Rajan Vichare | दिघे साहेब… घात होतोय, छातीवर नाही पाठीवर वार होतोय, तुम्ही माफ केलं असतं का? शिवसेना खासदार राजन विचारेंचं भावनिक पत्र..
शिवसेना खासदार राजन विचारे यांनी शिवसेनेत झालेल्या बंडावर दुःख व्यक्त करत धर्मवीर आनंद दिघे साहेबांना पत्र लिहत एक व्हिडिओ व्हायरल केलाय.
मुंबईः दिघे साहेब, आज शिवसेनेच्या पाठीत आपल्याच माणसांकडून जो खंजीर खुपसला जातोय, त्यामुळे प्रचंड वेदना होत आहेत. तुम्ही असता तर यांना माफ केलं असतं का? असा सवाल शिवसेना खासदार राजन विचारे (Shivsena MP Rajan Vichare) यांनी केलाय. कै. धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या नावाने राजन विचारे यांनी भावनिक पत्र लिहिलंय. या पत्रातून त्यांनी शिवसेनेच्या आजच्या स्थितीबाबत भावना बोलून दाखवल्या. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह अनेक आमदार, नगरसेवकांचं बंड, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीची गंभीर कारवाई या सर्वांमुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. ठिकठिकाणी शिवसैनिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या गटातील जून्या शिवसैनिक नेते आणि पदाधिकारी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. राजन विचारे यांनी अत्यंत भावूक होत धर्मवीर दिघेंना पत्र लिहिलंय. या पत्राचा व्हिडिओदेखील त्यांनी केलाय. शिवसैनिकांमध्ये आणि इतर सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय.
दिघेंसाठी राजन विचारेंचं पत्र काय?
शिवसेना खासदार राजन विचारे यांनी शिवसेनेत झालेल्या बंडावर दुःख व्यक्त करत धर्मवीर आनंद दिघे साहेबांना पत्र लिहत एक व्हिडिओ व्हायरल केलाय. या व्हिडिओत त्यांनी आपल्या मनातील व्यथा दिघे साहेबांसमोर मांडली आहे. ते पत्र असे…
प्रति,
धर्मवीर आनंद दिघे साहेब जय महाराष्ट्र…
साहेब पत्राचा कारण आज तुमची आठवण आली. आज 21 वर्ष उलटून गेली एकही दिवस नाही की तुमची आठवण आली नाही. परंतु आज जास्त आली. 16व्या वर्षापासून तुमच्या सोबत काम करत आलो, या सगळ्या प्रवासात साहेब तुम्ही होता माझा प्रवासात.. अजूनही आहात.. अंधारात वाट दाखवत.. साहेब, आज मी जेवढा अस्वस्थ आहे, तेवढा कधी झालो नाही.. आज जी घटना घडली, मी नाही फक्त शिवसैनिक नाही तर सामान्य मराठी माणसंही खूप अस्वस्थ झाली आहेत. कुठल्या तोंडाने सांगू घात झाला.. दिघे साहेब घात झाला.. तो पण आपल्या माणसाने केला..
शिवसेनेच्या 56 वर्षाची इतिहासात विजयाची नांदी आपल्या ठाण्यातून झाली होती ना साहेब.. तेव्हा तुमच्या 56 इंचाची छाती अभिमानाने भरलेली होती ना साहेब.. ज्या ठाण्यावर तुम्हाला अभिमान होता, त्या ठाण्यावर गद्दारीचा शिक्का बसलाय साहेब… छातीवर नाही पाठीवर वार झाला साहेब… या आधी जेव्हा झाला होता, तेव्हा गद्दरांना क्षमा नाही, तुम्ही बोलले होते ना साहेब.. आणि हा दुसऱ्यांदा झाला… पण तुम्ही नाहीत यांना माफ कसं करायचं आम्ही? तुम्ही असतात तर केलं असतं म्हणून तुमची आठवण येत आहे साहेब… आनंद आश्रमात तुम्ही शिव बंधन बाधलं होत साहेब.. ते बंधन आज तुटताना दिसतेय… आणि तुम्हाला होणाऱ्या वेदना आम्हालाही होतायत.. पण रडायचं नाही लढायचं हा विचार घेवून पुढे जाणारी संघठना आहे. आमची शेवटच्या श्वासापर्यंत संघटनेसाठी काम करत असताना पाहिलं.. तुम्हाला काळजी नको साहेब.. कारण कुठल्याही व्यक्तीच्या स्वर्थापेक्षा संघटना महत्वाची असते… ही तुमची शिकवण पुढे घेवून जाणारा हा तुमचा राजन आणि तुमचे सच्चे शिवसैनिक आहेत.. कितीही जणं गेले तरी बाळा साहेब आणि तुमचे विचार आमच्या सोबतच आहे साहेब… आम्ही जीवाची बाजी लावू परंतु शिवसेनेचं ठाणं आणि ठाण्याची शिवसेना ही ज्योत विझू देणार नाहीत… आम्ही परत तुमचा सैनिक वाघासारखा उभा राहणारय.. कारण तुम्ही दिलेली ताकद आजही त्याच्या मनगटात शाबूत आहे. पुन्हा एकदा प्रवास.. साहेब तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या सोबत असू द्या. – तुमचा सच्चा शिवसैनिक राजन विचारे