Sharad Pawar : 82 वर्षाचा तरुण आघाडीचा किल्ला लढवणार, मुंबईतील सभेला शरद पवार करणार मार्गदर्शन; रडारवर कोण?
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आता महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांना मार्गदर्शन करणार आहेत. मुंबईत होणाऱ्या सभेला शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे या सभेकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीला एक वर्ष बाकी असतानाच महाविकास आघाडीने या निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाविकास आघाडीने राज्यात ठिकठिकाणी सभा घेऊन वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी संभाजीनगरात वज्रमूठ सभा पार पडली. आता नागपुरातही सभा होत आहे. त्यानंतर पुढील महिन्यात मुंबईतही सभा होणार आहे. संभाजीनगरच्या सभेला शरद पवार उपस्थित नव्हते. नागपूरच्या सभेलाही पवार उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात असतानाच मोठी बातमी आली आहे. शरद पवार मुंबईत होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेला उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
येत्या 1 मे रोजी महाविकास आघाडीच मुंबईत सभा होत आहे. या सभेला शरद पवार संबोधित करणार आहेत. तर 16 एप्रिल रोजी नागपुरात महाविकास आघाडीची सभा होत आहे. त्या सभेला पवार उपस्थित राहणार नाही. मात्र, पवारांनी कार्यकर्त्यांना या सभेला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नागपूरची सभा अतिभव्य होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मभूमीतच ही सभा होत असल्यानेही या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
उद्धव ठाकरे यांची शिष्टाई?
दरम्यान, शरद पवार हे संभाजीनगरच्या सभेला उपस्थित नव्हते. नागपूरच्या सभेलाही उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. सत्ताधाऱ्यांनीही पवार या सभेला नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं होतं. आघाडीत बेबनाव असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला होता. त्यानंतर काल उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथे जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सहा तास चर्चा झाली. या सहा तासाच्या चर्चेवेळी उद्धव ठाकरे यांनी पवारांना महाविकास आघाडीच्या सभेला येण्याची गळ घातली. त्यामुळे पवार सभेला यायला तयार झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
काँग्रेसचा बडा नेता मुंबईत
पवार आणि ठाकरे यांच्यात भेट झाल्यानंतर आता महाविकास आघाडीत समन्वय घडवण्याची तयारी सुरू आहे. काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाल पुढील आठवड्यात मुंबईत येणार आहेत. यावेळी ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. आगामी निवडणुकांची व्यूहरचना आणि सर्व विरोधी पक्षांत एकजूट- समन्वय राखण्यासाठी काल रात्री शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये झाली प्रदीर्घ चर्चा झाली. विरोधी पक्षांत विविध मुद्द्यांवर असलेल्या मतभिन्नतेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे-पवार भेटीला महत्त्व आलं आहे. महाविकास आघाडीत महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांकडे निर्णय-भूमिका घेण्याचे अधिकार नसल्याने अनेकदा होते कोंडी होते. त्यामुळे ही कोंडी फोडण्यासाठी के सी वेणूगोपाल मुंबईत येत असल्याचं सांगितलं जात आहे.