ठाकरे-शिंदे गट एकत्र येणार?, शरद पवार एनडीएत सहभागी होणार?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं उत्तर काय?
ठाकरे-शिंदे गट एकत्र येणार का? राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार एनडीएत येणार का? या दोन महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहेत. एकनाथ शिंदे दिलखुलासपणे या प्रश्नांना भिडले आहेत.
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी जेपीसी समितीची गरज नसल्याचं म्हटलं होतं. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीची चौकशी पुरेशी असल्याचं शरद पवार यांनी म्हटल्यानंतर आता वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार अप्रत्यक्षपणे भाजपची बाजू घेत असल्याचं सांगितलं जात आहे. काहींनी तर पवारांच्या या भूमिकेचा संबंध भाजपच्या जवळकीशी जोडला आहे. शरद पवार हे एनडीएमध्ये जाणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल अयोध्या दौऱ्यावर जात असताना काही पत्रकारांनी तर त्यांना थेट याबाबतचा प्रश्न विचारला. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मोठ्या खुबीने उत्तर दिलं आहे.
त्यांच्या (शरद पवार) विधानाला असं जोडून पाहू नका. याबाबत सध्या तरी काहीच सांगता येत नाही. यावर नंतरही चर्चा केली जाऊ शकते. आता आम्ही राम मंदिराचं दर्शन घ्यायला आलो आहोत. अयोध्येला आलो आहोत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची राम मंदिराप्रती अस्था होती. आम्हीही त्यांचेच कार्यकर्ते असल्याने आमचीही राम मंदिराप्रती अस्था आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
दुसऱ्यांना टार्गेट करणं योग्य नाही
शरद पवार यांनी हिंडनबर्गचा रिपोर्ट फेटाळून लावला आहे. त्यांनी असं काही केलं असेल तर ते विचार करूनच केलं असेल. उद्योग आले पाहिजे असं माझं मत आहे. हिंडनबर्ग सारख्या संस्था काही प्रश्न उपस्थित करतात. कुणी काही सांगितलं आणि दुसऱ्याला टार्गेट केलं जातं. असं होता कामा नये. सर्वोच्च न्यायालय अदानी प्रकरणाची चौकशी करत आहे. चौकशी झाली पाहिजे. पण कुणावर तरी आरोप करून त्यांना टार्गेट करणं म्हणजे अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवण्यसारखं आहे. इंडस्ट्रीची भरभराट करण्यासाठी सर्वच काम करत असतात. आम्हीही तेच करत असतो, असंही त्यांनी सांगितलं.
एकत्र येण्याची शक्यता फेटाळली
दोन्ही गट एकत्र येणार का? असा सवाल केला असता सध्या तरी तशी काहीच शक्यता नाही. आम्ही हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जात आहोत. बाळासाहेब ठाकरे यांची तीच विचारधारा होती. पण त्यांच्या विचारांची तोडमोड करून त्यांनी सरकार बनवलं. आम्ही तसे नाही. आम्ही भाजप सोबत नैसर्गिक युती केली आहे, असं सांगतानाच पूर्वी लोकांना हिंदू आहे सांगायलाही भीती वाटत होती. 2014मध्ये मोदींचं सरकार आलं आणि हिंदुत्वाला प्रतिष्ठा प्राप्त झाली, असं त्यांनी सांगितलं.