राष्ट्रवादी अंधेरी पूर्व विधानसभा लढणार की शिवसेनेला पाठिंबा?; शरद पवारांची मोठी घोषणा
भारत जोडो हा कार्यक्रम काँग्रेसचा आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आहे. त्यांच्या पक्षातील नेते त्यात सहभागी होतील. त्यांच्या कार्यक्रमात इतर पक्षांनी सहभागी व्हावं असं नाही.
पुणे: मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे जागा रिक्त झाल्याने ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत शिवसेना (shivsena) विरुद्ध भाजप (bjp) किंवा शिवसेना विरुद्ध शिंदे गट अशी लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, या निवडणुकीत महाविकास आघाडीचा काय रोल राहणार? अशी चर्चा आहे. या चर्चेपूर्वीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची काय भूमिका असणार? असा सवाल करण्यात आला. त्यावर आम्ही शिवसेनेला सहकार्य करणार असल्याचं शरद पवार यांनी सांगून टाकलं. त्यामुळे आता काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या एका विधानावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आमच्याकडे 2014ला कोणीच प्रस्ताव दिला नाही. राष्ट्रवादीला कोणी प्रस्ताव दिला असेल तर त्याची मला माहिती मिळाली असती. निर्णय घेण्याचा आमच्या नेत्यांना अधिकार आहे. पण कमीत कमी ते माझ्या कानावर घालतात. अशोक चव्हाण जे बोलले ते मी कधीच ऐकलं नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्याव अशी मागणी आहे त्यांवर राष्ट्रवादीची भूमिका काय? असं विचारलं असता, आम्ही कधीही अशी मागणी केलेली नाही. निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असं त्यांनी सांगितलं.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो अभियान सुरू आहे. ही रॅली महाराष्ट्रातही येणार आहे. या रॅलीत सहभागी होणार का? असा सवाल केला असता पवारांनी त्यावरही भाष्य केलं.
भारत जोडो हा कार्यक्रम काँग्रेसचा आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आहे. त्यांच्या पक्षातील नेते त्यात सहभागी होतील. त्यांच्या कार्यक्रमात इतर पक्षांनी सहभागी व्हावं असं नाही. तशी आम्हाला काही सूचना आलेली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.