एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे अध्यक्ष, शिंदे गटाच्या अर्जात सर्वात मोठा दावा; धनुष्यबाण चिन्हं मिळणार?
उद्धव ठाकरे गटाकडे पुरेसे समर्थन नसतानाही हा गट बेकायदेशीरपणे अंधेरी पोटनिवडणुकीत धनुष्यबाण चिन्ह वापरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमच्या अर्जावर तातडीने निर्णय घेण्याची विनंती शिंदे गटाने केली आहे.
गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: धनुष्यबाण चिन्हं आपल्यालाच मिळावं म्हणून शिंदे गट (shinde camp) सक्रिय झाला आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्रं लिहिलं असून धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे (shivsena) अध्यक्ष आहे. आम्ही त्यांची अध्यक्षपदासाठी निवड केली आहे. त्यामुळे आम्हालाच धनुष्यबाण चिन्ह मिळालं पाहिजे, असा दावा शिंदे गटाने केला आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाला (election commission) पत्र लिहून हा दावा केला आहे. तसेच आम्ही काही पुरावे दिले आहेत. आणखी पुरावे दिले जाणार असल्याचंही आयोगाने आपल्या पत्रात नमूद केलं आहे. मात्र, निवडणूक आयोग आज धनुष्यबाण चिन्हावर कोणताही निर्णय घेणार नाही. याबाबतची सुनावणी लांबणीवर पडल्याने धनुष्यबाण कुणाला मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या पत्रात अनेक धक्कादायक दावे केले आहेत. शिवसेनेच्या बहुसंख्य लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी, तसेच अध्यक्षपदी निवड केलेली आहे. त्यामुळे पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळाले पाहिजे, असं शिंदे गटाने आपल्या अर्जात म्हटलंय.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली असून आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. 14 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्हं मिळू नये म्हणून शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.
शिवसेनेच्या 55 पैकी 40 आमदार आमच्याकडे आहेत. तसेच 18 पैकी 12 खासदारांचा आम्हाला पाठिंबा आहे. प्रतिनिधी सभा आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे ‘मुख्य नेता’ तसेच अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 144 पक्षाचे पदाधिकारी आणि 11 राज्यांच्या प्रमुखांनी शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. शिवसेनेचे बहुसंख्य लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांचा शिंदे यांना पाठिंबा आहे, असे या अर्जात नमूद करण्यात आले आहे.
या दाव्याच्या पुष्ट्यर्थ प्रतिज्ञापत्र तसेच अन्य कागदपत्रे दाखल करण्यात आली आहेत. तसेच अजूनही पुरावे तसेच कागदपत्रे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असंही शिंदे गटाच्या अर्जात म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उद्धव ठाकरे गटाकडे पुरेसे समर्थन नसतानाही हा गट बेकायदेशीरपणे अंधेरी पोटनिवडणुकीत धनुष्यबाण चिन्ह वापरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमच्या अर्जावर तातडीने निर्णय घेण्याची विनंती शिंदे गटाने केली आहे.