नवी दिल्ली: शिवसेनेचे नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातील शिंदे सरकार बेकायदेशीर आहे. राज्यात अधिवेशन बोलावणं, नव्या विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती करणं या सर्व गोष्टी बेकायदेशीर आहेत. त्यालाच आम्ही कोर्टात आव्हान दिलं असून कोर्ट आम्हाला न्याय देईल, असा आम्हाला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया सुभाष देसाई यांनी व्यक्त केली. तसेच एकनाथ शिंदे हे भाजपच्या (bjp) पटलावरील छोटसं प्यादं आहे. त्यांचा कसा कसा वापर केला जातोय हे दिसून येतंय. पुढे कसा केला जाणार हेही दिसणार आहे, अशी टीकाही सुभाष देसाई यांनी केली. सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू आहे. त्याकरिता सुभाष देसाई हे कालपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं.
शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही एक पक्षकार आहोत. जे सरकार स्थापन झालेलं आहे ते बेकायदेशीर आहे. आम्ही आमची बाजू मांडली आहे. वकिलानं आमची बाजू चांगली मांडली आहे. न्यायालय बारकाईनं हे प्रकरण ऐकत आहे. या सुनावणीचा देशावर परिणाम होईल. काल न्यायमुर्तींना लेखी म्हणणं द्यावं असं सांगितलं होते. त्यामुळे शिंदे गटाचे वकील त्यांचं लेखी म्हणणं मांडणार आहे. परंतु एकंदरीत कालचा युक्तिवाद पाहता आम्हाला न्याय मिळेल, असं सुभाष देसाई म्हणाले.
सगळे युक्तीवाद अजून पूर्ण झाले नाहीत. दोघांनाही अजून बाजू मांडण्यासाठी वेळ आहे. जर सर्वांना न्याय दिला असता तर न्यायालयात यावं लागलं नसतं, असं देसाई म्हणाले. शिवसेनेत यापूर्वीही फूट पडलेली आहे. त्यामुळे शिवसेनेला हे प्रकरण नवीन नाही. पण हे प्रकरण जरा मोठं आहे. शिवसेना अशा घटनांतून तावूनसलाखून निघालेली आहे. जेव्हा जेव्हा बंड झालं तेव्हा शिवसेना बहरली. शिवसेना पसरली आहे
इतिहासाची पुनरावृत्ती पहायला मिळेल. बंडखोरीनंतर भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक यांचा पराभव पाहायला मिळाला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
महाशक्ती कोण आता हे उघड झालं आहे. शिंदेना माहिती नाही ते भाजपच्या पटलावरील एक प्यादे आहेत. त्यांचा वापर केला जात आहे. पुढेही केला जाणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.