शरद पवार आणि अजितदादांसमोरच नेत्यांची जुंपली; सुप्रिया सुळेंची कुणाशी खडाजंगी?
पुण्यातील डीपीडीसीच्या बैठकीच्या निमित्ताने आज शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र आले होते. पण यावेळी या तिन्ही नेत्यांचं काहीच संभाषण झालं नसल्याचं सांगितलं जात आहे. लोकसभा आणि विधान परिषद निवडणुकीनंतर हे तिन्ही नेते पहिल्यांदाच एकत्र आले होते. त्यामुळे त्यांच्यात काय संवाद होतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
पुण्यात डीपीडीसीची बैठक सुरू आहे. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवारही उपस्थित आहेत. निधी वाटपासंदर्भातील या बैठकीत अजितदादा आणि शरद पवार यांच्यासमोरच सुप्रिया सुळे आणि आमदार सुनील शेळके यांच्यात जुंपली. मावळलाच निधी मिळतो, बारामतीला निधी मिळत नाही, अशी तक्रार सुप्रिया सुळे यांनी केली. त्याला शेळके यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात डीपीडीसीची बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार, सुप्रिया सुळे, आमदार सुनील शेळके आणि इतर आमदार उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी निधी वाटपावर आक्षेप घेतला. आम्हाला न्याय मिळणार का? का फक्त मावळलाच निधी मिळणार. बारामती आणि शिरुरला निधी दिला जात नाही. मावळलाच निधी दिला जातो, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
फक्त बैठकीलाच यायचं का?
मावळला निधी दिला जातो. याचं स्वागत आहे. पण आम्हाला का दिला जात नाही? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला. त्याला सुनील शेळके यांनी आक्षेप घेतला. ताई आम्ही बारामती बारामती करत नाही. तुम्ही सारख मावळचा उल्लेख करत आहात, असं प्रत्युत्तर सुनील शेळके यांनी दिलं. त्यावर आम्ही काय फक्त बैठकीला यायचं का? असा पलटवार सुप्रिया सुळे यांनी केला.
तिघे पहिल्यांदाच एकत्र
दरम्यान, बऱ्याच महिन्यानंतर शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे तिन्ही नेते एकत्र आले. लोकसभा आणि विधान परिषद निवडणुकीनंतरची या तिघांची ही पहिलीच भेट आहे. त्यामुळे या भेटीवरून तर्कवितर्क लढवले जात आहे. डीपीसीडीसीच्या बैठकीच्या निमित्ताने हे तिन्ही नेते एकत्र आले. पण अजितदादा आणि शरद पवार यांच्यात संभाषणही झालं नसल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
दोन दिवसांपूर्वीच अजितदादांना पक्षात घेणार का? असा सवाल पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला होता. त्यावेळी शरद पवार यांनी नाही असं म्हटलं होतं. कोणताही निर्णय घेताना आमच्या पक्षातील सहकार्यांना विचारूनच निर्णय घेतला जाईल. कारण कठिण प्रसंगात ते आमच्यासोबत होते, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.