Sharad Pawar : ‘…मग मिटकरी, भुजबळांनी दिलगिरी का व्यक्त केली नाही?’ आनंद दवे यांचा शरद पवारांना सवाल
पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी आपली बाजू मांडली. तेव्हा ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांच्यावर पवारांनी निशाणा साधला. त्यानंतर आता आनंद दवे यांनीही पवारांना उत्तर दिलं आहे.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर ब्राह्मणविरोधी असल्याचा आरोप केला जातो. राज ठाकरेंची टीका, अमोल मिटकरींचं वक्तव्य आणि केतकी चितळे प्रकरणानंतर त हा विषय प्रकर्षाने पुढे आला आहे. अशावेळी शरद पवार यांनी आज पुण्यात काही ब्राह्मण संघटनांशी (Brahmin Organization) चर्चा केली. त्यावेळी ब्राह्मण समाजाने पवारांकडे चार मागण्या केल्या. त्यात ब्राह्मण आरक्षण, परशुराम महामंडळ, राष्ट्रवादीच्या नेत्यांना समज याचा समावेश होता. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी आपली बाजू मांडली. तेव्हा ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे (Anand Dave) यांच्यावर पवारांनी निशाणा साधला. त्यानंतर आता आनंद दवे यांनीही पवारांना उत्तर दिलं आहे.
‘आमच्यासाठी हा विषय आज संपला, ब्राह्मण अस्मितेचा मुद्दा कायम’
आनंद दवे म्हणाले की, आमच्यासाठी विषय संपला. पवारसाहेबांनी बोलावल्या बैठकीला आम्ही न जाण्याची कालपासून आज रात्रीपर्यंत चर्चा झाली. आमच्या भीतीप्रमाणे तिथे गेलेल्या लोकांना काहीच ठोस आश्वासन मिळालं नाही. ना त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना समज दिली गेली. केवळ एकमेकांना धन्यवाद आणि शुभेच्छा देऊन काहीच साधलं गेली नाही. पवारसाहेबांनी नाव घेऊन त्यांच्या पत्रकार परिषदेची सुरुवात केली ही माझ्यासाठी नेहमीच गौरवाची बाब असेल. आमच्यासाठी हा विषय आज संपला आहे. पण ब्राह्मण अस्मितेचा मुद्दा कायम असेल, असंही दवे यांनी सांगितलं.
मिटकरी, भुजबळ यांनी दिलगिरी का व्यक्त केली नाही?
त्याचबरोबर अमृत योजनेवरील नियुक्त्या आजच रद्द कशा केल्या? मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन काय करणार हे सांगितलं नाही. मिटकरी, भुजबळ यांच्या वक्तव्यावर आपलं व्यक्तिगत मत तरी पवारसाहेबांनी द्यायला हवं होतं. तसंच पवार साहेब म्हणाले की आम्ही आमच्या पक्षातील लोकांना कुठल्याही समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करु नये असं सांगितलं. मग योग्य त्या सूचना दिल्यानंतरही मिटकरी, भुजबळ यांनी दिलगिरी का व्यक्त केली नाही? असा सवालही दवे यांनी केलाय.
ब्राह्मणांना आरक्षण शक्य नाही, पवारांकडून स्पष्ट
अलिकडच्या काळात ग्रामीण भागातला वर्ग नागरी भागात येतोय. त्यामुळे साहजिकच सर्व्हिस सेक्टर, नोकरीत अधिक संधी मिळायला हवी. ब्राह्मणांना आरक्षण असावं, अशी ब्राह्मण संघटनांची भूमिका आहे. मात्र सद्यस्थितीत ब्राह्मणांच्या आरक्षणाचं सूत्र बसेल असं वाटत नाही, असे पवारांनी स्पष्ट केले. असे असेल तर आरक्षण कुणालाच देऊ नका, ही भूमिका मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र समाजात अनेक जाती धर्म हे मागासलेल्या स्थितीला आहेत, त्यांना प्रगतीसाठी, आपल्यासोबत आणण्यासाठी आऱक्षण द्यावं लागेल. असेही पवारांनी सांगितले. आरक्षणाला विरोध करु नये, असेही या बैठकीत पवारांनी स्पष्ट केले.