Shivsena | विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेनाचा दावा, शिंदे गटाविरोधात थेट लढाई?
विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेते पदासाठी सचिन अहिर आणि माजी मंत्री अनिल परब यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
मुंबईः महाराष्ट्रातील सत्ता बदलानंतर शिवसेनेने विधान परिषदेत (MLC) विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा ठोकला आहे. विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांच्याकडे यासंबंधीचे पत्र देण्यात आले. शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने काल नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली आणि पक्षातर्फे विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदी एका सदस्याची नेमणूक केली जाईल, असा दावा केला. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी कुणाची वर्णी लावायची आणि इतर व्हीपसंबंधीचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे असतात, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेतेपदी कुणाला संधी मिळणार, याची वाच्यता शिवसेनेतर्फे अद्याप करण्यात आलेली नाही, अशी माहिती शिवसेना आमदार सचिन अहिर यांनी दिली. मात्र शिवसेनेचा विरोधी पक्षनेता झाल्यानंतर विधान परिषदेत शिंदे गट विरोधात उद्धव ठाकरे यांची शिवसेना असा थेट सामना रंगलेला पहायला मिळू शकतो.
खडसेंच्या नावाची होती चर्चा…
विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अजित पवारांची निवड झाली आहे. आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदावर कुणाची वर्णी लागतेय, याकडे सर्वांचं लक्ष आहे. विधान परिषदेत शिवसेनेचे 13 आमदार आहेत. त्यामुळे इतर विरोधी पक्षांच्या तुलनेत शिवसेनेचं संख्याबळ जास्त आहे. विधान परिषदेत भाजपाला तगडी फाईट देण्यासाठी विरोधी पक्षनेताही तेवढाच अनुभवी हवा. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नुकतेच विधान परिषदेवर गेलेले एकनाथ खडसे यांचा या पदासाठी विचार केला जात होता. मात्र शिवसेनेने सोमवारी या पदासाठी दावा केलाय. त्यामुळे इथे शिवसेनेचा सदस्य नियुक्त केला जाण्याची दाट शक्यता आहे.
सचिन अहिर का अनिल परब?
विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेते पदासाठी सचिन अहिर आणि माजी मंत्री अनिल परब यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. या दोघांपैकी कुणीही नियुक्त झाले तरीही विधान परिषदेत एकनाथ शिंदेंचा गट विरोधात शिवसेना असा थेट सामना पहायला मिळणार, हे नक्की.
आमदार अंबादास दानवेंचा दावा काय?
औरंगाबादचे विधान परिषदेचे शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी कालच यासंदर्भात वक्तव्य केलं. विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता, गटनेता, आणि प्रतोद ठरवण्याचे सर्व अधिकार आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले होते. यासंबंधीचा रितसर ठराव आम्ही नीलम गोऱ्हे यांना दिला होता. विधान परिषदेत लार्जेस्ट पार्टीनंतर शिवसेनेची सदस्यसंख्या जास्त आहे. त्यामुळे निश्चितच शिवसेनेचा विरोधीपक्षनेता होईल, याची आम्हाला खात्री आहे. सभापतीदेखील याला मान्यता देतील, असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं.