दुपारी शिंदे गटात, संध्याकाळी मातोश्रीवर? वरळीतील राजकीय ड्राम्याबाबत धक्कादायक खुलासा
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा बालेकिल्ला असलेल्या वरळीत मोठा राजकीय ड्रामा पहायला मिळाला.
मुंबई : दसरा मेळाव्याआधीच मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा बालेकिल्ला असलेल्या वरळीत मोठा राजकीय ड्रामा पहायला मिळाला. दुपारी शिंदे गटात सामील झालेले शिवसेना पदाधिकारी संध्याकाळी मातोश्रीवर दाखल झाले.
वरळी कोळीवाड्या मधील सगळे शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, नगरसेवक, उपविभाग प्रमुख सर्व एकत्र येऊन मातोश्रीवर दाखल झाले. वरळीतील शिवसैनिक शिंदे गटात गेले ही खोटी बातमी असल्याचा दावा या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
कुठेतरी निष्ठा मनामध्ये शांत बसू देत नव्हती म्हणून आज सगळे पदाधिकारी या ठिकाणी आलो. जे गेले ते दोन चार दिवसात स्वतः येऊन खुलासा करतील असे शिवसेनेचे पदाधिकारी सुनील शिंदे यांनी सांगीतले.
महाराष्ट्र एका बाजूला आणि आम्ही वरळीकर एका बाजूला असं चित्र ही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आदित्य ठाकरेंना बदनाम करण्यासाठी या ठिकाणी एक मोठा कट रचला जात असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला आहे.
वरळीतील विधानसभेची सीट असेल किंवा दक्षिण मुंबईची लोकसभेची सीट असेल हे पहिल्यापेक्षा जास्त मताने निवडून येतील हा खऱ्या अर्थाने आम्ही दिलेला धक्का असेल असे देखील सुनील शिंदे म्हणाले.