Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : रात्रीस खेळ चाले… आरोपप्रत्यारोप, आक्षेप; शरद पवार म्हणतात, हा तर रडीचा डाव
Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. यावेळी त्यांना शिवसेना आमदार सुहास कांदे यांचं मत बाद झाल्याबाबतही विचारण्यात आलं.
मुंबई: राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) मतमोजणीच्या आधी आरोपप्रत्यारोपा, आक्षेपाचं राजकारण रंगलं. भाजपने आघाडीच्या तीन आमदारांच्या मतांवर हरकत घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. त्यामुळे संध्याकाळी 5 वाजता सुरू होणारी मतमोजणी रात्री दीड दोनच्या सुमारास सुरू झाली. रात्री 8 वाजता लागणारा राज्यसभेचा निकाल मध्यरात्री 3 वाजता लागला. भाजपच्या या रात्रीस खेळ चालेच्या राजकारणावर आघाडीच्या (maha vikas aghadi) नेत्यांनी जोरदार टीका केली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनीही या प्रकारावर टीका केली आहे. निकाल यायला रात्री उशिर झाला. त्यासाठी जी हरकत घेतली तो रडीचा खेळ होता. राज्यसभेच्या निवडणुकीचा नियमानुसार मतदाराने पक्षाच्या नेतृत्वाला मत दाखवण्याचा अधिकार आहे. जर कुणी मत दाखवलं तर बेकायदेशीर काही नाही. तोच निकाल आयोगाने दिला. त्यासाठी चार तास उशिर झाला, अशी टीका शरद पवार यांनी केली.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. यावेळी त्यांना शिवसेना आमदार सुहास कांदे यांचं मत बाद झाल्याबाबतही विचारण्यात आलं. त्यावर, कांदेंचं मत का बाद झालं ते मला माहीत नाही. त्यांनी नेमकं काय केलं याची माझ्याकडे माहिती नाही. मी माहिती घेतो, असं शरद पवार म्हणाले.
रिस्क घ्यावीच लागते
ही निवडणूक ईजी नव्हती. रिस्क राजकारणात घ्यावी लागते. ही रिस्क उद्धव ठाकरेंनी घेतली. अतिशय कमी मते असताना उद्धव ठाकरेंनी सहावी जागा लढवली. तरीही आघाडीने 33 ते 34 मतांपर्यंत मजल मारली, असं पवार म्हणाले. सहाव्या सीट निवडून आणण्याच्या मतांमध्ये मोठा गॅप होता. आमच्याकडे सहाव्या मतांसाठीची संख्या कमी होती. तरीही आम्ही धाडस केलं. प्रयत्न केला. सहाव्या सीटसाठी भाजपकडे संख्या अधिक होती. तरीही आघाडी आणि भाजपकडे विजयासाठीची मते पुरेशी नव्हती. पण आम्हाला पाठिंबा देणाऱ्या आमदारांना आपल्याकडे वळवण्यात आले, असंही त्यांनी सांगितलं.
उद्या दिल्लीला जाणार
यावेळी त्यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबतही विचारण्यात आले. त्यावर आम्ही याबाबत एकत्रं बसणार आहे. त्यासाठी मी उद्या दिल्लीत जाणार आहे. त्यानंतर आम्ही सर्व विरोधी पक्षाचे नेते एकत्र बसू. त्यानंतर चर्चा होईल, असं त्यांनी सांगितलं.