EXCLUSIVE : संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ?
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाली.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाली. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे. आज दुपारी दीड ते साडेतीन असे तब्बल दोन तास ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे. या भेटीची एक्स्क्लुझिव्ह दृश्य टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहेत. (Sanjay Raut Devendra Fadnavis meeting)
ही भेट झाली असली तरी संजय राऊत यांनी मात्र या भेटीचा इन्कार केला आहे. मात्र देवेंद्र फडणवीसांची पांढऱ्या रंगाची गाडी या हॉटेलमधून बाहेर पडताना दिसते.दुपारी दीड ते साडेतीन पर्यंत चर्चा झालीय. या दोघांच्या भेटीच्या चर्चेचा तपशील गुलदस्त्यात आहे.
सांताक्रूज येथील सप्ततारांकीत हॉटेल ग्रॅड हयात येथे संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दोन तास बैठक झाली. दुपारी दीड ते साडे तीन तास चर्चा झाली. सध्याच्या राजकीय घडामोडींवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीमागील कारण अद्याप समोर आलेलं नाही.
संजय राऊतांकडून इन्कार
संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यासोबत बैठक झाल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. मात्र, टीव्ही9 मराठीच्या रिपोर्टरने जेव्हा त्यांना तपशीलवार माहिती दिली. तेव्हा मात्र, राऊत यांनी आपण हॉटेलमध्ये होतो, पण फडणवीस यांच्याशी चर्चा झाली नसल्याचं सांगितलं. फडणवीस अन्य कुणाला तरी भेटायला आले असतील तर त्याची मला माहिती नाही, असं राऊत यांनी सांगितलं.
फडणवीसांची पुढच्या आठवड्यात ‘सामना’त मुलाखत
दरम्यान, राऊत यांनी फडणवीसांशी भेट झाल्याचा वृत्ताचा इन्कार केला असला तरी पुढच्या आठवड्यात दैनिक ‘सामना’मध्ये फडणवीस यांची मुलाखत छापून येणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
लंच डिप्लोमसीत नेमकं झालं काय?
आज दुपारी दीड वाजता राऊत आणि फडणवीस ग्रँड हयात हॉटेलमध्ये भेटले. दोघेही साडेतीन वाजेपर्यंत या हॉटेलात होते. दोघांनीही बंद दाराआड चर्चा करतानाच एकत्र दुपारचे जेवण केल्याचंही सूत्रांनी सांगितलं. बंद दाराआड झालेल्या या गुप्त भेटीत नेमकं काय झालं? याचा तपशील मात्र कळू शकलेला नाही.
आठ दिवसांपूर्वीच दानवे-राऊत यांची भेट
भाजप नेते आणि केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांनी 18 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतल्या संजय राऊत यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. “संजय राऊत यांची भेट घेण्यापाठीमागे कोणतंही राजकीय कारण नाही. महाराष्ट्रातल्या कोरोना परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मी संजय राऊत यांची भेट घेतली”, असं दानवे यांनी सांगितलं होतं.
सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया
केवळ एका बैठकीने शिवसेना-भाजपची युती होईल असं वाटत नाही. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची एकत्र बैठक होण्याची गरज आहे, असं सांगतानाच शिवसेना-भाजप आता एकमेकांपासून खूप दूर गेले असून एकत्र येण्यासाठी सध्याचं वातावरणही नाही आणि परिस्थितीही तशी नाही, असं भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.
प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया
संजय राऊत- देवेंद्र फडणवीस यांची भेट म्हणजे राजकीय उलथापालथ असं नाही, राजकारणात 2+2 म्हणजे 4 असंच नसतं, राजकारणात काय होईल, काय नाही हे सांगू शकत नाही – प्रवीण दरेकर
महाराष्ट्रातील जनतेला भेटीची काही माहिती नाही. राऊतांच्या एका भेटीनं लगेच राजकीय भूकंप होणार नाही. त्यांनी अनेकदा भेटी घेतल्या त्याची कारणंही वेगळी दिली – प्रवीण दरेकर