‘मात्र असं कधी घडेल, मला स्वप्नात वाटलं नव्हतं’, बारामतीमध्ये शरद पवारांच वक्तव्य
"सत्ता येते आणि जाते. परंतु सामान्य माणसासाठी काय भूमिका घेतली हे महत्वपूर्ण आहे. अनेकांना वाटलं 56 मधले 50 गेले, परंतु सगळे पराभूत झाले. पुन्हा राज्यात 71 आमदार निवडून आले" शरद पवार म्हणाले.
महाराष्ट्रातील दिग्गज नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत आज आंबेगाव-शिरूरमधील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार देवदत्त निकम यांच्या मतदारसंघातील आढावा बैठक पार पडली. यावेळी शरद पवार यांनी भाषण करताना काही मुद्दे मांडले. “यावेळची निवडणूक महत्वाची आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केलीय. दुसऱ्या बाजूला भाजपा, राष्ट्रवादी, आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवित आहेत” असं शरद पवार म्हणाले. “पुणे जिल्हा खूप मोठा आहे. सत्ता पक्षाने दिली त्या सत्तेसाठी लोकांनी साथ दिली. मात्र ज्यांना निवडून दिलं, ते लोकांना विसरले” असं म्हणत नाव न घेता शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.
“राष्ट्रवादी काँग्रेसच्या 54 आमदारांपैकी 44 आमदार दुसरीकडे पळवून नेले. त्यात आंबेगावमधील आमदार देखील होते” असं शरद पवार म्हणाले. “मी दिल्लीत काम करण्याचे ठरविले आणि राज्यात नेतृत्व करण्याची संधी दिली. मात्र असं कधी घडेल, मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. परंतु ते घडलं” असं राष्ट्रवादी काँग्रेस फुटीवर शरद पवार यांनी वक्तव्य केलं. त्यांनी नाव न घेता अजित पवारांवर टीका केली.
‘आता वेळ आलीय’
“सत्ता येते आणि जाते. परंतु सामान्य माणसासाठी काय भूमिका घेतली हे महत्वपूर्ण आहे. अनेकांना वाटलं 56 मधले 50 गेले, परंतु सगळे पराभूत झाले. पुन्हा राज्यात 71 आमदार निवडून आले. काय घडलंय याची चिंता करायची नाही. आता वेळ आलीय” असं शरद पवार म्हणाले. “देवदत्त निकम यांनी दहा वर्षे भीमा सहकारी कारखाना उत्तम चालविला. 250 कारखाने देशाचे प्रमुख पद दिलीप वळसे यांना दिलय. मी माझा प्रामाणिक दाखविला. जो प्रामाणिकपणे काम करतो, त्याला लोक साथ देतात” असं शरद पवार म्हणाले.
‘पुणे जिल्ह्याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे’
“पाच वर्षापूर्वी ज्या निवडणुका झाल्या तेव्हा राष्ट्रवादी एक होती. राज्यातील जनतेने 53-54 जागा दिल्या. आपण सरकार स्थापन केलं. त्या सरकारमध्ये पुणे जिल्ह्यातील दोन लोकांची निवड केली गेली. एक बारामतीचा प्रतिनिधी आणि दुसरा अंबेगावचा प्रतिनिधी. त्यांना वरच्या जागा दिल्या. मंत्रिमंडळाचा दर्जा दिला. तिसरी जागा इंदापुरात दिली. पुणे जिल्ह्याला यापूर्वी तीन जागा मिळाल्या नव्हत्या. पण त्या आपण दिल्या. ही संधी मिळाली. जिल्ह्याच्या हातात महत्त्वाची संधी आली. राज्याचे प्रश्न सोडवले पाहिजे. पुणे जिल्ह्याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे” असं शरद पवार म्हणाले.