मुंबई : शिवसेनेविरोधात बंड करणाऱ्या 40 आमदारांना शिवसेना नेते भास्कर जाधव (bhaskar jadhav) यांनी आपल्या आक्रमक शैलीत फटकारले. आज शिवसेनेत काय झालं? एका बाजूला 40 शिलेदार आहेत. तर दुसऱ्या बाजूला शिवसैनिक (shivsena) छातीचा कोट करून शिवसेना वाचवण्यासाठी झटत आहे. कोण कुणाला रक्तबंबाळ करणार आहे? कोण कुणाला धाराशायी करणार आहे? कोण कोणाला पराभूत करणार आहे? त्याचा विचार करा. एकदा हातात तलवार घेतली, रणांगणात उतरला तर जेव्हा हातात तलवार असते तेव्हा कुठं थांबायचं हे ज्याला कळतं तो खरा योद्धा, असं सांगतानाच तुम्ही अनेकांच्या मागे चौकश्या लावल्या. कुणाच्या पाठी ईडी लावली तर कुणाच्या पाठी आणखी काय. राठोडांना मंत्रिपद मिळू नये म्हणून तुम्ही काय काय केलं. आता तुम्ही त्यांनाच बाजूला घेऊन बसला आहात. नियती कुणाला सोडत नाही. बोला संजय राठोड, सरनाईकांचं काय करताय? असा सवाल भास्कर जाधव यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधासभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर विधानसभेत अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्यावर भाष्य करताना भास्कर जाधव यांनी बंडखोरांना घेरतानाच भाजपवर हल्लाबोल केला. ज्या भाजपच्या हिंदुत्वाच्या गोष्टी, साधनशुचितेच्या गोष्टी तुम्ही करत आहात. संजय राठोड तुमच्या बाजूला बसले आहेत. त्यांचं मंत्रिपद घालवायला तुम्ही काय काय केलं नाही. त्यांना मंत्रिपद दिलं . जाणार होतं, तेव्हा तुम्ही महाराष्ट्रात आंदोलन करण्याचा इशारा दिला. आता ते तुमच्या बाजूने बसले आहेत. प्रताप सरनाईक आणि यामिनी जाधव यांच्यामागे ईडी लावली. नियती कुणाला सोडत नाही, आता तुम्हाला त्यांना वाचवायला लागत आहे, असा टोला जाधव यांनी लगावला.
मी अस्वस्थ होत नाही. विचलीत होत नाही. पण मी माझा चेहरा लपवू शकत नाही. शिंदे सांगतात मी शिवसैनिक आहे. शिवसेनाप्रमुखांचा वारस आहे. आनंद दिघेंचा वारस आहे. शिंदेंना सांगायचं आहे, तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. तुमची आणि माझी कधी उठबस झालेली नाही. मी राष्ट्रवादीत होतो. तुम्हाला जय महाराष्ट्र केला तर तुम्ही मानवर करून जायचा. मी नंदनवनमध्ये दोन वेळा आलो. तुमची भेट झाली. तुमच्या एमसआरडीसीच्या कार्यालयात मी एकदा आलो. कोकणातील पुरात तुम्ही जे काम केलं. त्यामुळे तुम्ही खरे शिवसैनिक आहात हे दाखवून दिलं. तुमचा माझा फार संबंध आला नाही. पण तुम्ही लोकांच्या अडीअडचणीत तुम्ही धावून जाता हे मी ऐकलंय. तुमचं काम मी पाहिलं, अशा शब्दात त्यांनी शिंदे यांचं कौतुकही केलं.
यावेळी जाधव यांनी पानीपत, रामायण आणि महाभारताचं उदाहरण देऊन शिंदे यांना सवाल केले. तसेच भाजपवरही टीका केली. या सभागृहात पुन्हा रामायणाची पुनरावृत्ती घडणार आहे. पुन्हा एकदा महाभारत घडणार आहे. पुन्हा एकदा पानीपत होणार आहे. सख्खे भाऊ एकमेकांविरोधात आहेत. लढताहेत कुणासाठी? दिल्लीच्या पातशासाठी लढत आहात. ते पातशहा सही सलामत आहेत. मरताहेत तुम्ही आम्ही, असा हल्लाबोलही त्यांनी केला.