संजय राऊत यांची तब्येत कशी आहे?; हातातील घड्याळ दाखवून राऊत म्हणाले…
मी ईडीवर काही बोलणार नाही. ज्या लोकांनी षडयंत्र रचलं त्यांच्यावर बोलणार नाही. मी तुरुंगात गेल्याचा काहींना आनंद वाटत असेल तर वाटू द्या. माझी कुणाबद्दल तक्रार नाही.
मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे तब्बल 102 दिवसानंतर तुरुंगातून बाहेर आले आहेत. या तीन महिन्यांचा काळ कसा होता? त्यांची प्रकृती कशी आहे? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. राऊत यांना मीडियाने हे प्रश्न केले. यावेळी त्यांनी तुरुंगातील त्रोटक अनुभव सांगितले. त्याचवेळी त्यांच्या प्रकृतीची माहितीही दिली. आपल्या तब्येतीबाबत सांगताना राऊत यांनी हातातील घड्याळच दाखवलं. हे घड्याळ मला आता लूझ होतंय, असं संजय राऊत म्हणाले. त्यावरून राऊतांची तब्येत खालावल्याचं दिसून येत आहे.
संजय राऊत काल तुरुंगातून बाहेर पडले. आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी ते घरातून बाहेर पडले. यावेळी मीडियाने त्यांना घेरलं. त्यांच्याशी मीडियाने संवाद साधला. तुमची तब्येत कशी आहे? असा पहिलाच सवाल राऊत यांना करण्यात आला. त्यावेळी राऊत यांनी आपल्या हातातील घड्याळच मीडियाला दाखवत तब्येत कशी आहे याचं उत्तर दिलं.
जेलमध्ये होतो. आज तीन महिन्यांनी हाताला घड्याळ बांधलं आहे. जेलमध्ये घड्याळ वापरण्यावर बंदी असते. माझ्या हातातील घडी आता लूझ झाली आहे, असं सांगत राऊत यांनी आपल्या प्रकृतीची माहिती दिली.
माझी तब्येत अजूनही खराब आहे. तुरुंगातही प्रकृती खराब होती. तुरुंगात राहणं आनंदाची गोष्ट नसते. तुरुंगात गेलेली लोक मजेत असतात असं वाटत असेल तर तो भ्रम आहे. तुरंगात राहणं फार कठिण आहे, असं त्यांनी सांगितलं.
तुरुंगात भिंतीशी बोलावं लागतं. भिंतीशी एकांतात बोलावं लागतं. सावरकर दहा वर्ष तुरुंगात कसे राहिले? लोकमान्य टिळक सहा वर्ष कसे राहिले? वाजपेयी कसे राहिले. याचा मी विचार करत होतो. राजकारणात तुरुंगात जावं लागतं. मीही गेलो, असंही ते म्हणाले.
तुरुंगातील अनुभव सांगण्यासारखा नाही. आपण तुरुंगात राहतो ही जाणीवच वाईट आहे, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावरही टीका केली. राज यांनी मला अटक होणार असल्याचं सांगितलं होतं. मी एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी असा मला सल्ला देण्यात आला होता. मी माझा वेळ सत्कारणी लावलाच आहे. पण शत्रूही तुरुंगात जावा अशी भावना कुणाची असू नये. ते वाईट असतं, असा टोला त्यांनी लगावला.
मी ईडीवर काही बोलणार नाही. ज्या लोकांनी षडयंत्र रचलं त्यांच्यावर बोलणार नाही. मी तुरुंगात गेल्याचा काहींना आनंद वाटत असेल तर वाटू द्या. माझी कुणाबद्दल तक्रार नाही. माझ्या पक्षानं खूप भोगलं आहे. माझ्या कुटुंबाने खूप काही गमावलं आहे. राजकारणात असं होतं. आपला देश गुलामीत होता. त्यावेळीही राजकारण पाहिलं. त्यावेळीही दुश्मनासोबतही चांगला व्यवहरा केला गेला, असं त्यांनी सांगितलं.