शेकापच्या बालेकिल्लाला ‘जोर का धक्का’, मोठ्या नेत्याच्या भाजप प्रवेश
रायगडमधीलच पालीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गीता पालरेचा आणि अलिबागमधील शेकापचे दिलीप भोईर यांनी यापूर्वी भाजपात प्रवेश केला होता. आता पेणमधून धैर्यशील पाटील यांनी प्रवेश केला आहे.
मुंबई : एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यापासून महाविकास आघाडीला धक्क्यांवर धक्के दिले जात आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटासह काँग्रेस, राष्ट्रवादीतील कार्यकर्तेही भाजप किंवा शिंदे सेनेत दाखल होत आहेत. आता महाविकास आघाडीला भाजपने आणखी एक धक्का दिला आहे. हा धक्का शेकापच्या माध्यमातून आहे. शेकापचा बालेकिल्ला असलेल्या रायगडमधून महाविकास आघाडीला हा धक्का देण्यात आलाय. माजी आमदाराने लाल बावट्याची साथ सोडत भाजपात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला आहे.
नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले होते. त्यांनी शेकापच्या बाळाराम पाटील यांचा दारूण पराभव केला होता. या पराभवाच्या धक्क्यातून शेकाप आता कुठे सावरत होता. परंतु त्यापूर्वी भाजपने आणखी धक्का दिला आहे. पेण मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी मंगळवारी भाजपात पक्ष प्रवेश केला आहे.
विधानसभेची तयारी
राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला कमकुवत करण्याचे भाजपने प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महाविकास आघाडीचे आजी-माजी आमदार जाळ्यात अडकवण्याची भाजपाची योजना आहे. त्यात रायगडमधल्या पेण मतदारसंघात भाजपाला यश मिळालं आहे. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत धैर्यशील पाटील भाजपवासी झाले आहे. त्यांनी लाल बावट्याची साथ सोडली आहे.
रायगडमधीलच पालीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गीता पालरेचा आणि अलिबागमधील शेकापचे दिलीप भोईर यांनी यापूर्वी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर आता पेणमधून धैर्यशील पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे रायगडमधील शेकप कमकुवत झाली आहे. आता येत्या विधानसभा निवडणुकीत धैर्यशील पाटील यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
काय म्हणाले फडणवीस
आता संघर्ष नाही तर कुटुंब म्हणून काम करायचे आहे. आपल्याकडे सर्वांना त्यांच्या कुवतीप्रमाणे संधी मिळेल. सर्वांना आपण पुढे घेऊन जाऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.