Sanjay Shirsat : ज्याच्या भोंग्यामुळे शिवसेना फुटली त्याच्यावर कारवाई होत असल्याने शिवसैनिकांना आनंदच झाला असेल; संजय शिरसाट यांचा हल्लाबोल
संजय राऊत यांची पत्राचाळ प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून चौकशी सुरु होती. दरम्यानच्या काळात, आपल्याला चौकशीला येणे शक्य नसल्याने त्यांनी मुदत वाढवून मागितली होती. असे असतानाच रविवारी सकाळी त्यांच्या मैत्री या बंगल्यावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली आहे. यामध्ये काय अनियमितता आढळून आल्यास कारवाई अटळ असल्याचे शिरसाठ यांनी सांगितले आहे.
मुंबई : (Sanjay Raut) शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी (ED) ईडीचे अधिकारी दाखल झाले आहेत. असे असताना शिवसैनिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे तर दुसरीकडे शिंदे गटात सहभागी झालेले आमदार मात्र, जे झाले ते योग्यच असल्याचे सांगत आहेत. राऊतांवरील या कारवाईमुळे पुन्हा राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. ज्यांच्या भोंग्यामुळे शिवसेना फुटली, त्यांच्यावर जर कारवाई होत असेल तर शिवसैनिकांना आनंदच झाला असेल असे म्हणत (Sanjay Shirsat) संजय शिरसाट यांनी राऊतांवर टिका केली आहे. शिवाय ते शिवसेनेत असले काय आणि नसले काय त्यामुळे काही फरक पडणार नाहीत. त्यांची वाणी, लेखणी ही चांगली आहे. पण तो काय मास लिडरही नाही असाही हल्लाबोल शिरसाठ यांनी केला आहे.
अनियमितता आढळल्यास कारवाई अटळ
संजय राऊत यांची पत्राचाळ प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून चौकशी सुरु होती. दरम्यानच्या काळात, आपल्याला चौकशीला येणे शक्य नसल्याने त्यांनी मुदत वाढवून मागितली होती. असे असतानाच रविवारी सकाळी त्यांच्या मैत्री या बंगल्यावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली आहे. यामध्ये काय अनियमितता आढळून आल्यास कारवाई अटळ असल्याचे शिरसाठ यांनी सांगितले आहे. अनियमितता आढळ्यास त्यांची काय पूजा करायची का? त्यांना ईडीची भीती वाटत नसल्याचे त्यांनी यापूर्वी अनेकदा सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी चौकशीला आणि होणाऱ्या कारवाईलाही सामोरे जातील. पण एकंदरीत परस्थितीनुसार त्यांना अटक होण्याची जास्त शक्यता असल्याचेही शिरसाठ यांनी सांगितले आहे.
डायलॉगबाजी सोपी , जैसी करणी वैसी भरणी
शब्दांचे फटकारे हे वेगळे पण प्रत्यक्ष वेळ आली की स्थिती ही वेगळी असते. ते वक्ते चांगले आहेत..त्यांचे लिखाणही चांगले आहे. त्यांनी काही चुकीचे केले नसले तर घाबरण्याचे कारण नाही पण इतर वेळची डायलॉगबाजी वेगळी असते असाही टोला शिरसाठ यांनी राऊतांना लगावला आहे. त्याच्या वाचाळ बडबडीमुळेच शिवसेनेवर ही वेळ आली. वेळीच आवर घातली असते तर ही वेळच आली नसती. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सांगण्यावर त्यांनी प्रत्येक गोष्ट केल्याने हे सर्व घडले असल्याचेही त्यांनी सांगितले. जैसी करणी वैसी भरणी, त्यामुळे यातून कोणाची सुटका होणार नाही. जे आहे त्याला सामोरे गेल्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नाही.
राऊतांच्या ट्विटला उत्तर…
ईडी कडून कारवाईला सुरवात होताच संजय राऊतांनी ट्विटवरुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तरीही मी शिवसेना सोडणार नाही, बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की, घोटळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. असेही राऊतांनी म्हटले आहे. मात्र, बाळासाहेबांची शपथ घेण्याचा अधिकार त्यांना दिला कोणी, खरे शिवसैनिक तर आम्हीच असल्याचे संजय शिरसाठ यांनी सांगितले आहे. एकीकडे ईडीच्या अधिकाऱ्यांची धाड आणि दुसरी राज्यातील राजकारण यावरुन चांगलेच तापले आहे.