सुनील प्रभू त्रस्त, ‘व्हीप’वरुन खडाजंगी, अध्यक्षांसमोरच वकिलांमध्ये जुंपली, काय-काय घडलं?
शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणीचा आज या आठवड्यातील तिसरा दिवस होता. विशेष म्हणजे आजच्या सुनावणीतसुद्धा व्हीपच्याच मुद्द्यावरुन जोरदार खडाजंगी झाली. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवली. यावेळी जेठमलानी यांनी प्रभू यांना व्हीपबद्दल अनेक प्रश्न विचारले.
विनायक डावरुंग, Tv9 मराठी, मुंबई | 23 नोव्हेंबर 2023 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी घेतली. या सुनावणीवेळी शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची फेरसाक्ष नोंदवली. ही सुनावणी दोन सत्रात पार पडली. दोन्ही सत्रात शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी, सुनील प्रभू आणि ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्यात खडाजंगी झाली. सुनील प्रभू यांच्या काही उत्तरांवर महेश जेठमलानी यांनी आक्षेप घेतले. त्यांनी सुनील प्रभू यांना एकामागे एक अनेक प्रश्न विचारले. यामुळे सुनील प्रभू प्रचंड वैतागले. यावेळी एका मुद्द्यावरुन महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना घेरलं. विशेष म्हणजे प्रभू यांना त्या प्रश्नाचं उत्तरच देता आलं नाही. ते निरुत्तर झाले. यावेळी दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. अखेर विधानसभा अध्यक्षांना मध्यस्थी करावी लागली. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाच्या वकिलांना समज दिली.
नेमके सवाल-जवाब काय?
जेठमलानी – आमदार निवास म्हणजे काय?
प्रभू – एमएलए हॉस्टेल! शिंदे गटाचे वकील मला कन्फयुज करण्याचा प्रयत्न करत आहेत, प्रभूंचा आक्षेप (दोन्ही बाजूच्या वकिलांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु, अध्यक्षांनी हे थांबवलं)
जेठमलानी – तुम्ही पार्टी ऑफिसला व्हीप दिले. उरलेल्या आमदारांना तुम्ही आमदार निवासात व्हीप दिला का?
प्रभू – मी काहींना पार्टी कार्यालयात दिला, काहींना आमदार निवासात दिला, काही जिथे कुठे असतील तिथं दिले.
विधानसभा अध्यक्ष – जेवढे कमी शब्दात उत्तर द्याल तेवढे कमी उप प्रश्न निर्माण होतील
प्रभू – मी नेहमीच आपले ऐकतो
विधानसभा अध्यक्ष – मी ते सभागृहात अनुभवले आहे
(विधानसभा अध्यक्ष आणि प्रभूंमध्ये मिश्किल टिप्पणी)
जेठमलानी – आमदार निवासात होते त्यांना व्हीप देण्यात आला. पुढे म्हटलं आहे, देण्याचा प्रयत्न झाला म्हणजे नेमकं काय, दिला की नाही?
प्रभू – भाषा अशी आहे की तुम्ही समजून घ्याल तसा अर्थ निघतो. माझ्यासोबत पार्टी ऑफिसला होते त्यांना तिथं दिलं. जे बाहेर होते तिथे देण्याचा प्रयत्न केला
जेठमलानी – आमदार निवासातील किती आमदारांना व्हीप दिला होता?
प्रभू – कितींना दिला हे आठवत नाही. पण जिथे होते, दिला होता, हे आठवत आहे.
जेठमलानी – तुम्ही व्हीप दिला हे कशावरून त्यांना पोचला
प्रभू – व्हीप दिल्यावर त्यांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत
प्रभू – ज्यांना व्हीप दिला त्यांच्या सह्या घेतल्या आहेत. आमच्या कार्यालयात सर्व पुरावे आहेत.
जेठमलानी – जे आमदार संपर्कात नव्हते त्यांना व्हाटसपने व्हीप पाठवला गेला का?
प्रभू – सर्व लोकांना धावपळीत व्हाट्सअॅप पाठवणं शक्य नव्हतं. पक्ष कार्यालयातील कर्मचाऱ्यांमार्फत व्हाटसअॅपने किंवा प्रत्यक्ष व्हीप दिला जातो. हे व्हीप कार्यालयीन कर्मचारी यांच्यामार्फत मनोज चौगुले याच्या मार्फत पाठवले.
जेठमलानी – 37 व्या प्रश्नाच्या उत्तर तुम्ही म्हणालात की, जे प्रत्यक्ष उपलब्ध नव्हते त्यांना व्हॉट्सअॅपवर पाठवलात. तो तुमच्या मोबाईलवरनं पाठवलात का?
प्रभू – माझ्याकडून निरोप जातो, फोन जातो. त्यावेळच्या धावपळीत माझ्याकडून ते शक्य नव्हतं. यापूर्वीही मी कधी तसं पाठवलं नाही. मी प्रतोद असल्यापासून आणि त्याच्याआधीपासून व्हीपचा मेसेज पक्ष कार्यालातील कर्मचाऱ्यांकडून व्हीप दिला जातो.
जेठमलानी – हा जो व्हाट्सअॅप पाठवला होता तो मनोज चौगुले यांच्या व्हाट्सअॅप वरून पाठवला होता का?
प्रभू – मी मनोज चौगुले यांना व्हाट्सअॅपद्वारे पाठवण्यास सांगितले होते. त्यांनी ते पाठवले
जेठमलानी – व्हाट्सअॅपवर पाठवले गेले हे नक्की कशावरुन?
प्रभू – मनोज चौगुले म्हणाले की व्हाट्सअॅप पाठवले
जेठमलानी – मनोज चौगुले यांच्या फोनवरून आमदारांना मेसेज पाठवले आहे ते आपण सादर केलेले नाहीत. त्यामुळे आपण जे म्हटले आहे ते चुकीचे आहे
प्रभू – हे खोटे आहे
(जेठमलानी आणि देवदत्त कामत यांच्यात खडाजंगी झाली. तुम्ही जुनिअर आहात मधेमधे बोलू नका, जेठमलानी कामत यांच्यावर चिडले)
जेठमलानी – मी माझे प्रश्न विचारत आहे
(शिंदे गट व ठाकरे गटाच्या वकिलांमध्ये तू तू मैं मैं. विधानसभा अध्यक्षांकडून दोघांना समज)
अध्यक्ष – तुमच्या वादाचा परिणाम वेळकाढूपणामध्ये होत आहे. हे मी रेकॉर्ड मध्ये नोंद करतोय. मला ठराविक वेळेत हे प्रकरण निकाली काढायचे आहे
जेठमलानी – आपण लिखित स्वरूपात व्हीप पाठवता तेव्हा बैठकीचा विषय त्यात नमूद नसतो का?
प्रभू – ज्या कारणांसाठी व्हीप देतो त्याचा विषय दिला जातो. व्हीप मतदान किंवा बैठकीसाठी बजावला जातो.
जेठमलानी – व्हीपच्या डॉक्युमेंटमध्ये ज्या बैठकीचा उल्लेख आहे त्याचं कारण काय होतं?
प्रभू – पक्षादेशात कुठेही कारण नमूद नसते. फक्त बैठकीबाबत व्हीप होता
जेठमलानी – तुम्ही या कार्यवाहीत आणि सर्वोच्च न्यायालयात 21 जून 2022चा व्हीप म्हणून जो दस्तावेज सादर केलेला आहे तो खोटा आहे
प्रभू – सर मी संविधानाची शपथ घेऊन सांगत आहे. जे मी सांगत आहे ते खरे आहे. हे सांगत आहेत ते खोटे आहे
जेठमलानी – जी कागदपत्रे आपण सादर केली आहेत, ती कुणी तयार केली आहेत?
प्रभू – पार्टी ऑफिसमध्ये माझ्या सांगण्यावरून तयार केली गेली आहेत. सह्या माझ्या समोर करण्यात आल्या
जेठमलानी- माझा प्रश्न आहे पक्षादेशावर २/२०२२ लिहिले आहे, हे हस्ताक्षर कुणाचे आहे?
प्रभू – कार्यालयातून आलेला हा कागद आहे. तो कार्यालयाचा भाग आहे
जेठमलानी – ते कोणी लिहिलं
प्रभू – कुणाच्या हस्ताक्षरात लिहिले आहे, ते मी आत्ता नाही सांगू शकतं
जेठमलानी – कोणत्या टाईमला तयार झाला
प्रभू – टाईम कसा सांगू शकतो?
जेठमलानी – व्हीप नंबर कधी लिहिण्यास सांगितला
प्रभू – व्हीप तयार जेव्हा झाला तेव्हा सह्या घ्यायच्या होत्या. तेव्हा नंबर देण्यास सांगितलं
जेठमलानी – या दस्तावेजांवर ज्या आमदारांच्या सह्या घेतल्या त्या केव्हा घेतल्या आहेत?
प्रभू – व्हीप इशू झाल्यानंतर सह्या घेतल्या.
(यावेळी कागदपत्रे दाखवण्यावरून वाद झाला. ठाकरे गटाच्या वकिलांनी सुनील प्रभू यांना कागदपत्रे दाखवण्याची मागणी केली. पण शिंदे गटाच्या वकिलांनी त्याला विरोध केला. त्यांनी कोणता कागद वापरला, सादर केला हे त्यांनाच माहिती नाही का? असा सवाल महेश जेठमलानी यांनी केला. व्हीप वर सह्या घेतल्यानंतर जो कागद होता, तो हा कागद आहे का? असा सवाल सुनील प्रभू यांनी केला.)
जेठमलानी – प्रपत्र पी २मध्ये आपण ज्या सह्या घेतल्या आहेत त्या कधी घेतल्या
प्रभू – ते जेव्हा उपलब्ध झाले तेव्हा
(ठाकरे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला. तोपर्यंत प्रभू यांना सभागृहाबाहेर पाठवण्यात आले. प्रश्न विचारताना कुठल्या कागदपत्रांबाबत बोलत आहे हे शिंदे गटाच्या वकिलांनी स्पष्ट सांगावं, असा युक्तिवात ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केला.
जेठमलानी – अपात्रता याचिका क्रमांक १ यामधील प्रपत्र क्रमांक पी २ याची ही मूळ प्रत आहे का?
प्रभू – जी मला दाखवण्यात आली ती एकच मूळ प्रत आहे.
जेठमलानी – व्हिपची सही घेतलेले पत्र एकच आहेत की किती आहेत?
प्रभू – हे मूळ पत्र आहे
जेठमलानी – व्हीप दिल्यानंतर ज्या कागदपत्रावर सह्या घेतल्या, त्यांची संख्या किती आहे?
प्रभू – ही मूळ प्रत आहे. व्हीप दिल्यानंतर या कागदपत्रावर सह्या घेतल्या होत्या. (प्रभूंचा व्हीपच्या सह्या घेतलेल्या प्रतींची संख्या सांगण्यासापासून बचाव)
जेठमलानी – सहपत्र पी २ च्या पहिल्या पानावर असलेले दिनांक कुणाच्या हस्ताक्षरात लिहिली आहे?
प्रभू – कार्यालयीन कर्मचारी हे दिनांक टाकतात. पूर्ण कागद समोर आणतात. कुणाचे हस्ताक्षर आहे, हे मी कसे सांगू?
जेठमलानी – सहपत्र पी २ ही मूळ प्रतची अचूक नक्कल आहे का?
प्रभू – नक्कल आहे
जेठमलानी – तुम्ही म्हटलं की तुम्ही जे काही याचिकेत लिहिले आहे ते तुम्हाला मराठीत समजावून सांगितलं आहे. मग आता तुमच्या याचिकेत पान क्रमांक १५वर पी २ ही मूळ कागदपत्रांची सांक्षाकित प्रत असल्याचे तुम्ही नमूद केले आहे, हे खरे आहे का?
प्रभू – आता एक ते दीड वर्ष झाले. कुठे लक्षात राहणार एवढं सगळं?
जेठमलानी – लक्षात नाही हे वाक्य रेकॉर्डवर घ्यावे
जेठमलानी – सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या मूळ व्हिपच्या कागदपत्रांमध्ये नमूद केलेली तारीख नक्कलच्या सांक्षाकित प्रतीवर दिसत नाही
प्रभू – दिसत नाही, हे खरे आहे. पण प्रिंटिंग मिस्टेक असू शकते. झेरॉक्समध्ये प्रिंटिंग मिस्टेक असू शकते
जेठमलानी – मूळ प्रतीवरील तारीख झेरॉक्सवर का नाही?
जेठमलानींच्या प्रश्नावर प्रभू निरुत्तर
दुपारच्या सत्रात काय-काय घडलं?
आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज दुपारच्या सत्रात पुन्हा सुनावणीला पुन्हा सुरुवात झाली. यावेळी सुनावणी एकूण 18 दिवस असेल, असं स्पष्ट करण्यात आलं. विधानसभा अध्यक्षांनी तारखा जाहीर केल्या. नोव्हेंबरच्या २८, २९, ३० या तारखांना सलग सुनावणी होईल. तर डिसेंबरच्या १,२ ५,६,७, १,१२,१३,१४,१५, १८, १९, २०, २१, २२ या तारखांना सुनावणी होईल, असं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं.
जेठमलानी – हा वेळ कमी आहे. अतिरिक्त वेळ मिळाला पाहिजे.
अध्यक्ष – माझ्याकडे आता अजून पर्याय नाही. एवढाच वेळ देऊ शकतो. हिवाळी अधिवेशनाच्यावेळी सुद्धा सुनावणी होणार
नार्वेकर – २१ जून २०२२ त्यावेळी विधानसभा अध्यक्ष नव्हते.
प्रभू – त्यावेळी उपाध्यक्ष हे अध्यक्षांचे प्रभारी काम पाहत होते. त्यावेळी अध्यक्षांचा प्रभार हा उपाध्यक्षांकडे होता. म्हणून मी अध्यक्ष असा उल्लेख केला
जेठमलानी – आपण सह पत्र पी ३ मध्ये जो ठराव केलेला आहे, तो कुणी तयार केला आहे?
प्रभू – आमदारांची बैठक वर्षा बंगल्यावर बोलावली होती. त्या बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्या आमदारांच्या हजेरीच्या सहीचे रजिस्टर आपल्याकडे (अध्यक्षांकडे) सादर केले आहे. यावेळी उपस्थित असलेल्या आमदारांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.
जेठमलानी – माझा थेट प्रश्न असा आहे की हा ठराव कोणी तयार केला? 21 जूनला कोणत्या व्यक्तीने हा ठराव तयार केला?
प्रभू – हा ठराव तयार करणे एक प्रक्रियेचा कामकाजाचा भाग आहे. ज्यांनी अनुमोदन दिलं त्यांच्या सह्या त्यावर आहे.
जेठमलानी – नेमका हा ठराव कोणी अशी कोण व्यक्ती आहेत का?
प्रभू – रवींद्र वायकर यांनी ठराव मांडला होता
जेठमलानी – डॉक्युमेंट मध्ये उदय सामंत दादा भुसे, संजय राठोड यांनी अनुमोदन दिला अस तुम्ही म्हणताय पण कथित ठरावात त्यांनी अनुमोदन दिलेले नाही
प्रभू – त्यांनी या ठरावावर माझ्यासमोर सह्या केल्या आहेत. हे सगळं मी सादर करतो
जेठमलानी – उदय सामंत, दादा भुसे, संजय राठोड यांच्या नावासमोर असलेल्या सह्या या त्यांच्या नाहीत. त्या खोट्या आहेत
प्रभू – हे खोटं आहे
जेठमलानी – जर तुम्ही म्हणता सह्या तुमच्यासमोर झाल्यात. पण ते म्हणतात आमच्या नाहीत. जर या सह्या बनावट असतील तर त्याला तुम्ही जबाबदार असतील
प्रभू – मी संविधानाची शपथ घेऊन सांगतो की मी खोटं बोलणार नाही, माझ्यासमोर या सह्या त्यांनी केल्यात, मी खोटं कशाला बोलू? मला गुन्हेगार बनवत आहेत.
प्रभू – मी खोटे कसे बोलेन? माझ्यावर फोर्जरी कशी लावू शकता? या कठड्यात आणून मला गुन्हेगार बनवत आहात?
जेठमलानी – २१ जून २०२२ रोजीच्या कथित बैठकीत असा कुठलाही ठराव पारित झाला नाही
प्रभू – २१ जूनच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि आमदारांच्या बैठकीत हा ठराव मंजूर झाला
जेठमलानी – २१ जून २०२१ रोजीच्या कथित बैठकीत उदय सामंत, दादा भुसे आणि संजय राठोड यांना सह्या करताना उद्धव ठाकरे यांनी पाहिले का?
प्रभू – मी प्रत्यक्ष पाहिले आहे. उद्धव ठाकरे हे त्या बैठकीचे अध्यक्ष होते. ठराव सूचकाने ठराव सुचवला. उद्धव ठाकरे यांच्या समोरच बैठक झाली. त्यांच्या समोरच सह्या झाल्या. उद्धव ठाकरे यांनी पाहिले.
जेठमलानी – या कथित बैठकीत ठराव पास करण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठीची बैठक कोणत्या वेळेपासून कोणत्या वेळेपर्यत चालली?
प्रभू – वर्षा बंगला दुपारी साडे 12 ते साडे 4 पर्यत बैठक चालली
जेठमलानी – 21 जूनला एकनाथ शिंदे यांचा मन वळविण्याचा प्रयत्न केला जात होता. उद्धव ठाकरे यांनी यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे मध्यस्थ पाठविले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना त्यांच्या पदावरून हटविण्याबाबत ठराव 21 जूनला होऊ शकला नाही ?
प्रभू- उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि त्यात ठराव पास करण्यात आला
जेठमलानी – आपल्याला दाखवलेल्या याचिकेत प्रतिवादी क्रमांक 16 आणि 22 हे संजय राठोड आणि दादा भुसे आहेत का ?
प्रभू – हो आहेत
जेठमलानी – आपण अध्यक्षांसमोर प्रतिज्ञापत्रात म्हणतात की दादा भुसे आणि संजय राठोड हे बैठकीला हजर होते मात्र सर्वोच्च न्यायालयात तुम्ही प्रतिज्ञापत्र असे म्हटले आहात की हे दोघे गैरहजर होते हे आपले परस्पर विरोधी विधानांबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे
प्रभू – हे रेकॉर्डवर आहे
जेठमलानी – आपल्याला दाखवलेल्या याचिकेत प्रतिवादी क्रमांक 16 आणि 22 हे संजय राठोड आणि दादा भुसे आहेत का ?
प्रभू – हो आहेत
जेठमलानी – आपण अध्यक्षांसमोर प्रतिज्ञापत्रात म्हणतात की दादा भुसे आणि संजय राठोड हे बैठकीला हजर होते मात्र सर्वोच्च न्यायालयात तुम्ही प्रतिज्ञापत्र असे म्हटले आहात की हे दोघे गैरहजर होते हे आपले परस्पर विरोधी विधानांबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे
प्रभू – हे रेकॉर्डवर आहे
आजची सुनावणी संपली
पुढील सुनावणी मंगळवारी (28 नोव्हेंबर)