कुणी सांगितलं दसरा मेळावा ऑनलाइन होणार?, उद्धव ठाकरेंचं भाषण व्यासपीठावरूनच: संजय राऊत

| Updated on: Oct 17, 2020 | 2:33 PM

कोरोनामुळे शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा ऑनलाइन होणार असल्याच्या जोरदार चर्चा असून या चर्चांना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे.

कुणी सांगितलं दसरा मेळावा ऑनलाइन होणार?, उद्धव ठाकरेंचं भाषण व्यासपीठावरूनच: संजय राऊत
Follow us on

मुंबई: कोरोनामुळे शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा ऑनलाइन होणार असल्याच्या जोरदार चर्चा असून या चर्चांना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे. कुणी सांगितलं शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाइन होईल? उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असले तरी ते पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे त्यांचं भाषण हे व्यासपीठावरूनच होईल. त्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे, असं सांगत संजय राऊत यांनी शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा दणक्यात होणार असल्याचे संकेत दिले आहेत. (shiv sena leader sanjay raut on Dussehra rally)

‘टीव्ही9 मराठी’शी संवाद साधताना संजय राऊत यांनी दसऱ्या मेळाव्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला. दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या या मेळाव्याचे महत्त्व आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळ्या गोष्टी ऑनलाइन होत आहेत. पण मी आजच वाचलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमध्ये 12 सभा घेणार आहेत. त्या कशाप्रकारे सभा घेतात त्याचा आम्ही अभ्यास करू…नियम वैगरे आहेतच. शेवटी या राज्यात मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आहेत. सरकारने काही नियम केले आहेत. कोणत्याही नियमांचं उल्लंघन होणार नाही, असं सांगतानाच दसरा मेळाव्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. येत्या एक-दोन दिवसात त्यावर निर्णय होईल. मला वाटतं यंदाचा दसरा मेळावाही व्यासपीठावरच होईल. काही मार्ग काढता येईल. चर्चा सुरू आहे. यंदा प्रथमच ठाकरे मुख्यमंत्री आहेत. बऱ्याच वर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून दसरा मेळाव्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असं राऊत म्हणाले.

अभिनेत्री कंगना रनौतवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. त्याबाबत विचारले असता राऊत यांनी या प्रश्नावर बोलणे टाळले. मला याबाबत कल्पना नाही. न्यायालयाच्या कारवाईचा आदर करायला हवा, असं सांगत त्यांनी या विषयावर अधिक भाष्य टाळले.

सिंचन चौकशीबाबत सरकारच उत्तर देईल

ईडीकडून पुन्हा एकदा सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्यात येणार आहे. त्याविषयावरही त्यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला. याबाबत सरकारच उत्तर देईल. मी भाष्य करणं योग्य होणार नाही. या घोटाळ्याप्रकरणी राज्याच्या तपास यंत्रणांनी क्लिनचीट दिलेली आहे. एवढंच मला माहीत आहे, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

राज्यपालांनी घटनेच्या चौकटीत राहून काम करावं – संजय राऊत

पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातले राज्यपाल वेगळ्या भूमिकेतून काम करत आहेत – संजय राऊत

कुणी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये:संजय राऊत