किरीट सोमय्यांच्या राणेंवरील आरोपांचे जुने व्हिडीओ LED वर लावले, शिवसेनेकडून अनोखं स्वागत
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून कणकवली शहरात अनोखे आंदोलन करण्यात आलं. किरीट सोमय्या यांनी नारायण राणे काँग्रेसमध्ये असतना त्यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि केलेली टीका एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून दाखवण्यात येते आहे.
सिंधुदुर्ग : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून कणकवली शहरात अनोखे आंदोलन करण्यात आलं. किरीट सोमय्या यांनी नारायण राणे काँग्रेसमध्ये असतना त्यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि केलेली टीका एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून दाखवण्यात येते आहे. आज किरीट सोमय्या यांची कणकवली शहरातील प्रहार भवनमध्ये पत्रकार परीषद झाली. या पत्रकार परिषदेच्या शेजारीच 20 फूट अंतरावर कणकवली शिवसेना शाखा आहे. याच शाखेच्या बाहेर शिवसैनिकांनी मोठ्या LED स्क्रीनवर, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नारायण राणे यांच्यावर केलेल्या आरोपांचे व्हिडीओ आवाज मोठा करून दाखवण्यात आला.
त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या पत्रकार परीषदेपूर्वीच कणकवली शहरातील वातावरण तणावपूर्ण बनलं. शिवसेना आमदार वैभव नाईक हे स्वत: यावेळी शिवसेना शाखेत शिवसैनिकांसह उपस्थित होते.
सोमय्या येताच किरीट सोमय्या यांचं एक जुनं वक्तव्य स्क्रीनवर लावण्यात आलं. यात सोमय्या यांनी नारायण राणे आमि त्यांच्या परिवारावर आरोप केले होते. तोच व्हिडीओ शिवसैनिकांनी स्क्रीनवर लावला.
किरीट सोमय्या तुम्ही जे बोलला होता, त्याचं काय झालं आज सांगाल का? सिंधुदुर्ग आपली वाट बघतोय, अशा आशयाची स्क्रीन कणकवलीत उभारण्यात आली. शाखेसमोरील रस्त्यावर भाजप कार्यकर्ते सोमय्या यांचं स्वागत करण्यासाठी जमले होते. तर शिवसेना शाखेत आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसैनिक जमले होते. यावेळी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात होता.
वैभव नाईक यांचा सोमय्यांवर हल्लाबोल
दरम्यान, किरीट सोमय्या यांच्यावर शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी हल्लाबोल केला. सोमय्या बेजबाबदार वक्तव्ये करीत आहेत. खासदारकीपासून शिवसेनेने वंचित ठेवल्यामुळे किरीट सोमय्या शिवसेनेवर टीका करीत आहेत. अनिल परब यांच्या मागे शिवसेना उभी आहे. अनिल परब यांना आम्ही चांगलं ओळखतो. राणेंवरील आरोपाचं काय झालं याचं उत्तर सोमय्यांनी द्यावं. मुख्यमंत्र्यांवरची टीका सहन केली जाणार नाही. जर मुख्यमंत्र्यांवर टीका झाली तर शिवसैनिक रस्त्यावर उतरतील. जन आशीर्वाद यात्रेतही टीका झाली होती त्याचं काय झालं बघा, असं वैभव नाईक म्हणाले.
किरीट सोमय्यांचे अनिल परब यांच्यावर आणखी आरोप
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी परिवहन मंत्री अनिल परब यांचे दोन अनधिकृत रिसॉर्ट असल्याचा दावा भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी केलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात आणखी एक आरोप केलाय. मुरुड मधील साई रिसॉर्ट एन एक्स हे अनधिकृत आहे, त्याशिवाय अनिल परब यांचे आणखी एक अनधिकृत रिसॉर्ट आहे. हे लपवलेल्या रिसॉर्टचे नाव सी कॉन्च रिसॉर्ट असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय.
महाराष्ट्र कोस्टल झोन ऑथोरिटीकडून कारवाई करण्याचे आदेश दिलेत. या आदेशाच्या पत्रातून हे दुसरं रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला. हे दोन्ही रिसॉर्ट अनधिकृत असल्याचं पत्र राज्याच्या पर्यावरण खात्याने देखील दिलंय. मात्र अनिल परब यांचे अनधिकृत दुसरे रिसॉर्ट ठाकरे सरकराने लपवल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय.
संबंधित बातम्या
Special Report | 12 वा खेळाडू जितेंद्र आव्हाड, लवकरच ईडीची धाड?
किरीट सोमय्या यांचा छगन भुजबळांवर गंभीर आरोप, आता भुजबळांचं प्रत्युत्तर