मुंबई : भाजपसोबत जाण्याच्या चर्चा, तथ्यहीन आणि खोट्या आहेत. जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केलं. पण सत्ताधाऱ्यांना अजूनही मोठी आशा आहे. पिक्चर अजून बाकी आहे, हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अजून गुण जुळायचे आहेत. शुगर वाढल्यानं ऑपरेशन पुढं ढकललंय, असं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री आणि नेते सांगत आहेत. अजित दादा येणार किंवा राजकीय ऑपरेशन होणार, असं शिवसेनेला वाटतंय.
विशेष म्हणजे अजित पवारांवरुन शिवसेनेतच मतभेदही उघड झाले होते. गुलाबराव पाटील, उदय सामंत ग्रीन सिग्नल देत होते. तर नव्यानं नियुक्त झालेले प्रवक्ते संजय शिरसाट, सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा देत होते. हे झालं शिंदेंच्या शिवसेनेचं. पण आणखी एका ट्विटनं भुवया उंचावण्याचं काम केलंय.
कॅप्शनमध्ये लिहिलंय. मिशन हॅश टॅग NO Pendency. ऑफिस वर्क. क्लिअरिंग Pendency. कार्यालयीन कामकाज. अर्थात पेंडिंग कामं पूर्ण करतोय आणि त्यासोबत 2 फोटो ट्विट करण्यात आलेत. ज्यात फडणवीसांसमोर फाईल्स आणि कागदपत्रांचे गठ्ठे असून फडणवीस सह्या करत आहेत. आता पेंडिंग कामं अचानक क्लीअर करणे किंवा ते ट्विट करुन सांगणे, हे नेमकं कशासाठी? यावरुन आणखी नवी चर्चा सुरु झालीय.
इकडे भाजप नेते आशिष शेलार यांनीही आपल्या वक्तव्यानं अजित पवारांवरुन पुन्हा नवी चर्चा सुरु केलीय. अजित पवार यांच्यावरुन महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरु असतानाच, 2 दिवसांआधीच आशिष शेलार दिल्लीला गेले आणि त्यांनी भाजपच्या नेतृत्वाशी चर्चा केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेली चर्चा उघड करणार नाही. पण अजित पवार यांना यायचं असल्यास त्यांना वैयक्तिक निर्णय घ्यावा लागेल, असं शेलार म्हणाले आहेत.
अजित पवार यांनी सांगितलंय की, भाजपसोबत जाण्याच्या चर्चा निराधार आहेत. स्वत: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही अजित पवार यांच्या नेतृत्वावर काही लोकांकडून शंका उपस्थित केली जात असल्याचं सांगून अजित पवार यांच्यासाठी बॅटिंगच केलीय. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना भाजप बॅकफूटवर गेल्याचं वाटतंय. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या संदर्भातल्या या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर, अभिजीत बिचुकलेंचीही एंट्री झालीय. राजकारणात आकड्यांना फार महत्व असतं. त्यामुळं समीकरणं बनतातही आणि बिघडतातही. मात्र तूर्तास तरी अजित पवारांनी चर्चांना ब्रेक लावलाय.