आघाडीच्यावेळेसच महायुतीच्या हालचाली? शिंदे गटाच्या आमदाराची धक्कादायक फेरसाक्ष
शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. विधानसभा अध्यक्षांसमोर आज पहिल्यांदाच शिंदे गटाची फेरसाक्ष नोंदवण्यात आली. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची फेरसाक्ष नोंदवली. यावेळी दिलीप लांडे यांनी महायुतीबाबत मोठा खुलासा केला.
विनायक डावरुंग, Tv9 मराठी, नागपूर | 7 डिसेंबर 2023 : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज नागपुरात सुनावणी पार पडली. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह सर्व पक्षांचे आमदार सध्या नागपुरात आहेत. विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाने शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निर्णय घेण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष हिवाळी अधिवेशनादरम्यानही याप्रकरणी सुनावणी घेत आहेत. विधानसभा अध्यक्षांनी आज या प्रकरणावर सुनावणी घेतली. शिवसेनेच्या आजच्या सुनावणीत शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची फेरसाक्ष नोंदवण्यात आली. यावेळी दिलीप लांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठा खुलासा केला. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी स्थापन होत असतानाच महायुतीचे प्रयत्न सुरु होते, असा मोठा खुलासा दिलीप लांडे यांनी केले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना सोडायचा निर्णय आधीच पक्का झाला होता, हे लांडेंच्या फेरसाक्षीतून स्पष्ट झालंय.
नेमके सवाल-जवाब काय?
देवदत्त कामत – शिवसेनेच्या घटनेत किंवा बाळासाहेबांच्या शिकवणीत निवडणुकीनंतर किंवा निकालानंतर सत्तास्थापनेसाठी युती करू नये असं कुठेही नाही?
दिलिप लांडे – बाळासाहेब ठाकरे यांचे वाक्य आहे की, “आयुष्यात काँग्रेसशी कधीही युती करणार नाही. अशी वेळ येईल त्यावेळी मी शिवसेना पक्षाचे दुकान बंद करेन” हे बाळासाहेबांचे विचार आहेत.
कामत – आमदारांचा एखादा गट विरोधीपक्ष असणाऱ्या राजकीय पक्षाशी युती करू शकत नाही.. यावर आपलं काय मत आहे?
लांडे – ज्यांच्यासोबत आपण निवडणुक लढवली. अशा हिंदुत्ववादी पक्षासोबत युती करू शकतो
कामत – एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत 30 जून 2022 ला सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला तो योग्य आहे का
लांडे – होय
कामत – अनुक्रमांक 32 वरील जी सही आहे ती आपली आहे का?
लांडे – होय
कामत – सही करण्याअगोदर आपण हे वाचून आणि समजून घेतल का?
लांडे – होय
कामत – आपण या मजकुराशी सहमत होता म्हणून यावर सही केली का
लांडे – होय
कामत – या कागद पत्रात जो ठराव दिलेला आहे त्यानुसार शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जो निर्णय घेतला तो योग्य होत का?
दिलीप लांडे – सदर बैठक विधिमंडळ गटनेता निवडी बाबत होती आणि महाराष्ट्र विधिमंडळ कायद्याप्रमाणे निवडून आलेल्या त्या पक्षाच्या लोक प्रतिनिधींना गटनेता निवडीचा अधिकार असतो. त्यामुळे सर्व शिवसेना पक्षाच्या आमदारानी आदरणीय शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून निवड केली होती
कामत – विधिमंडळ पक्षाचा सदस्य, नेता आणि प्रतोद निवडतात अशी आपली भूमीका आहे का?
लांडे – विधीमंडळ पक्षाचा नेता निवडायचे काम निवडून आलेले आमदार करीत असतात. विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड झाल्यानंतर विधिमंडळ पक्षाचे नेते ठरवतात प्रतोद कोण ते
कामत – राजकीय पक्ष ठरवत असतो की विधिमंडळाचा नेता आणि प्रतोद कोण हे मी तुम्हांला सांगू इच्छितो. तर यावर तुमचं मतं काय?
लांडे – निवडून आलेले आमदारचं ठरवत असतात की विधिमंडळाचा नेता कोण
देवदत्त कामत – प्रतोद संदर्भात आपलं काय म्हणणं आहे?
दिलीप लांडे – माझ्या माहितीप्रमाणे प्रतोद निवडण्याचा अधिकार हा गटनेत्याचा असतो.
कामत – एकनाथ शिंदे यांची शिवसेना या पक्षाच्या नेतेपदी कधी नियुक्त करण्यात आली?
लांडे – मला आठवत नाही.
देवदत्त कामत – पान क्रमांक २५ ते २८ हे दिलीप लांडे यांना दाखवण्यात यावे.
या कागदपत्रांना शिंदे गटाच्या वकिलांकडून विरोध करण्यात आला. या कागदपत्रांची साक्षीदारांना माहिती नाही. त्यामुळे या कागदपत्रांवर प्रश्न विचारण्यात येऊ नये, असं शिंदे गटाचे वकील म्हणाले. पण त्यावर ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत यांनी हरकत घेतली. या कागदपत्रांबाबतचा मुद्दा रेकॉर्डवर घेण्यात यावा, अशी मागणी कामत यांनी केली. त्याला शिंदे गटाच्या वकिलांची संमती दिली.
शिंदे गटाचे वकील : जोपर्यंत आमच्याकडून हा कागदपत्रे तपासली जात नाहीत, तोपर्यंत त्यावर आमच्या साक्षीदारास प्रश्न विचारण्यात येऊ नये
कामत – उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेना या राजकीय पक्षाचे नेते म्हणून शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत जी २३ जानेवारी २०१८ ला झाली तेव्हा नियुक्ती केली का ?
लांडे – मला माहीत नाही
कामत – आपल्या मते एकनाथ शिंदे हे शिवसेना या पक्षाच्या नेतेपदी होते की नव्हते?
लांडे – मी शिवसेना पक्षात आल्यानंतर मला माहीत झाले
देवदत्त कामत – याआधीच्या प्रश्नाच्या उत्तरात आपण म्हटला की शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आपल्याला कळाले की एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत. मग आपण शिवसेनेत प्रवेश कधी केला?
दिलीप लांडे – फेब्रुवारी किंवा मार्च २०१८ नंतर
कामत – जेव्हा आपण प्रवेश केला तेव्हा इतर नेते कोण होते हे आपल्याला माहित होते का?
लांडे – माझ्या माहितीप्रमाणे ९ नेते होते. सर्वांची नावे तोंडपाठ नाही
कामत – आपण ज्या 9 नेत्यांचा उल्लेख केला होता, कॉलम चारमध्ये ज्या नेत्यांची नावे आहेत ती याच 9 नेत्यांची नावे आहेत का?
लांडे – नाही
कामत – त्या 9 नेत्यांपैकी आपल्याला कोणत्या नेत्यांची नावे आठवतात?
लांडे – मला आठवत नाही
कामत – शिवसेना पक्षाचे २०१९ मध्ये जेव्हा आपण निवडणूक लढवली तेव्हा शिवसेनेचे अध्यक्ष कोण होते?
लांडे – उद्धव ठाकरे
कामत – हे योग्य आहे का की उद्धव ठाकरे तुमच्या कार्यालयात आले होते, जेव्हा तुमच्या प्रचाराचा २०१९ शेवटचा दिवस होता, तुम्हाला आशीर्वाद आणि समर्थन देण्यासाठी?
लांडे – माझ्या काजूपाडा कार्यालयात आले नव्हते. किंवा माझ्या मध्यवर्ती कार्यालयात आले नव्हते.
कामत – तुमच्या निवडणूक कार्यालयात आले का?
लांडे – माझ्या पहिल्या उत्तरात मी सांगितले आहे.
कामत – शिवसेना विधिमंडळ जो पक्ष आहे त्याची निवडणूक आयोगात नोंदणी केली आहे का?
लांडे – माहीत नाही
देवदत्त कामत – मी तुम्हाला सांगू इच्छितो की, तुमच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी तुमच्या संघर्ष नगर कार्यालयाला भेट दिली होती.
दिलिप लांडे – बराच काळ झाला त्यामुळे आठवत नाही.
देवदत्त कामत – दिलिप लांडे यांच्या प्रतिज्ञापत्रात पॅरा 1 मध्ये म्हटलं आहे की, “मी 14व्या विधानसभेच्या कालावधीतला शिवसेना विधिमंडळ पक्षाचा सदस्य आहे.” शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठक घेण्याचे नियम किंवा कोणती पद्धत आहे का?
दिलिप लांडे – मी नवीन असल्याने मला फार कल्पना नाही.
देवदत्त कामत – शिवसेना विधिमंडळ पक्षाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेली आहे का?
दिलिप लांडे – माहिती नाही.
देवदत्त कामत – विधिमंडळ पक्षाच्या सर्व सदस्यांना वेळ, तारीख सर्व कळवण्याची आवश्यकता आहे का?
दिलिप लांडे – पक्षाचे गटनेते किंवा पक्षाचे प्रमुख विधिमंडळ बैठकीचा दिनांक किंवा वेळ लेखी कळवतात.
कामत – याचिकेत आपण उत्तर दिलं आहे, यात सहप्रती जोडल्या आहेत त्या मूळ कागदपत्रांच्या प्रति आहेत का ?
लांडे – मी न्यायालयात सादर केले आहेत
कामत – शपथपत्रात आपण असं म्हटलं आहे की शिवसेनेच्या घटनेशी तुम्ही बांधील आहात. तुम्ही म्हणताय ती घटना तीच आहे?
लांडे – सादर केल्याप्रमाणे आहे
कामत – आपण सादर केलेल्या घटनेप्रमाणे, उद्धव ठाकरे हे २० जून २०२२ पर्यंत सर्व आदेश किंवा अधिकार त्यांना होते का?
लांडे – हो
कामत – 2019 ते 2022 पर्यंत जे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्या शिवसेना पक्षाचे आपण सदस्य होता?
लांडे – आजही शिवसेना पक्षाचा सदस्य आहे
देवदत्त कामत – आपल्या साक्षीला जोडलेल्या शपथपत्रात परिच्छेद 2 मध्ये आपण असं म्हटलं आहे की शिवसेनेच्या संविधानात जे म्हटलं आहे, ही घटना कुठली आहे?
दिलिप लांडे – सादर केल्याप्रमाणे
देवदत्त कामत – प्रश्न 2 मध्ये पक्षाने अधिकृत केलेल्या व्यक्तीचं पालन करतो, असं म्हटलं आहे. 2018 मध्ये तुम्ही शिवसेनेत प्रवेश केला. 20 जून 2022 पर्यंत उद्धव ठाकरे सूचना जारी करत होते. हे बरोबर की चूक?
दिलिप लांडे – बरोबर
देवदत्त कामत – 2019 मध्ये शिवसेना राजकीय पक्ष महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली हे खरं आहे का?
दिलिप लांडे – आघाडी झाली पण त्याला आमचा विरोध होता.
देवदत्त कामत – तुम्ही शिवसेना राजकीय पक्षाचे 2019 ते जून 2022 पर्यंत सदस्य होता, जेव्हा राज्यात मविआचं सरकार होतं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते?
दिलिप लांडे – मी आजही शिवसेनेचा सदस्य आहे.
देवदत्त कामत – तुम्ही 45 व्या प्रश्नाचं उत्तर देताना मविआला विरोध केल्याचं म्हटलं आहे. तुम्ही कधी याबाबत पक्षाच्या नेतृत्त्वाला 2019 ते जून 2022 पर्यंत लेखी आक्षेप नोंदवला का?
दिलिप लांडे – काही सदस्यांना कळवलं होतं. मी एकनाथ शिंदे आणि पक्षातील इतर नेत्यांना काँग्रेसबाबत झालेल्या युतीसंदर्भात विरोध आणि माझे मत प्रदर्शित केले होते. ज्या काँग्रेसच्या विरोधात शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातून हिंदुत्ववादी आणि बाळासाहेबांच्या विचारांवर मतदारांनी आपल्याला आशीर्वाद दिला आहे, त्ंयाच्याशी गद्दारी करत आहोत, असे मत व्यक्त केले होते.
कामत – आपल्या विचारधारेच्या विरूद्ध विचारसरणी असलेल्या पक्षासोबत एकनाथ शिंदे यांनी २०१९ ते २२ मंत्रिपद भूषविले. याला आपण सहमत होता का?
लांडे – मी आधीच्या उत्तरात हेच म्हणालो आहे की, मी माझी भावना व्यक्त केली होती की हिदुंत्ववादी विरोधी पक्षासोबत युती करु नका.
कामत – ४८ व्या प्रश्नाच्या उत्तरात तुम्ही असं म्हणाला आहात की तुम्ही एकनाथ शिंदे यांना तुमचा आक्षेप नोंदवला होता. तो आक्षेप केव्हा केला होता आणि शिंदे तुम्हांला काय म्हणाले होते?
लांडे – तेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले की तुमच्या मताशी मी सहमत आहे. पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युती करण्याचा प्रयत्न केला जाईल. आघाडी (महाविकास आघाडी ) प्रयत्न चालू होता. तेव्हाच मी माझा विरोध दर्शविला होता
कामत – मग हे बरोबर आहे का ? की तुम्ही आक्षेप मविआ होत असताना विरोध केला पण २०२२ पर्यंत केला नाही.
लांडे – माझं मत एकदा माडलं. मला योग्य वाटलं, सारखे सारखे नाही.
कामत – आपण मविआ होत असताना आक्षेप घेतला होता अशी चुकीची साक्ष देत आहात. कारण, आपण ते रेकॉर्डवर दिलेले नाही.
लांडे – वकील साहेबांच्या मते खोटं असेल, पण तेव्हाचे पक्षातील नेते यांच्यासमोर व्यक्त केलं होतं तुम्ही त्यांना बोलून विचारू शकता