‘ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी’, शिवसेना प्रवक्त्याचा गंभीर आरोप
"ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रभक्ती आणि हिंदुत्वाच्या गोष्टी करतात. मात्र त्यांचे खरे स्वरुप आता समोर आले आहे. यासंबधी फोटो आणि व्हिडिओचे पुरावे आहेत. अतिरेकी लोकांना सोबत घेऊन प्रचार करणाऱ्या उबाठा यांच्या नकली शिवसेनेने आता शिवसेना हा शब्द देखील वापरु नये", असा घणाघात राजू वाघमारे यांनी केलाय.
“काँग्रेसच्या संगतीत राहून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा खरा चेहरा समोर येऊ लागला आहे. १९९३ च्या बॉम्बस्फोटात मुंबईतील शेकडो निष्पापांचे जीव घेणाऱ्या आरोपींसोबत उबाठाचा प्रचार पाहून हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला वेदना होत असतील”, अशी टीका शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे यांनी केली. “देशद्रोह्यांबरोबर संगनमत करुन प्रचार करणाऱ्या उबाठाला मुंबईकर धडा शिकवतील”, असाही निशाणा त्यांनी साधला आहे. “ठाकरे गटाचे उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा प्रचार १९९३ च्या ब़ॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान हा सक्रियपणे करत आहेत. त्याचबरोबर लष्कर भरतीचे पेपर फोडणारा आरोपी महेंद्र सोनावणे हा उबाठाचे शिर्डीचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांचा प्रचार प्रमुख आहे. भारतीय आणि लष्करात पाकिस्तानी धार्जिणे लोकांची भरती कशी करता येईल, असा या सोनावणे याचा डाव होता. हे सर्व देशद्रोही संजय राऊत यांच्यासोबत सत्कार करत फिरत आहेत”, असा आरोप राजू वाघमारे यांनी केलाय.
“ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रभक्ती आणि हिंदुत्वाच्या गोष्टी करतात. मात्र त्यांचे खरे स्वरुप आता समोर आले आहे. यासंबधी फोटो आणि व्हिडिओचे पुरावे आहेत. अतिरेकी लोकांना सोबत घेऊन प्रचार करणाऱ्या उबाठा यांच्या नकली शिवसेनेने आता शिवसेना हा शब्द देखील वापरु नये. उबाठाचे संबध देशद्रोह्यांशी आहेत. यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान झाला आहे. त्यामुळे उबाठाला शिवसेना हे नाव देऊ नये, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार आहोत”, अशी भूमिका राजू वाघमारे यांनी मांडली आहे.
‘सर्व कारस्थानाचे सूत्रधार शरद पवार’, राजू वाघमारे यांचा आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवारांनी काँग्रेस पक्षात इतर प्रादेशिक पक्ष विलीन होतील, असे म्हटले होते. त्याबाबत बोलताना राजू वाघमारे म्हणाले की, “महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये या संदर्भात बोलणी सुरु होती. याला उद्धव ठाकरे यांचे समर्थन होते. त्यामुळेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि धनुष्यबाण चिन्ह वाचवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी आणि उबाठातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या सर्व कारस्थानाचे सूत्रधार शरद पवार आहेत”, असा घणाघात राजू वाघमारे यांनी केला.