Tv9 स्पेशल रिपोर्ट : गजानन कीर्तिकर यांच्या हकालपट्टीची मागणी, भाजपचा पाठिंबा!
शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकरांची हकालपट्टी करा, अशी मागणी शिवसेना नेते शिशिर शिंदेंनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. त्यांच्या मागणीला भाजप नेते दीपक केसरकर यांनी पाठिंबा दिलाय.
शिवसेना नेते गजानन कीर्तिकरांनी, “अमोल कीर्तिकर निष्ठावंत आहे. त्यामुळेच तो ठाकरेंसोबत राहिला. शिंदेंसोबत आला नाही”, अशी प्रतिक्रिया गजानन कीर्तिकरांनी दिली. आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते शिशिर शिंदेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गजानन किर्तिकरांची हकालपट्टी करण्याची मागणी केली. “गजानन कीर्तिकर आणि त्यांच्या पत्नी यांनी पक्ष विरोधी वक्तव्य करुन ठाकरे गटाची बाजू घेतली. मतदानादिवशी गजानन कीर्तिकरांच्या पत्नीनं मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला. गजानन कीर्तिकरांचा खासदार निधी अमोल यांनी प्रचारासाठी आणि विकास कामांसाठी वापरला. अमोल हे गजानन कीर्तिकर यांच्या कार्यालयातून कारभार करत होते. यामुळे ठाकरे गटाला फायदा झाला. गजानन कीर्तिकरांचे उद्योग पक्षाला बदनाम करत आहेत. गजानन कीर्तिकरांना ‘मातोश्री’वर लोटांगण घालण्याची घाई झाली आहे. ‘मातोश्री’चे ‘लाचार श्री’ होणाऱ्यांना पक्षातून त्वरित बाहेरचा रस्ता दाखवा. गजानन कीर्तिकरांची पक्षातून त्वरित हकालपट्टी करावी आणि त्यांना निरोपाचा नारळ द्या”, असं शिशिर शिंदे पत्रात म्हणाले आहेत.
मुंबई उत्तर पश्चिममध्ये गजाजन कीर्तिकरांचेच पुत्र अमोल किर्तीकर विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर अशी लढत झाली. गजानन किर्तीकर शिंदे गटात आहेत. पण मुलगा अमोल किर्तीकर ठाकरे गटाकडून निवडणूक लढला. त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी आहे. तर शिशिर शिंदेंनी गजानन कीर्तीकरांनी हकालपट्टी करण्याची मागणी करताच, भाजपनंही गंभीर आरोप केले आहेत.
प्रवीण दरेकर यांचे आरोप काय?
गजानन कीर्तीकरांना अस्तनीतले निखारे म्हणत मुलाला खासदार करण्यासाठी षडयंत्र रचल्याचा आरोप, भाजप नेते प्रवीण दरेकरांनी केलाय. एकनाथ शिंदेंकडून उमेदवारी घेवून अर्ज मागे घेण्याचा गजानन कीर्तिकरांचा कट होता. मुलगा अमोल कीर्तिकरांना बिनविरोध करण्याचा डाव होता, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केलाय.
अमोल कीर्तिकर यांचा शिशिर शिंदे यांच्यावर निशाणा
दुसरीकडे शिशिर शिंदेंवर अमोल कीर्तिकरांनी टीका करताना, विधान परिषेदवर आमदारकी मिळवण्यासाठी वक्तव्य केल्याचं म्हटलंय. शिशिर शिंदे कोण? विधान परिषद मिळवण्यासाठी वक्तव्य असतील, असा टोला अमोल कीर्तिकर यांनी लगावलाय. दरम्यान, गजानन कीर्तिकरांवर शिशिर शिंदे आणि त्यानंतर भाजपनं केलेले आरोप गंभीर आहेत. त्यावर अद्याप मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया आलेली नाही.