Sanjay Raut : सर्वात मोठी बातमी! अखेर खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाला; 102 दिवसानंतर तुरुंगाबाहेर येणार
उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मिळाला आहे. तब्बल शंभर दिवसानंतर त्यांची तुरुंगातून सुटका होणार आहे.
मुंबई: उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मिळाला आहे. तब्बल शंभर दिवसानंतर त्यांची तुरुंगातून सुटका होणार आहे. पत्रावाला चाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत तुरुंगात होते. आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे राऊत यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राऊत यांना जामीन मिळाल्यामुळे ठाकरे गटाने एकच जल्लोष केला आहे. तसेच राऊत यांना जामीन दिल्याने ठाकरे गटाला मोठं बळ मिळालं आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांना आज पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली असता कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला. त्यामुळे राऊत यांचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राऊत यांना पत्रावाला चाळ प्रकरणी 31 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरुंगातच होते. त्यांच्या कुटुंबीयांशिवाय त्यांना कुणालाही भेटू दिले जात नव्हते. मध्यंतरीच्या काळात राऊत यांच्या वतीने जामिनासाठी कोर्टात वारंवार अर्जही करण्यात आले. पण त्यांना जामीन मंजूर झाला नव्हता. मात्र, आज अखेर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे शिवसेनेतून आनंद व्यक्त केला जात आहे.
संजय राऊत यांना जामीन मिळावा म्हणून अनिल देशमुख प्रकरणाचा दाखला देण्यात आला. देशमुख यांना ज्या पद्धतीने जामीन देण्यात आला. त्याच धर्तीवर राऊतांना जामीन देण्याची मागणी करण्यात आली. कोर्टाने ही मागणी मंजूर करत त्यांना 2 लाखाच्या जात मुचलक्यावर सोडण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, ईडीककडून राऊत यांच्या जामिनाला विरोध करण्यात येणार आहे. राऊत यांचा जामीन रद्द करण्यात यावा या मागणीसाठी ईडी उच्च न्यायालयात जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
राऊत अटक आणि जामीन, कधी काय?
संजय राऊतांना ईडीकडून 31 जुलैला अटक
सुरुवातीला राऊतांची ईडी कोठडीत रवानगी
8 ऑगस्टला पीएमएलए कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली
संजय राऊतांची आर्थर रोड कारागृहात रवानगी
7 सप्टेंबरला पीएमएलए कोर्टात जामिनासाठी अर्ज
राऊतांच्या जामीन अर्जावर 2 नोव्हेंबरला सुनावणी
पण 2 नोव्हेंबरला न्यायालयाने निकाल राखून ठेवला
9 नोव्हेंबरला संजय राऊतांना जामीन मंजूर