“नितेश राणेंकडे जी प्रगल्भता आहे, ती शिवसेनेकडे नाही”
भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्याकडे जी प्रगल्भता आहे ती दुर्दैवाने शिवसेनेकडे (Shiv Sena) नाही, अशा शब्दात माजी मंत्री आणि भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

सांगली : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्याकडे जी प्रगल्भता आहे ती दुर्दैवाने शिवसेनेकडे (Shiv Sena) नाही, अशा शब्दात माजी मंत्री आणि भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ते सांगलीत (Sangli) बोलत होते. नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात बोलताना, पक्षादेश दिल्यास कोणासोबतही काम करु असं म्हटलं होतं. त्यावरुन शेलारांनी नितेश राणेंचं कौतुक केलं.
नितेश राणे, शिवसेना खासदार विनायक राऊत आणि दीपक केसरकर हे वेंगुर्ल्यात एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी वरिष्ठांनी आदेश दिला तर एकत्र काम करु असं नितेश राणे म्हणाले. तर विनायक राऊतांनीही नितेश राणेंची पाठ थोपटली होती. नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर अचानक सूर कसे बदलले अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. यावर आशिष शेलार यांनी स्पष्टीकरण देताना, नितेश राणे बोलले ही त्यांची प्रगल्भता आहे. दुर्दैवाने ती शिवसेनेकडे नाही, असं शेलार म्हणाले.
नितेश राणे-विनायक राऊत एकाच व्यासपीठावर
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या वेंगुर्ले सागररत्न मत्य बाजारपेठे लोकार्पणाच्या निमित्ताने रविवारी शिवसेना खासदार विनायक राऊत आणि नितेश राणे एकत्र, एकाच व्यासपीठावर आले होते. शिवसेना खासदार आणि शिवसेना सचिव विनायक राऊत, शिवसेना आमदार दीपक केसरकर आणि भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण, भाजपचे आमदार नितेश राणे एकाच व्यासपीठावर होते. राणे आणि सेना यांच्यातील राजकीय वैर नेहमी पहायला मिळते. मात्र यावेळी चित्र उलट होते. नितेश राणे आणि विनायक राऊत हे एकमेकांच्या कानात हितगुज करताना पहायला मिळाले.
नितेश राणे काय म्हणाले होते?
मी माझ्या भाषणात जसं म्हणालो, पक्षाने आदेश दिला तर आम्ही कोणाबरोबरही काम करायला तयार आहे. वरिष्ठांनी आदेश दिला तर आम्ही दोन्ही पक्ष (भाजप-शिवसेना) एकत्र मिळून काम करु, पक्षादेश महत्त्वाचा आहे, पक्षाने आदेश दिला तर आमच्यासारखे कार्यकर्ते एकत्र काम करतील, असं म्हणत नितेश राणेंनी जणू राजकीय संकेतच दिलेत.
विनायक राऊतांनी थोपटली नितेश राणेंची पाठ
नितेश राणे हे भाषण संपवून व्यासपीठाच्या खुर्चीवर विराजमान झाले. त्यावेळी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणे यांची पाठ थोपटली. खासदार विनायक राऊत यांनी जाहिर भाषणात आपण आणि नितेश राणे मित्र असल्याचं बोलून दाखवलं. मी नितेश राणे यांचे अभिनंदन करतो. अभिनंदन करायला सुद्धा मोठं मन लागतं असं सांगत खासदार विनायक राऊत यांनी कोकणातले राजकीय नेते विकासकामांसाठी एकत्र येतात याची झलक दाखवली.
VIDEO : नितेश राणे काय म्हणाले होते?
संबंधित बातम्या
कोकणात शिवसेना-भाजपच्या नेत्यांचे ‘मनोमिलन’; विनायक राऊतांनी थोपटली नितेश राणेंची पाठ