हिंगोली: पक्षातील फाटाफुटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने (shivsena) आता पक्ष बांधणीवर जोरदार भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेने विविध समाज घटकांना आपलसं करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेने आपला मोर्चा मुस्लिम समाजाकडे वळवल्याचं दिसत आहे. शिवसेनेचे नेते भास्कर जाधव (bhaskar jadhav) यांनी या संदर्भानं एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे जाधव यांच्या या विधानाला वेगळा अर्थ प्राप्त झाला आहे. भाजप (bjp) मुंबई महापालिका निवडणुकीत दोन समाज लढवण्याचं काम करेल. त्यामुळे या लोकांसोबत जाऊन काही फायदा होणार नाही हे माझं सांगणं आहे. विशेष करून मुस्लिम समाजाने आपली डोके शाबूत ठेवून उद्धव ठाकरेंच्या मागे उभे राहावे. उद्धव ठाकरेच समाजाला आणि लोकांना चांगली दिशा दाखवू शकतात, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
भास्कर जाधव हिंगोली दौऱ्यावर आहेत. जनतेशी संवाद साधताना त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. अच्छे दिन येणार येणार असं त्यांनी सांगितलं. ताकावर, मीठावर, दह्यावर आणि चटणीवरही जीएसटी लावला. आता आणखी कोणते अच्छे दिन आणणार आहात? असा उपरोधिक सवाल भास्कर जाधव यांनी केला.
हे 40 लोक सोडून गेले तेव्हा उद्धव साहेबांना वेदना झाल्या. जेव्हा ते आजारी होते तेव्हा त्यांच्यावर वार करण्यात आला. त्यांचा आजार फार मोठा होता. मात्र ते जगदंबेच्या कृपेने चांगले झाले. जेव्हा गरज होती तेव्हा त्यांच्या हाताचा पाळणा करून त्यांना सांभाळायला हवे होते. मात्र तसे न होता त्यांना खाली खेचल्या गेले.
पाने, फळे, फुले नेऊ शकतात. मात्र मुळ कोणी नेऊ शकत नाही, असं उद्धव साहेब म्हटले. त्यामुळे पुन्हा शिवसेना उभी राहील. भाजपने शिवसेनेला जमीन दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही त्यांना आस्मान दाखवा, असं आवाहन त्यांनी केलं.
भाजपने शिवसेना तोडण्याचे अनेक प्रयत्न केले. 40 आमदार गेले. पण आता एक रिपोर्ट आला. त्यात हे आमदार नेऊन काही फायदा होणार नसल्याचं म्हटलं आहे. कारण आता शिवसेनेचे नव्या दमाचे आमदार निवडून येतील अशी परिस्थिती आहे, असा दावाही त्यांनी केला.
हिंदुत्व वगैरे काही नाही. एकच आहे. 50 खोके आणि एकदम ओके, अशी टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी आमदार संतोष बांगर यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. शिवसेनेत फूट पडल्यावर काही लोक रडले. बायका सोडून गेल्या असं म्हणाले. त्यांचे अस्वलासारखे चाळे होते. हे अस्वल दिवसा आमच्या सोबत होते. पण रात्री खोका दिसताच तिकडे गेले, असा हल्लाबोल त्यांनी केला.