Shivsena | ‘सत्तासंघर्षाचा निकाल आणखी 5 वर्षे लागणार नाही….’ भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं शिवसेनेच्या पोटात गोळा?
रत्नागिरीतील एका कार्यक्रमात बोलताना भरत गोगावले म्हणाले, ' ते म्हणतात.. आम्ही मूळचे शिवसैनिक. 7 तारखेला निर्णय कळेल, धनुष्यबाण आमचा आहे.
रत्नागिरीः विधानभवनाच्या (Maharashtra Assembly) पायऱ्यांशी धक्काबुक्कीत शिंदे गटाकडून हिरीरीने पुढाकार घेणारे आमदार भरत गोगावले यांनी मोठं वक्तव्य केलंय. गोगावलेंच्या या वक्तव्यानं उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पोटात गोळाच येऊ शकतो. शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाच्या ज्या परस्पर विरोधी याचिकांची केस आता घटनापीठासमोर गेली आहे. तारीख पे तारीख मिळणार आणि हा निकाल पुढची चार ते पाच वर्षे लागणार नाही, असं भाकित गोगावले (Bharat Gogawale) यांनी केलंय. रत्नागिरीतील एका कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 प्रमुख शिवसेना आमदारांवर अपात्रतेची कारवाई प्रलंबित आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर होणारा निर्णय उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे गटासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. कोर्टात न्याय होईल आणि हे सरकार अपात्र ठरेल, अशी प्रार्थना उद्धव ठाकरेंच्या वतीने करण्यात येतेय. तर आम्ही कायद्यानुसार योग्य आहोत, असा दावाही शिंदे गटाकडून करण्यात येतोय. मात्र घटनापीठासमोर हे प्रकरण गेल्यामुळे निकाल मिळण्यास उशीर लागतोय की काय, अशी भीती सर्वांच्याच मनात आहे.
भरत गोगावले काय म्हणाले?
रत्नागिरीतील एका कार्यक्रमात बोलताना भरत गोगावले म्हणाले, ‘ ते म्हणतात.. आम्ही मूळचे शिवसैनिक. 7 तारखेला निर्णय कळेल, धनुष्यबाण आमचा आहे. या लोकांनी देव पाण्यात घालून ठेवले होते. आता 12 तारीख आली, 22 ता 4 ते 5 वर्ष हे चालेल. दुसरी निवडणूकही 2024 ची आपण जिंकू….
वटवृक्ष सुकत होता, म्हणून उठाव केला
आम्ही गद्दारी केली नाही तर उठाव केला होता, असा पुनरुच्चान भरत गोगावले यांनी केलाय. ते म्हणाले, ‘ आम्ही 40, अपक्ष, 12 खासदार बाळासाहेबांची शिवसेना टिकवण्याचं, पुढे नेण्याचं काम करतोय, त्यामुळे आम्ही गद्दार होऊ शकत नाहीत. थोरे म्हणाले, जी काही शिल्लक शिवसेना आहे, त्यांनी त्यांचं बघावं… बाळासाहेबांची शिवसेना आम्ही आहोत. 1966 ला स्थापन झालेल्या या पक्षाचा आता वटवृक्ष झाला आहे. हा वटवृक्ष सुकतोय की काय वाटलं आणि आम्ही उठाव केला…
‘..मग आम्ही पण कार्यक्रम केला’
विधानभवनाच्या पायऱ्यांशी तीन दिवस आम्ही विरोधकांना आंदोलन करू दिलं, पण आम्ही घोषणा देताना ते आडवे आल्याने आम्हीपण त्यांचा कार्यक्रम केला, असं वक्तव्य भरत गोगावले यांनी केलं. ते म्हणाले, ‘ परवा काय झालं सांगतो.. ओके, पन्नास खोके.. ओरडत होते. आम्ही आमच्या स्टाइलनं उत्तर दिलं तेव्हा ते गर्भगळीत झाले. लवासाचे खोके, बारामती ओक्के.. अनिल परबांचे खोरे, मातोश्री ओक्के… अशा घोषणा आम्ही दिल्या. आम्ही सांगितलं. आमचा नाद करायचा नाही. आम्हाला पाय लावण्याचा नाही… त्या मिटरकरीला आम्ही पिटकरी करून टाकलं.. आता 7 सप्टेंबरला शिवसेना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण निशाणीची तारीख आहे, यावेळी या सर्वांना कळेल, असा इशारा भरग गोगावले यांनी दिला.