ShivSena: आघाडी तोडण्यासाठी बुलडाण्यातील शिवसैनिक रस्त्यावर, तर चिखलीत ठाकरेंच्या समर्थनात शिवसेना आक्रमक
आमदार संजय गायकवाड यांनी ऑनलाईन पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा घेऊन जोरदार घोषणाबाजी केलीय. यामध्ये महाविकास आघाडीतून शिवसेनेने बाहेर पडण्याची मागणी करण्यात आली आहे.
बुलडाणा : राजकीय भूकंपामुळे राज्यभर विविध पडसाद उमटत आहेत. बुलडाणा जिल्ह्यात एकीकडं आघाडी तोडण्यासाठी बुलडाण्यातील शिवसैनिक रस्त्यावर उतरले. तर दुसरीकडं, चिखलीत ठाकरेंच्या समर्थनात शिवसेना आक्रमक झाले. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीय. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख आणि माजी जिल्हाप्रमुख (Former District Chief) प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांच्या नेतृत्वात ही निदर्शने करण्यात आली. यावेळी एकनाथ शिंदे यांना गद्दार असल्याचा उल्लेख करण्यात आला. जिल्ह्यातील दोन्ही बंडखोर आमदारांमुळे शिवसैनिकांवर काहीही परिणाम होणार नाही, असा विश्वास दाखवण्यात आला. आम्ही शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचं सहसंपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर (Narendra Khedekar) म्हणाले. चिखली विधानसभा (Chikhali Assembly) मतदार संघाची आज बैठक पार पडली. यावेळी दोन्ही आमदार गद्दार असल्याचे सांगत त्या गद्दार आमदारांना आता थारा नाही. तर आम्ही सर्व उद्धव ठाकरे सोबत असल्याचं ठरलं आहे, असंही खेडेकर म्हणाले.
बुलडाण्यातील दोन आमदार गुवाहाटीत
महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेनेनं बाहेर पडावे, यासाठी बुलडाण्यातील शिवसैनिकांनी शहरात जोरदार घोषणाबाजी केलीय. त्याच बरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आघाडीतून बाहेर पडण्यासाठी विनंती देखील केलीय. शिवसेनेचे नेते तथा कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील 40 पेक्षा जास्त आमदारांनी नाराज होऊन बंड पुकारला आहे. हे सर्व आमदार गुवाहाटी येथील एका हॉटेलात थांबलेत. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील आमदार संजय गायकवाड आणि आमदार संजय रायमुलकर या शिवसेना आमदारांचा देखील समावेश आहे.
संजय गायकवाड यांचा ऑनलाईन संवाद
यापैकी आमदार संजय गायकवाड यांनी ऑनलाईन पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा घेऊन जोरदार घोषणाबाजी केलीय. यामध्ये महाविकास आघाडीतून शिवसेनेने बाहेर पडण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. मात्र हे सर्व शिवसैनिक बाळासाहेबांचा फोटो घेऊन रस्त्यावर जरी उतरले असेल तरी बंडखोर आमदार संजय गायकवाड यांचे समर्थक होते. बुलडाणा विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी होते, हे विशेष.