्यानंतर 48 तासांत तोच निर्णय घेण्यात आला. पदाची प्रतिष्ठा वाढवणारे राज्यपाल राज्याला मिळाले, पण हे राज्यपाल… अशा शब्दात पवारांनी राज्यपालांवर टीका केलीय.
‘औरंगाबादच्या दृष्टीने इतर महत्वाच्या गोष्टी केल्या असत्या’
किमान समान कार्यक्रमात औरंगाबादचं नाव बदलण्याचा मुद्दा नव्हता. पण जेव्हा निर्णय झाला त्यानंतर आम्हाला हे सांगितलं गेलं. एकदा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री यांचा निर्णय अंतिम असतो. नाव बदलण्याचा मुद्द्यावर मतं व्यक्त केली गेली. पण हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी अंतिम निर्णय म्हणून घेतलाय. औरंगाबादच्या दृष्टीने इतर महत्वाच्या गोष्टी केल्या असत्या तर चांगलं झालं असतं, अशा शब्दात पवार यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केलीय.
‘शिवसेनेनं बंडात लक्ष घातलेलं दिसत नाही’
बंडाबाबत बोलताना पवार म्हणाले की, यापूर्वी बंड झाले तेव्हा परिस्थिती वेगळी असायची. पण यावेळी शिवसेनेनं त्यात लक्ष घातलेलं दिसत नाही. न्यायालयाच्या निर्णयावरही पवारांनी भाष्य केलं. न्यायालयाच्या व्यवहाराबाबत कपिल सिब्बल यांनी धक्का बसला अशी प्रतिक्रिया दिलीय. त्यामुळे न्यायालयाच्या व्यवहाराबाबत अनेकजण चिंता व्यक्त करत आहेत. पण त्याबाबत माझ्याकडे जास्त माहिती नाही, असं पवार म्हणाले.