अजित पवार यांच्याबद्दल संजय राऊत ‘रोखठोक’ बोलले, गौप्यस्फोट आणि खळबळ, महाराष्ट्राच्या राजकारणात ही वादळापूर्वीची शांतता?
"ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा ससेमिरा अजित पवार, त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे लागलाच आहे. त्यांच्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यांवर ईडीच्या धाडी पडल्या व कारखाना जप्त केला, पण आता यासंबंधात ईडीने जे आरोपपत्र दाखल केले त्यात पवार किंवा त्यांच्या कुटुंबीयांचे नाव नाही", असं संजय राऊत म्हणाले.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई शहराच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. तर आज महाविकास आघाडी दुसरी सर्वात मोठी सभा नागपुरात आयोजित करण्यात आली आहे. असं असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार हे भाजपसोबत हातमिळवणी करणार असल्याची चर्चा आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत खळबळजनक दावा करुन महाराष्ट्राच्या राजकीय चर्चांना वेगळ्या वळणावर नेलं आहे. असं असताना खासदार संजय राऊत यांनी थेट अजित पवार यांच्याबद्दल रोखठोक भूमिका मांडली आहे. विशेष म्हणजे सध्याच्या परिस्थितीत शरद पवार यांची काय भूमिका आहे, याबद्दलही राऊतांनी आपल्या आजच्या ‘सामना’च्या ‘रोखठोक’ सदरातून स्पष्ट केलं आहे.
“महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार भविष्यात काय करतील? 15 आमदारांसह ते भाजपात सामील होतील असे अयोध्येत गेलेले शिंदे व भाजपचे आमदार छातीठोकपणे सांगत होते. या सगळ्यांवर परखड खुलासा अजित पवार यांनीच करायला हवा. ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा ससेमिरा अजित पवार, त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे लागलाच आहे. त्यांच्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यांवर ईडीच्या धाडी पडल्या व कारखाना जप्त केला, पण आता यासंबंधात ईडीने जे आरोपपत्र दाखल केले त्यात पवार किंवा त्यांच्या कुटुंबीयांचे नाव नाही. मग जरंडेश्वर खरेदीच्या व्यवहारातील मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांचे काय झाले? की ते सर्व आरोप आणि धाडी राजकीय दबावासाठीच होत्या?”, असे प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केले आहेत.
‘मुश्रीफ हे शरद पवार यांचे विश्वासू, पण तुरुंगात कोणालाच जायचे नाही’
“शिवसेनेचे 40 आमदार फोडून भाजपने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. हे अनैतिक आहे. त्यातले 16 जण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने अपात्र ठरतील म्हणून सत्ता वाचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तेवढेच आमदार ईडी, सीबीआयच्या मदतीने फोडायचे असे कारस्थान चालले आहे. ते 16 कोण? ज्यांच्यावर या ना त्या कारणाने खटले आहेत त्यांना धमकवायचे. हसन मुश्रीफ व त्यांच्या कुटुंबावर भाजपने हल्ले सुरू केले. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या व्यवहाराचे हे प्रकरण. मुश्रीफ यांनी जेरीस येऊन भाजपात जावे असा एकंदरीत खटाटोप आहे. मुश्रीफ हे शरद पवार यांचे विश्वासू, पण तुरुंगात कोणालाच जायचे नाही. एकनाथ शिंदे यांनाही तुरुंगात जायचे नव्हते. म्हणून त्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला. ते सरळ बेइमानांचे सरदार झाले”, असा घणाघात संजय राऊतांनी केला.
ठाकरे-पवार भेटीतील चर्चेचा गौप्यस्फोट
“मंगळवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शरद पवारांना भेटलो. ते म्हणाले, कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण ‘पक्ष’ म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही. महाराष्ट्रातील लोकांत सध्याच्या सरकारबद्दल कमालीचा संताप आहे. जे आता भाजपबरोबर जातील ते राजकीय आत्महत्या करतील असे पवार-ठाकरे यांचे मत पडले”, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला.
“ईडीच्या दहशतीने लोकांना फोडणे हे सभ्य लोकांचे राजकारण नाही. राजकारणात राहून लोकांनी अमाप संपत्ती कमावली. ती टिकविण्यासाठी त्यांना सत्तेची कवचकुंडले हवीच असतात. घाऊक पक्षांतरे त्यातून होतात. पवार यांनी एक चांगला मुद्दा मांडला, ‘आज जे भीतीने पक्ष सोडत आहेत त्यांना मी सांगतो, तुम्ही भाजपात गेल्याने टेबलावरची फाईल कपाटात जाईल, पण या ईडी-सीबीआयच्या फाईली कधीच बंद होत नाहीत”, असं राऊत म्हणाले.
शिंद्यांबरोबर गेलेल्या 11 आमदार व 6 खासदारांच्या फायली सध्या टेबलावरून कपाटात गेल्या आहेत. शिंदे गटाप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अशा किती फायली कपाटात जातील ते पाहायचे. आज राज्याचे चित्र काय आहे? शिंदे सरकारचे मंत्री मंत्रालयात जात नाहीत. देवेंद्र फडणवीस ‘सागर’ बंगल्यावरून काम करतात. शिंदे यांच्या ताब्यात ‘वर्षा’सह तीन सरकारी बंगले आहेत. शिंदे यांचे चिरंजीव प्रशासनात सरळ हुल्लडबाजी करतात. त्यामुळे मंत्रालयापासून सर्वत्र अस्वस्थता आहे. सरकार कोठे चालले आहे? ते मंत्रालयातच झोपले आहे.
“फोडाफोडी म्हणजेच लोकशाही हे आता काही लोकांनी ठरवूनच टाकले आहे. हिंदुस्थानी लोकशाहीची कशी धूळधाण उडवली जात आहे ते आता रोजच दिसते. कालपर्यंत लोकांची मते विकत घेतली जात होती. आता लोकांनी मते देऊन निवडून दिलेल्या आमदार-खासदारांना सहज विकत घेण्यास आजचे सत्ताधारी उतरले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती अंजली दमानिया यांनी समाजमाध्यमांवर एक माहिती बुधवारी प्रसिद्ध केली. त्या सांगतात, ‘आज मंत्रालयात कामानिमित्ताने गेले. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि गमतीशीर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार शिंदे गटाचे 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार राष्ट्रवादीच्या 15 आमदारांसह लगेच भाजपबरोबर जाणार आहेत. बघू, आणखी किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची!’ श्रीमती दमानिया या मंत्रालयात गेल्या व त्यांना ही गुप्त माहिती मिळाली ही रंजक बाब आहे. जी बातमी महाराष्ट्र आणि देशाला बऱ्याच दिवसांपासून माहिती आहे, फक्त ही ‘फेक न्यूज’ आहे की आणखी काही हे सत्य कसे शोधायचे?”, असंदेखील राऊत आपल्या लेखात म्हणाले आहेत.